‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका चांगलीच गाजली होती. अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.
या मालिकेतील प्रत्येक पात्रं हीट झाली. अगदी नकारात्मक भूमिका साकारणारी मीनाक्षी वहिनीसुद्धा. प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. अभिनेत्री स्वाती देवल हिने मीनाक्षी वहिनी हे पात्र उत्कृष्टरित्या साकारलं होतं. त्यामुळे ते घराघरात पोहोचलं. आजही स्वातीला अनेक प्रेक्षक मीनाक्षी वहिनी या पात्राने ओळखतात.
याच मीनाक्षी वहिनीने म्हणजे अभिनेत्री स्वाती देवलने पती तुषार देवलसह व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल टाकलं आहे. तुषार व स्वातीच्या ‘देवल मिसळ’च्या स्टॉलचं रुपांतर आता हॉटेलमध्ये झालं आहे.
५ एप्रिलला ‘देवल मिसळ’ या नव्या हॉटेलचं उद्घाटन झालं. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते स्वाती व तुषारच्या या नव्या हॉटेलचं उद्घाटन पार पडलं. स्वाती व तुषारच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी पियूष गोयल यांच्यासह, गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, प्रकाश दरेकर, प्रकाश सुर्वे या भाजपाच्या मंडळींनी खास उपस्थिती लावली होती.
हॉटेलच्या उद्घाटनाचे फोटो शेअर करत स्वाती म्हणाली, “माझं अजून एक स्वप्नं पूर्ण झालं ते म्हणजे माझ्या (देवल मिसळ)चं आउटलेट चालू झालंय.” तिच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छा देताना दिसत आहेत.
बोरीवली पूर्वेला स्वाती व तुषारने ‘देवल मिसळ’ हे हॉटेल सुरू केलं आहे.
दरम्यान, स्वातीच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती मुलगा स्वराध्य देवलसह झळकणार आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुख कळले’ या नव्या मालिकेत स्वाती व स्वराध्य एकत्र पाहायला मिळणार आहेत.
(सर्व फोटो सौजन्य – स्वाती देवल इन्स्टाग्राम)