कलर्स मराठीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेच्या माध्यमातून मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वी 'इंद्रायणी' या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. या मालिकेचा प्रोमो देखील समोर आला आहे. अशामध्ये आता कलर्स मराठीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेच्या माध्यमातून मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महाराष्ट्राची लोकप्रिय कलर्स मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन येत असते. 'इंद्रायणी'नंतर आता लवकरच 'सुख कळले' ही आणखी एक नवीन मालिका कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सुख कळले' या मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने प्रेक्षकांचे मन जिंकले. या मालिकेच्या माध्यमातून सर्वांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी पुन्हा कलर्स मराठीवर झळकणार आहे. तसंच स्पृहा जोशीसोबत अभिनेता सागर देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सध्या तरी ही मालिका कधी सुरु होणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. या मालिकेच्या पहिल्याच सुंदर प्रोमोने रसिकांना सुखद धक्का दिला असून प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. या मालिकेच्या माध्यमातून स्पृहा जोशी आणि सागर देशमुख हे दोन्ही तगडे कलाकार प्रथमच एकत्र काम करणार आहेत. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. 'सुख कळले' ही एक वास्तवदर्शी मालिका असून स्पृहा- सागर आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवायला पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. या मालिकेमध्ये स्पृहा-सागरसोबत मिमी खडसे ही बालकलाकार देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
'सुख कळले' या मालिकेच्या प्रोमोमधील तरल भावस्पर्शी क्षण हा स्पृहा आणि सागर या दोघांमधील नाते अधोरेखित करत आहे. त्यामुळे ही एक मध्यमवर्गीय कुटुंबाची हृदयस्पर्शी कहाणी असून जी प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. दरम्यान, स्पृहा जोशी आधी झी मराठी वाहिनीवरील लोकमान्य या मालिकेमध्ये दिसली होती. या मालिकेमध्ये तिने लोकमान्य टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाईची भूमिका साकारली होती. तर सागर देशमुख चंद्रविलास या मालिकेत दिसला होता. या मालिकेत त्याने सागर आनंद महाजन ही भूमिका साकारली होती.