Close

ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांच्या आत्मचरित्राचे डिजिटल मुखपृष्ठ प्रदर्शित (Marathi Actress Nayana Apte Autobiography Book Cover Launch On Her 75th Birthday)

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या सिनेकारकीर्दीला ७० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत 'अमृतनयना' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये 'प्रतिबिंब' या त्यांच्या आगामी आत्मचरित्राच्या डिजिटल मुखपृष्ठाचं प्रकाशनही करण्यात आलं. तर, 'जाऊ मी सिनेमात?' या शांता आपटेंच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशनही ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक अशोक समेळ यांच्या हस्ते करण्यात आले.

सवाईगंधर्व’ आणि ‘संस्कृती सेवा न्यास’ यांच्या विद्यमाने मुलुंड येथील कालिदास नाट्य मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला आनंद म्हसवेकर, मकरंद कुंडले, मुकुंद मराठे, मंगला खाडिलकर, नयना आपटे यांचे पती विश्वेश जोशी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी त्यांच्या हृदय आठवणींना उजाळा देत नयना आपटे यांच्या अभ्यासू वृत्तीचे आणि मेहनतीचे कौतुक केले. रंगभूमी जगणारे कलावंत अशा शब्दांत गौरव करत नयना आपटे यांच्याकडून आजच्या युवापिढीने प्रेरणा घ्यायला हवी असे मतही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

“रसिकांनी माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. अमृतमहोत्सवी वाटचाली निमित्ताने माझा जो सन्मान या संस्थेने केला त्यासाठी मी त्यांची आणि तुम्हा सर्व रसिकांची अत्यंत ऋणी आहे”, अशा भावना ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी यावेळी व्यक्त केल्या. ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक अशोक समेळ यांना यंदाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव आणि ऑर्गन वादक मकरंद कुंडले यांना कै. अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल या दोन मान्यवरांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

गायिका आणि अभिनेत्री नयना आपटे यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यांनी फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर हिंदी आणि गुजराती माध्यमांतही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Share this article