राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. २२ एप्रिल रोजी झालेल्या या सोहळ्यात तीन जणांना पद्मविभूषण, आठ जणांना पद्मभूषण आणि इतर ५६ जणांना पद्मश्री देण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अभिनेते मिथुन यांना दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतरां अनेकांच्या उपस्थितीत प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मिथुन दा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने १९७६ मध्ये 'मृगया' चित्रपटातून पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटात बंडखोराची भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. नंतर त्यांना 'तहादेर कथा' (१९९२) आणि 'स्वामी विवेकानंद' (१९९८) मधील भूमिकांसाठी आणखी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, मी आनंदी आहे कारण मी आयुष्यात कधीही कोणाकडून काही मागितले नाही. आणि न मागता काही मिळाले तर त्याचा आनंद वेगळाच असतो.
आपल्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत मिथुन चक्रवर्ती यांनी चार्टबस्टर डान्स ट्रॅकमध्ये अभिनय करून स्वतःचे नाव कमावले, ज्यात 'आय एम अ डिस्को डान्सर' (डिस्को डान्सर), 'जिम्मी जिमी' (डिस्को डान्सर) आणि 'सुपर डान्सर' (डान्सर) यांचा समावेश आहे. ते शेवटचे 'बाप', 'बॅड बॉईज', 'द काश्मीर फाइल्स' यांसारख्या सिनेमांमध्ये दिसले होते.