पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडीत बनारस तिवारी यांचं निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. त्यांनी गावी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या अखेरच्या क्षणी पंकज त्रिपाठी त्यांच्यासोबत नव्हते. त्यांचं गाव बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात असून आई-वडील बेलसंड येथे राहायचे.
‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाच्या यशामुळे सध्या चर्चेत असलेले अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यावर वडिलांच्या निधनामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बेलसंड गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज त्रिपाठी हे याच गावी लहानाचे मोठे झाले. वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच पंकज त्रिपाठी त्यांच्या गावी रवाना झाले आहेत.
पंकज त्रिपाठी वडिलांच्या खूप जवळचे होते. वडिलांच्या जाण्याने त्यांना खूप दुःख झालं आहे. ते मुंबईत कामासाठी स्थायिक झाले असले तरी आईवडिलांची भेट घेण्यासाठी ते सतत गावी जायचे. गावी गेल्यावर ते आवर्जून वडिलांसोबत वेळ घालवायचे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे किंवा विविध मुलाखतींमध्येही ते अनेकदा त्यांच्या आयुष्यातील आईवडिलांच्या योगदानाबद्दल व्यक्त व्हायचे. “जर माझ्या पालकांनी माझ्या निर्णयांचा आदर केला नसता तर आज मी इथे नसतो”, असं ते नेहमी म्हणतात.
'मॅशेबल'शी संवाद साधताना पंकज त्रिपाठीने एकदा सांगितले की, "मुलगा काय करतो, कुठे काम करतो अशा गोष्टींमध्ये पंकजच्या वडिलांना अजिबात रस नव्हता. याशिवाय मुलगा पंकज त्रिपाठी चित्रपटसृष्टीत काय काम करतो हेही त्यांना माहीत नव्हते."
पंकज त्रिपाठी यांनी मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "त्यांचे वडील एकदाच मुंबईत आले होते. इथली मोठमोठी घरं आणि इमारती त्यांना आवडत नव्हत्या. पंकज त्रिपाठी यांनी सांगितले होते की त्यांचे वडील कधीही चित्रपटगृहात चित्रपट पाहायला गेले नाहीत. घरातही ते आपल्या मुलाचे सिनेमे टीव्ही किंवा कॉम्प्युटरवर कुणी दाखवले तरच बघायचे. काही वर्षांपुर्वीच पंकज त्रिपाठीने आई आणि वडिलांसाठी टीव्ही सेट लावला होता. एकुणच एकीकडे OMG 2 चं यश साजरं करत असतानाच पंकज त्रिपाठींना वैयक्तिक आयुष्यातील या दुःखद गोष्टींना सामोरं जावं लागत आहे.
(Image Credit Source: Twitter)