Close

प्रत्येक वयाला आपलीशी वाटेल, अशी गोष्ट असलेली नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ (New Serial ‘Thode Tuze Aani Thode Maze’ To Replace ‘Tuzech Mee Geet Gaat Aahe’)

१७ जूनपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’. कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही. नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं लागतं. स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेतूनही अश्याच नात्यांची गोष्ट उलगडेल. स्टार प्रवाहच्या देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि गोठ मालिकेमधून लोकप्रियता मिळालेला सुप्रसिद्ध अभिनेता समीर परांजपे यांची जोडी या मालिकेतून भेटीला येईल. अभिनेत्री मानसी कुलकर्णी देखिल या मालिकेच्या निमित्ताने तब्बल १० वर्षांनंतर मालिका विश्वात पदार्पण करणार आहे.

या नव्या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘कोणतीही गोष्ट एकट्याने होत नसते. जोडीदाराची थोडी मदत ही लागतेच. थोडं तुझं आणि थोडं माझं ही अशीच गोष्ट आहे. परस्पर नाते संबंध उलगडणाऱ्या गोष्टी सांगण्याचा स्टार प्रवाहचा कायम प्रयत्न असतो. या मालिकेतूनही अशीच एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे आपल्या अवती भवती जिव्हाळ्याची काळजी करणारी माणसं आहेत. आयुष्य हे जोडून घेतल्यावरच सुंदर असतं. एक प्रेम कथा उलगडताना कौटुंबिक आव्हानं पेलत नायक आणि नायिका हे त्यांचं नातं कसं फुलवत नेतील हे पहायला रसिकांना आवडेल ही खात्री आहे.’ 

तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे फारच उत्सुक आहे. ‘स्टार प्रवाह कुटुंबासोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेसाठी मी लगेच होकार दिला. मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं. देवयानी मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे.’ अश्या शब्दात शिवानीने आपली भावना व्यक्त केली.

तेजस या व्यक्तिरेखविषयी सांगताना समीर म्हणाला, ‘तेजस ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. तो खोडकर आहे. त्याला कुणी डिवचलं तर तो आपलं म्हणणं खरं करण्यासाठी वाट्टेल ते करु शकतो. मालिकेचं नाव आणि गोष्ट खूपच भावली मला. प्रत्येक वयोगटाला आपलीशी वाटेल अशी गोष्ट आणि पात्र या मालिकेची जमेची बाजू म्हणता येईल.’

अभिनेत्री मानसी कुलकर्णी गायत्री प्रभू हे पात्र साकारणार आहे. १० वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करताना प्रचंड उत्सुकता असल्याची भावना मानसीने व्यक्त केली. ‘गायत्री हे पात्र खूपच हटके आहे. तिची महत्त्वाकांक्षा तिच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते. आपल्यापेक्षा वरचढ ठरणारं कुणी असू नये यासाठी तिची सतत धडपड सुरु असते.’

स्टार प्रवाह प्रस्तुत थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेची निर्मिती अतुल केतकर आणि अपर्णा केतकर यांच्या राईट क्लिक मीडिया सोल्युशन्स या निर्मिती संस्थेने केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

Share this article