कोकोनट मोशन पिक्चर्स मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी कलाकृती घेऊन येत आहेत. नुकताच त्यांच्या आगामी 'ओले आले' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यात नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव झळकत आहेत आणि ते रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेताना दिसत आहेत. या चित्रपटात मकरंद अनासपुरे हे देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. रश्मिन मजीठिया निर्मित, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विपुल मेहता यांनी केलं आहे. या टीझरला अवघ्या काही वेळातचं १० लाखांहून व्हूज आले होते. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
हा धमाल ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मराठीच नव्हे तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपला दबदबा निर्माण करणारे अभिनेते नाना पाटेकर या चित्रपटातील हटके भूमिकेमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहेत.
'ओले आले' चित्रपटाच्या २ मिनिटे ४५ सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात हे नाना पाटेकर यांच्या आलिशान बंगल्याने होते. त्यानंतर त्यांचा मुलगा सिद्धार्थ आणि त्यांच्यामध्ये संवाद सुरु असतो. नाना मुलाला सतत पैसे कमावण्याचा मागे पळू नकोस तर आनंदाने आयुष्यही जग असे सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ट्रेलरमधील नाना पाटेकर यांचे मजेशीर संवाद प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत. एक बाप-लेकाची अनोखी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
'ओले आले' हा चित्रपट नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच ५ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, अभिनेते मकरंद अनासपुरे हे देखील 'ओले आले' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. ओले आले' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर मराठीत पदार्पण करत आहेत. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.