Close

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून डॉ. निलेश साबळे घेणार ब्रेक? (Nilesh Sabale Will Bid Farewell To Chala Hawa Yeu Dya)

लवकरच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे १००० एपिसोड पूर्ण होणार आहेत. जवळपास १० वर्ष ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचा माय-बाप अर्थात निलेश वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता निलेश हा कार्यक्रम सोडत असल्याची चर्चा आहे.

यावर एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना निलेश साबळे म्हणाला की,  ‘मी चला हवा येऊ द्या कार्यक्रम सोडल्याची चर्चा आहे. चला हवा येऊ द्या सध्या ४-५ महिने ब्रेक घेत आहे. चॅनेलने ठरवल्यास कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. मात्र तब्येतीच्या कारणामुळे मी काही दिवस या कार्यक्रमातून बाहेर असेन’. त्यामुळे निलेश काही एपिसोडसाठी या कार्यक्रमामध्ये दिसणार नाही हे स्पष्ट झाले आहे. गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच निलेश साबळे सुट्टीवर जाणार आहे. या कार्यक्रमातून बाहेर पडण्यामागे तब्येतीचे कारण असल्याचे त्याने म्हटले आहे.

गेल्या काही काळापासून ‘चला हवा येऊ द्या’ हा शो टीआरपीमध्येही घसरू लागला आहे. मात्र, आता निलेश साबळे या कार्यक्रमातून बाहेर पडणार असल्याचे समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून निलेश साबळे यात अभिनेता-लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता अशा चारही बाजू सक्षमपणे संभाळत आहे. मात्र, आता तो सुट्टीवर जाणार आहे. तर, दुसरीकडे हा शो देखील चार-पाच महिन्यांसाठी ब्रेक घेणार आहे. या शोमधील आणखी काही  कलाकार देखील एक्झिट घेणार असल्याचे कळते आहे.

 ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता कुशल बद्रिके हे देखील बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. कुशल बद्रिके लवकरच एका हिंदी कॉमेडी शोमध्ये झळकणार आहे. त्याचा ‘मॅडनेस मचायेंगे’ हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या शोचा एक प्रोमो त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. कुशल बद्रिकेचा हा नवा शो कपिल शर्माच्या शोची जागा घेणार आहे.

निलेशच्या चाहत्यांमध्ये यानंतर नाराजीचा स्वर पाहायला मिळू शकतो. त्याने व्यासपीठावर उत्तम निवेदन तर केलेच आहे, शिवाय विविध प्रकारच्या भूमिकाही साकारल्या आहेत. गेल्या काही काळात या कार्यक्रमावर टीकाही झाली, याचा परिणाम टीआरपीवरही झाल्याचे पाहायला मिळाले२०१४ सालापासून ‘चला हवा येऊ द्या’ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचा टीआरपीदेखील अनेक वर्ष अव्वल होता, परिणामी झी मराठीचाही TRP चांगला होता. मात्र गेल्या काही काळात टीव्हीवर स्पर्धा वाढली असून प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाच्या कंटेटबाबत नाराजी दर्शवली. आता ‘चला हवा येऊ द्या’ नव्या दमाने कमबॅक करू शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे निलेश साबळे घराघरांत पोहोचला आहे. पण आता यापुढे तो या कार्यक्रमाचा भाग नसणार असल्याची चर्चा आहे.

Share this article