मराठी मनोरंजन विश्वात सध्या नवनवीन विषयांवरचे सिनेमे भेटीला येत आहेत. बाईपण भारी देवा, आत्मपॅफ्लेट, वाळवी आणि काहीच दिवसात रिलीज होणारा झिम्मा २. आता आणखी एक वेगळ्या विषयावरचा धमाकेदार सिनेमा रिलीज होणार आहे. त्याचं नाव मुसाफिरा.
सिनेमाच्या नावापासुनच या सिनेमाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पुजा सावंत, पुष्कर जोग सिनेमात प्रमुख भुमिकेत झळकत आहेत. याशिवाय भोजपुरी सिनेमातली सुप्रसिद्ध अभिनेत्री यानिमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमात झळकणार आहे. तिचं नाव स्मृती सिन्हा.
'मुसाफिरा'... हा स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून एका दिमाखदार सोहळ्यात 'मुसाफिरा' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील प्लाझा सिनेमागृहाच्या परिसरात 'मुसाफिरा'च्या २० फूट लांब भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. या बिग बजेट चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात पाहायला मिळतेय.
मैत्री हा विषय नेहमीच प्रेक्षकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतात. 'मुसाफिरा' हा असाच मैत्रीवर बेतलेला चित्रपट आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गुझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केले आहे. २ फेब्रुवारी २०२४ ला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होतोय.