Close

प्रसिद्ध निसर्गकवी ना.धों. महानोर यांचं निधन; पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास (Na Dho Mahanor Passed Away)

ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षांचे होते.

आपल्या तरल काव्याच्या जोरावर काव्यप्रेमी मराठी वाचकांच्या मनात ना. धों. महानोर यांनी हक्काचं स्थान प्राप्त केलं होतं. महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची पसंती मिळाली. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत.

१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेले ना. धों. महानोर गेली ६० वर्षाहून अधिक काळापासुन साहित्यक्षेत्रात कार्यरत होते. मराठी काव्यविश्वात निसर्गकवी म्हणून महानोरांना ओळखले जाते.

महानोरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. महानोर सगळ्यांत थोरले. पळसखेडला प्राथमिक शिक्षण झालं. पुढे वयाच्या दहाव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी ते ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले.

शेंदुर्णीच्या शाळेतच त्यांची कवितेशी सुरुवातीला ओळख झाली. आणि त्यांना कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामं केली. पुढील शिक्षणासाठी त्यांनी जळगाव गाठले पण ते महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापर्यंतच शिकले. त्यानंतर शिक्षण सोडून ते गावाकडे शेती करण्यासाठी परतले. शेती करता करता त्यांनी कविता लिहायला सुरूवात केली.

मराठी साहित्यविश्वामध्ये ते रानकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये बालकवींचा प्रभाव जाणवतो. त्यांनी बहिणाबाईंच्या गाण्याचा वारसा समृद्ध केला. त्यांचे अनेक कवितासंग्रह गाजलेले आहेत. ‘पानझड’, ‘तिची कहाणी', 'पळसखेडची गाणी, ‘रानातल्या कविता' म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिनाच.

त्यांनी अनेक चित्रपटांसाठी सुद्धा गाणी लिहिली आहेत. "दूरच्या रानात केळीच्या वनात" हे त्यांनी लिहिलेले गाणे चांगलेच प्रसिद्ध आहे. रानातल्या कविता, पही, गांधारी ह्या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरविले आहे.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1686947706285998080?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1686947706285998080%7Ctwgr%5Ed8de8f3de06c3d482b6473fe452cc93525de36e5%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fpune%2Fveteran-marathi-poet-literary-n-d-mahanor-died-in-pune-ruby-hall-hospital-pmw-88-3830959%2F

पुढे महानोर १९७८ साली महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर नियुक्त झाले. त्यानंतर त्यांचा शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत जवळचा संबंध आला. शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतच्या आठवणींवरही त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत. शरद पवारजींनी या रानकवींसाठी श्रद्धांजली वाहिली आहे.

Share this article