Close

नववधू- प्रिया मी (Newly Married- Priya Me)

नववधू प्रिया मी
आकर्षक पेहराव, सुंदर मुखडा आणि मनमोहक हास्य परिधान केलेल्या नववधूचा साज हा दृष्ट काढावी असाच असतो. मनोमन प्रत्येक मुलीला आपल्या विवाहाच्या वेळी आपणही असंच सुंदर… आणि केवळ सुंदरच दिसावं, असं वाटत असतं.
विवाह ठरला की त्या दिवसापासूनच वर-वधू आणि त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार सर्वच
त्या खास दिवसाच्या तयारीला लागतात. विवाहाची तारीख, मुहूर्त, हॉल, डेकोरेशन, कॅटरर, विधी, साहित्य, मानपानाच्या गोष्टी… या सर्वांची यादी तयार होते. त्यानुसार जबाबदार्‍या वाटून घेतल्या जातात. विवाहाचं पूर्ण प्लानिंग होतं आणि त्यानुसार कार्यवाहीही सुरू होते. अर्थात, या प्लानिंगनुसार विवाहाचं शुभकार्य निर्विघ्न, अगदी थाटामाटात पार पडणार, हे नक्की. अहो, पण या सर्व तयारीत उत्साहाने सहभागी होणारी नववधू विवाहाच्या दिवशीही तितकीच उत्साहात असेल? तिची त्वचा ताजीतवानी,

सतेज दिसेल?
खरं म्हणजे, या विवाह समारंभात नववधूच केंद्रस्थानी असते. सर्वांच्या नजरा नववधूचं सौंदर्य पाहण्यासाठी आतुर असतात. तिने स्वतःने कित्येक वर्षं या दिवशी आपण कसे सुंदर दिसू, याविषयीची स्वप्न रंगवलेली असतात. पण विवाहाच्या तयारीत, लगीनघाईत ती स्वतःकडे लक्ष द्यायला विसरते. आणि इतर सर्व गोष्टी अगदी परफेक्ट असूनही, तो खास दिवस तिच्यासाठी परफेक्ट नसतो. अनेक नववधूंच्या वाट्याला येणारं हे दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये, यासाठीचा हा प्रपंच.

योग्य वेळेत शुभारंभ करा
महाल काही एका दिवसात बांधून पूर्ण होत नाही. सौंदर्याचंही असंच आहे. म्हणूनच विवाहाची तारीख नक्की झाली, की त्या दिवसापासूनच आपण विवाहाच्या दिवशी नैसर्गिक सुंदर कसे दिसू, यासाठीचे प्रयत्न सुरू करा. खरं म्हणजे, विवाहाच्या किमान सहा महिन्यांपूर्वीपासून त्या दिवसासाठीची सौंदर्य तयारी सुरू करायला हवी. पण ते शक्य नसल्यास, विवाह ठरल्यावर लगेच तयारीला लागा. त्यातही समस्या असणार्‍या भागांवर अधिक लक्ष द्या.

केस : वारंवार केस धुणे, ब्लो-ड्राय करणे, हिटिंग-स्टायलिंग अशा अनेक कारणांमुळे केस दुभंगण्याची समस्या अनेकांना भेडसावत असते. म्हणूनच केस निरोगी आणि चमकदार व्हावेत, यासाठी आहारात ब जीवनसत्त्व पुरेपूर प्रमाणात असेल याची दक्षता घ्या. आहारात मासे, नट्स, अंडी, रताळे, पालक, डाळी इत्यादींचा समावेश जरूर करा. तसेच केसांच्या मुळांशी नियमित मसाज करून घ्या आणि विवाहाच्या एका महिन्यापूर्वी केसांना डीप कंडिशनिंग अवश्य करून घ्या.

चेहरा : लग्नाच्या सहा महिने आधीपासून त्वचेची योग्य काळजी घ्यायला सुरुवात करा. मुरुमं, अ‍ॅक्ने अशा समस्या असल्यास त्वरित त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या. म्हणजे, या समस्यांसाठीचा उपचार लवकर सुरू करता
येईल आणि त्यासाठीच्या औषधांची तुमच्या शरीराला सवयही होईल. तसेच नियमितपणे
स्पा ट्रीटमेंट्स, फेशिअल करून घेतल्यास त्वचेवरील मृत त्वचापेशी निघून जातील. यामुळे त्वचा सतेज आणि ताजीतवानी दिसेल. भरपूर पाणी प्यायला विसरू नका आणि शांत झोपही घ्या.

डोळे : डोळे म्हणजे, शरीरातील सर्वाधिक संवेदनशील अवयव. तेव्हा त्यांची योग्य आणि नियमित काळजी घ्यायलाच हवी. म्हणूनच नियमितपणे डोळ्यांचा मेकअप काळजीपूर्वक आणि अलगद काढा. तसेच योग्य प्रमाणात झोप घ्या. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा आणि भरपूर प्रमाणात पाणी प्या. निरोगी आणि सुंदर डोळ्यांसाठीचा हा मंत्र लक्षात असू द्या.
शरीर : तन आणि मनही आरोग्यदायी राहावं, यासाठी नियमितपणे योगासनं करा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने मल्टि-व्हिटामिन सप्लिमेंट्सही घेता येतील. हातापायांच्या सौंदर्यासाठी नियमितपणे मॅनिक्युअर व पेडिक्युअर करून घ्यायला मात्र विसरू नका.

परफेक्ट मेकअप टिप्स्
परफेक्ट मेकअपसाठी सर्वप्रथम त्वचा योग्य प्रकारे आर्द्र (मॉश्‍चराइझ) राहील याची काळजी घ्या. चेहर्‍यावर चांगल्या प्रतीचं मॉश्‍चरायझर लावा.
यानंतर चेहर्‍यावर प्रायमर लावा. प्रायमर हे फाऊण्डेशनच्या पूर्वी लावलं जातं. यामुळे मेकअपचा बेस नितळ दिसतो आणि त्वचेला चकाकीही येते.
सौंदर्याला बाधक ठरणारे चेहर्‍यावरील डाग, छिद्रे, सुरकुत्या, डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे इत्यादी लपविण्यासाठी कॉन्सिलरचा वापर करा.
यानंतर चेहर्‍यावर अगदी थोडं फाऊण्डेशन लावा.
त्यावर पर्ल हायलायटर लावता येईल.
नंतर ब्लशच्या साहाय्याने गाल आणि हनुवटीला हायलाइट करा.
पापण्यांच्या कडेला शॅडो पेन्सिलचा बेस द्या.
नंतर आवडीनुसार, सोनेरी वा चंदेरी आयशॅडोचा वापर करा.
थोडं काजळ आणि आय लायनरची अगदी बारीक रेघ ओढा.
नंतर ओठांवर लिप बाम लावा.
आवडीनुसार आकर्षक रंगाची लिपस्पिक लावा.
सर्वांत शेवटी आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे, चेहर्‍याइतकंच केसांकडेही लक्ष
द्या. विवाहाच्या दिवशी हेअर स्टाइल करण्यासाठी हेअर स्टायलिस्टला नेमलं जातं. अर्थात, ते तज्ज्ञ असतात यात शंका नाही. पण आपल्यावर कोणती हेअर स्टाइल चांगली दिसेल, हे पाहण्यासाठी त्यांच्याकडून ट्रायल अवश्य घ्या. या ट्रायलमुळे आपण विवाहाच्या दिवशी नक्की कसे दिसू, याची तुम्हाला कल्पना येईल. आणि काही बदल हवे असल्यास त्याचीही सूचना करता येईल. तसेच विवाहापूर्वी केसांसाठी स्पा ट्रीटमेंट आणि मसाजही अवश्य करून घ्या. यामुळे केसांचं सौंदर्य खुलण्यासोबतच मनही शांत राहील.
विवाहाच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी केलेल्या या सर्व प्रयत्नांना स्मित हास्याची जोड द्या. हावभावांत निवांतपणा असू द्या, म्हणजे मग काय बात आहे. विवाहाचा तो दिवस खर्‍या अर्थाने परफेक्ट असेल.
खरं म्हणजे, विवाह म्हटला की छातीत धडधड ही होणारच. मनात थोडी भिती, थोडा संकोच अशा अनेक भावना उफाळून येणारच… प्रत्येकाच्या बाबतीत हे होतं. पण म्हणून घाबरून जायचं नाही…
नर्व्हस व्हायचं नाही. दीर्घ श्‍वास घ्यायचा,
स्वतःला सांभाळायचं आणि चेहर्‍यावर स्मित हास्य ठेवून वावरायचं. यासोबत तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता,
एक नजर आपल्या जोडीदाराकडे पाहा…
सर्व काही नक्कीच ठीक होईल.

आंतर्बाह्य सौंदर्य जपा
शरीर आतून आरोग्यदायी आणि सुंदर नसेल, तर बाह्य सौंदर्याला काही अर्थच राहणार नाही. परफेक्ट नववधूचं तेज चेहर्‍यावर दिसण्यासाठी शरीरा अंतर्गत शुद्धता अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी-
करत असल्यास, मद्यपानाला पूर्णविराम द्या. जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक यांचे प्रमाणही कमी करा. आहारात पाणी, सूप्स आणि भाज्या भरपूर प्रमाणात असू द्या. यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत होईल आणि परिणामी चेहर्‍यावरही आरोग्यदायी तेज येईल.
योग आणि ध्यानधारणेचा मार्ग अवलंबा. काही विशेष योगासने आणि ध्यानधारणेच्या नियमित सरावाने शरीरातील विषद्रव्ये (टॉक्सिन्स्)
बाहेर टाकण्यास मदत होते. तज्ज्ञ व्यक्तीकडून अशी योगासने शिकून घ्या आणि त्यांचा नियमित सराव करा.
स्पाच्या ट्रीटमेंट्स म्हणजे, केवळ फॅड नसून तनमन ताजंतवानं करण्यासाठी, तसेच इंद्रियांना बळ देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणूनच आपल्या ब्युटी रुटीनमध्ये स्पा ट्रीटमेंट्सचाही समावेश अवश्य करा.
शरीराची आंतर्बाह्य स्वच्छता, योग्य आहार आणि नियमित व्यायाम यांच्या मदतीने शरीराला नैसर्गिक तेज प्राप्त होतं. अर्थातच, असं सतेज शरीर सुंदरही दिसतं. मेकअपच्या मदतीने या तेजाला थोडं फिनिशिंग देता येईल. सध्या नववधूसाठी सोनेरी, कॉपर, हिरवा, जांभळा, लाल आणि गडद गुलाबी हे रंग ट्रेण्डमध्ये आहेत. यांच्या सुयोग्य वापराने नववधूचं सौंदर्य अधिकच आकर्षक दिसेल.

Share this article