'अभिनय' आणि 'अध्यात्म' या बळावर अभिनेते प्रसाद ताटके यांनी असंख्य मालिकांमधून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 'भैरोबा', 'काटा रुते कुणाला', 'कन्यादान', 'लक्ष', 'स्वप्नांच्या पलीकडले', 'माधुरी मिडलक्लास', 'क्राईम डायरी', 'श्री स्वामी समर्थ', 'दूर्वा', 'प्रेमास रंग यावे', 'स्वराज्यारक्षक संभाजी', 'स्वराज्यजननी जिजामाता', 'सुखी माणसाचा सदरा', आणि आता नवीन चालू होणारी 'अंतरपाट' अशी प्रातिनिधिक नावे घेता येतील. तसेच नाटकांमध्ये 'अजब तुझे सरकार', 'संगीत सन्यस्त खड्ग' आणि चित्रपटांमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर', आगामी 'दिल मलंगी' अश्या काही मराठी चित्रपटांमध्ये या हरहुन्नरी कलावंताने विविध पैलू असलेल्या अनेक भूमिकांतून रसिकांचे मनोरंजन केले आहे. अभिनयासोबतच ते अनेक स्टेज शोंचे निवेदन - सूत्रसंचालन देखील करतात. यासोबतच ते सत्यनारायण पूजा, सर्व शांती कर्म म्हणजेच पौरोहित्य तसेच श्री स्वामींच्या मठात गुरुजी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपट, मालिकांमधून विविध छटा असलेल्या भूमिकांमध्ये ते रसिकांना दिसणार आहेत. त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
प्रश्न १ : प्रसादजी आपली अभिनय क्षेत्रात सुरुवात कशी झाली? आवड म्हणून कि व्यवसाय म्हणून?
प्रसाद : अर्थात आवड म्हणून! पण पुढे काही चांगली काम मिळाली आणि हळूहळू अध्यात्मासोबतच अभिनयात रमू लागलो. स्वामीकृपेने सध्या दोन्हीं क्षेत्रांमध्ये काम करीत आहे.
प्रश्न २ : आपण अभिनय करू शकतो केव्हा समजले? गाॅडफादर कोणाला मानता?
प्रसाद : हे अभिनयाचे गुण कोंकणवासियांत उपजत आहेत, त्यामुळे लहानपणापासून स्टेजचे आकर्षण कायम होते. गॉडफादर म्हणाल तर मराठी मध्ये उपेंद्र लिमये, सुबोध भावे, प्रसाद ओक, प्रसाद खांडेकर, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, सदाशिव अमरापूरकर, विनय आपटे सर यांसह अनेक दिग्गजांच्या अभिनयाने प्रेरणा मिळत आहे.
प्रश्न ३ : आध्यात्म आणि अभिनय यात निवडायचे झाल्यास कशाची निवड कराल?
प्रसाद : अध्यात्म आणि अभिनय हे दोन्ही माझे passion आहे. त्यामुळे मी दोन्हीमध्ये रमतो. अभिनयाला अध्यात्माची जोड असेल तर आधिक फायद्याचे होते. अध्यात्मात भाषा, उच्चार, आवाजाचा पोत, सादरीकरण यांवर प्रभुत्व गाजवता येते, आणि अभिनय कलेसाठी हे महत्वाचे असल्याने, मी दोन्ही कलेत पारंगत होण्यासाठी प्रयत्न करीत असतो...
प्रश्न ४ : अभिनयात करियर करायचं ठरवलं तेव्हा कोणती आव्हाने समोर होती? त्यांना कसे सामोरे गेलात?
प्रसाद : सुरवातीला खूप हालपेष्टा सहन कराव्या लागल्या, आजही आव्हान समोर आहेतच. पण आता थोडा मार्ग मोकळा होत चाललाय. छान छान भूमिका करायला मिळत आहेत. आपलं काम लोकांपर्यंत पोहचू लागलय याचा आनंद होतोय...
प्रश्न ५ : आजवरचा या क्षेत्रातील अनुभव कसा होता? आवडीचे काम मिळावण्यासाठी काय काय करावे लागले?
प्रसाद : आजपर्यंतचा अनुभव खूप छान आहे. इतर कलाकारांना जशी वागणूक सुरवातीला मिळते तसं माझ्या बाबतीत शक्यतो झाले नाही. यामध्ये अर्थातच माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि मघाशी म्हणालो तसं अध्यात्माची जोड यामुळे अनेक मालिका, नाटकांमध्ये भूमिका मिळत गेल्या. इतर कलाकारांना जसा त्रास होतो तसा सुदैवाने मला झाला नाही. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे खूप कमी कालावधीत आदर मिळतोय. जो काही संघर्ष सुरु आहे तो आव्हानात्मक भूमिका मिळविण्यासाठी...
प्रश्न ६ : आजवर तुम्ही कोणत्या कोणत्या भुमिका केल्या आहेत?
प्रसाद : आजवर मी गुरुजी, डॉक्टर, हवालदार, ऑफिस मॅनेजर अशा वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. 'महाराष्ट्र शाहीर' मधील भूमिकेचे विशेष कौतुक झाले आहे. तसेच सुनील परब दिग्दर्शित आणि रमाकांत भोसले यांच्या सद्गुरू एंटरटेनमेण्टच्या 'दिल मलंगी' मध्ये एक अफलातून भूमिका करत आहे. असे असले तरी मला आगामी काळात निगेटिव्ह भूमिका आव्हानात्मक वाटत असून अशा भूमिका करायला जास्त आनंद होईल.
प्रश्न ७ : केदार शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र शाहीर करतानाचा अनुभव कसा होता? प्रसाद : फार छान, वेगळी अनुभूती देणारा. देशासाठी आपल्या पिढीने किती त्यागलंय तो काळ या निमित्ताने अनुभवायला मिळत होता. केदार शिंदे सर कलावंतांकडून त्यांना हवा असलेला अभिनय सहज करून घेतात. ते अतिशय शिस्तप्रिय आहेत. स्वामीभक्त असल्याने आमच्यात सहज ट्युनिंग जमले.