आज १ ऑगस्ट, अभिनय सम्राज्ञी मीनाकुमारीचा जन्मदिन! दिलीपकुमार एवढं आयुष्य तिला लाभलं असतं तर तिचा ९०वा वाढदिवस साजरा झाला असता. पण रुपेरी पडद्यावर ट्रॅजेडी क्वीन म्हणून गाजलेली, १ ऑगस्ट १९३३ रोजी जन्मलेली ही तारका जन्मभर शोकसम्राज्ञी म्हणून जगली अन् वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी मृत्यू पावली. मात्र मृत्यूनंतरही तिच्या अभिनयाचं गारूड आजही लोकांच्या मनावर आहे. ‘मरावे परि किर्तीरुपे उरावे’ ही उक्ती सार्थ करीत या अभिनेत्रीच्या स्मृतींना उजाळा देणारे आजही लाखो चाहते आपल्यामध्ये आहेत…
सिनेसृष्टीतील गाजलेले चित्रकार आणि संवेदनशील लेखक श्रीकांत धोंगडे यांनी मीनाकुमारीच्या जीवनावर ‘अतृप्ता’ हे नवे पुस्तक लिहिले असून ते कॉन्टिनेन्टल पुणे या प्रथितयश प्रकाशन संस्थेतर्फे लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. या थोर अभिनेत्रीच्या जीवनचरित्राचा शोध घेणाऱ्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण तिच्या वाढदिवशी, आज होत आहे.
खरं तर मीनाकुमारीच्या जीवनावर अनेक भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित झाली आहेत. परंतु, श्रीकांत धोंगडे यांचे हे पुस्तक लक्षणीय ठरेल, असे दिसते. कारण तिच्या जन्मापासून अखेरपर्यंतचे हे शोधचरित्र आहे. मीनाकुमारी राहत असलेल्या दादर परिसरातील रहिमाबाई चाळीपासून श्रीकांतजींनी शोधकार्य सुरू करून सलग साडेतीन वर्षे तिच्या जीवनाचा धांडोळा घेतला आहे. अन् अनेक दुर्मिळ फोटो शोधून काढले आहेत. त्यामुळे या पुस्तकात एक हजार फोटोंचा दुर्मिळ साठा तिच्या चाहत्यांना पाहायला मिळेल, असे श्रीकांतजींनी सांगितले. “शिवाय या पुस्तकात पेन, पेन्सिल व चारकोलने मी केलेले मीनाकुमारीचे १६ पोर्टेटस् आहेत,” असेही श्रीकांतजींनी या प्रसंगी सांगितले. त्यांच्या काळजाला भिडलेली, मनात शिरलेली आणि मेंदुत भिनलेली मीनाकुमारी त्यांनी या पुस्तकात उभी केली आहे.
श्रीकांत धोंगडे हे ‘माझी सहेली’चे गेल्या काही वर्षांपासूनचे लेखक आहेत. त्यांचे ‘सहेली’ परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन व या आगामी पुस्तकासाठी सदिच्छा !
श्रीकांतजींनी लिहिलेले हे चौथे पुस्तक असून त्यांची आधीची पुस्तके कॉन्टिनेन्टल प्रकाशननेच प्रसिद्ध केली आहेत.