Close

”नथुराम गोडसे’ नाटकाच्या नावात नवीन काही जोडू नका’ : शरद पोंक्षे यांना हायकोर्टाचे निर्देश (No More Additions In The Title Of ‘Nathuram Godse’ Play: High Court’ s Directive To Sharad Ponkshe)

अभिनेते शरद पोंक्षे यांनी रंगभूमीवर आणलेल्या नव्या नाटकाच्या नावात 'नथुराम गोडसे बोलतोय' ऐवजी 'नथुराम गोडसे' असा बदल केल्याची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. त्यावर 'नथुराम गोडसे' या नव्या नावात यापुढे नवीन काही जोडू नका, असे निर्देश न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी शरद पोंक्षे यांना दिले. या प्रकरणी ३० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

माऊली भगवती प्रॉडक्शन्सच्या नव्या नाटकातील संहिता, सादरीकरण व ट्रेडमार्कचे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या मूळ नाटकाशी साधर्म्य असल्याने आमच्या व्यावसायिक हक्कांचे उल्लंघन होत आहे, असा आरोप करीत ‘माऊली प्रॉडक्शन्स’चे मालक व निर्माते उदय धुरत यांनी माऊली भगवती प्रॉडक्शन्सचे मालक प्रमोद धुरत व अभिनेते शरद पोंक्षे यांच्या विरूद्ध दावा दाखल केला आहे. या प्रकरणी बुधवारी न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या पुढे सुनावणी झाली. मागील सुनावणी वेळी नव्या नाटकाच्या नावात बदल करण्याची तयारी पोंक्षे यांनी दर्शवली होती. त्यासाठी सेन्सॉर मंडळाची परवानगी मिळवून ‘नथुराम गोडसे बोलतोय’ ऐवजी ‘नथुराम गोडसे’ असा बदल केल्याचे पोंक्षेंच्या वकिलांनी न्यायालयाला कळवले. या बदलाला आक्षेप नसल्याचे निर्माते उदय धुरत यांच्यातर्फे ऍड. हिरेन कमोद व ऍड. महेश म्हाडगुत यांनी सांगितले.

मूळ नाटकातील नवा नथुराम गोडसे अभिनेता सौरभ गोखले

निर्माते उदय धुरत त्यांच्या माऊली प्रॉडक्शन्सचे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नव्याने रंगभूमीवर येत असताना ‘नथुराम’च्या भूमिकेचे आव्हान कोण पेलणार याविषयी कमालीची उत्सुकता होती. नथुरामच्या भूमिकेसाठी सुमारे २५-३० कलाकारांच्या ऑडिशन्स या नाटकाचे पुनरदिग्दर्शन करणारे दिग्दर्शक विवेक आपटे आणि उदय धुरत यांनी घेतल्या. त्यानंतर अभिनेता सौरभ गोखलेची निवड झाली. सौरभ ही आव्हानात्मक भूमिका कशी साकारणार याकडे नाट्यरसिकांसह नाट्यसृष्टीचे लक्ष लागले असून नाटकाच्या तालमी मुंबईत सुरु असून लवकरच हे ओरिजनल नाटक रसिकांना पाहायला मिळणार आहे असे निर्माते उदय धुरत म्हणाले.

Share this article