‘हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे…’, हे वाक्य गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातील प्रत्येक घरात ऐकलं गेलं. हे वाक्य आणि आपुलकीने हा प्रश्न प्रेक्षकांना विचारणारा आपला लाडका निवदेक म्हणजे निलेश साबळे. ‘चला हवा येऊ द्या’, ‘फु बाई फु’ अशा कथाबाह्य कार्यक्रमातून निलेश साबळे याने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली होती. त्याचा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम तब्बल दहा वर्ष टीव्ही मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालत होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच टीआरपीचं कारण देऊन हा शो बंद करण्यात आला. मात्र, हा शो बंद होण्यापूर्वीच यातील काही कलाकारांनी हा शो सोडला होता. मात्र, आता शोच्या टीमने प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे.
अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता निलेश साबळे याने देखील आपण तब्येतीच्या कुरबुरीमुळे आणि आराम करायचा असल्यामुळे काही काळ विश्रांती घेत असल्याचं कारण देत ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता. निलेश साबळे बाहेर पडल्यानंतर हा शो बंद करण्यात आला होता. अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा शो बंद झाल्यावर प्रेक्षकही नाराज झाले होते. मात्र, आता निलेश साबळे याने प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर आता निलेश साबळे आणि भाऊ कदम ही धमाकेदार जोडी नवा कोरा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा विनोदी कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, यावेळी हा कार्यक्रम ‘झी मराठी’ नव्हे, तर ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकतीच या नव्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या नव्या कोऱ्या विनोदी कार्यक्रमात निलेश साबळे, भाऊ कदम यांच्या जोडीसोबत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजने देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या तिघांचीही तिकडी आता संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणार आहे. नुकतीच त्यांच्या या नव्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून, यातील त्या तिघांचेही लूक समोर आले आहेत. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’, असं भन्नाट नाव घेऊन हा कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भरपूर हसवणार आहे.
मात्र, ब्रेक घ्यायचं कारण देऊन ‘चला हवा येऊ द्या’मधून बाहेर पडलेला निलेश साबळे एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, हे कळतात प्रेक्षकांना देखील सुखद धक्का बसला आहे. आता या नव्याकोऱ्या कार्यक्रमासाठी सगळेच आतुर झाले असून, या नव्या कार्यक्रमातून काय नवीन पाहायला मिळणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमात निलेश साबळे, भाऊ कदम, ओंकार भोजने यांच्या सोबतच अभिनेत्री सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि अभिनेता रोहित चव्हाण हे कलाकार देखील दिसणार आहेत. तर, अलका कुबल आणि भरत जाधव हे दोन दिग्गज कलाकार या कार्यक्रमात पाहुणे परीक्षक पदाची धुरा सांभाळताना दिसणार आहेत.