आगामी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटामुळे सध्या प्रचंड चर्चेत असलेली अभिनेत्री हेमल इंगळे हिने नुकताच साखरपुडा केला आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला एक्स बॉयफ्रेंड म्हणत हेमलने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस, गळ्यात छानसा नेकलेस असा लूक करत अभिनेत्रीने आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. हेमलच्या नवऱ्याचं नाव रौनक कोरडीया असं आहे. ते दोघे बराच काळ एकमेकांना डेट करत होते. रौनक ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करत असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे.
‘अशी ही आशिकी’ या चित्रपटामुळे हेमल इंगळे घराघरांत लोकप्रिय झाली. या चित्रपटात तिने अभिनय बेर्डेबरोबर स्क्रीन शेअर केली होती. आणि आता नवरा माझा नवसाचा २ मध्ये तिच्या जोडीला प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशीने स्क्रीन शेअर केली आहे.
हेमलने शेअर केलेल्या फोटोवर सध्या नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तसेच श्रिया पिळगांवकर, सौरभ चौघुले, रिंकू राजगुरू, फुलवा खामकर या कलाकारांनी हेमलच्या फोटोवर कमेंट्स करत तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान तिच्या आगामी नवरा माझा नवसाचा २ या सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.