आप खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये विवाह संपन्न झाला. सर्व नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या सोबतीने त्यांच्या जीवनाच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. लग्नानंतर चाहते या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची प्रतीक्षा करत होते. मात्र आता परिणीती आणि राघवच्या लग्नाचे सुंदर फोटो समोर आले आहेत. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये लग्नासाठी ‘पेस्टल’ रंगांचा थीम ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे परिणीतीच्या लग्नातही हाच ट्रेंड पहायला मिळाला. परिणीतीने मोती रंगाचा भरजरी लेहंगा परिधान केला. तर राघवनेही त्याच रंगसंगतीचा शेरवानी घातली होती. दोघांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
लग्नाचे फोटो पोस्ट करत परिणीतीने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘नाश्त्याच्या टेबलवरील पहिल्या गप्पांपासूनच आम्हाला माहीत होतं की आम्ही एकमेकांसाठीच आहोत. या दिवसाची प्रतीक्षा आम्ही खूप काळापासून केली. अखेर आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकलो नसतो. इथपासून आमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.’
या फोटोंमध्ये परिणीती आणि राघव यांचं पाहुण्यांकडून जल्लोषात स्वागत होताना पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या फोटोमध्ये राघव परिणीतीच्या गळ्यात वरमाळा घालताना दिसत आहे. सप्तपदी घेताना आणि पायात जोडवे घालतानाचेही फोटो परिणीतीने पोस्ट केले आहेत. आपल्या चुलत बहिणीच्या लग्नाला अभिनेत्री प्रियांका चोप्रा हजर राहू शकली नव्हती. मात्र लग्नाआधी तिने परिणीतीसाठी खास पोस्ट लिहिला होता. आता या लग्नाच्या फोटोंवर सर्वांत आधी प्रियांकानेच कमेंट केली. ‘माझा तुम्हाला सदैव आशीर्वाद असेल’, असं तिने लिहिलं आहे.
नीना गुप्ता, सानिया मिर्झा, गुल पनाग, मनिष मल्होत्रा, निम्रत कौर, अनिता हसनंदानी यांसारख्या सेलिब्रिटींनी परिणीती आणि राघववर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यावर्षी मे महिन्यात परिणीती आणि राघवने साखरपुडा केला. या साखरपुड्याला बॉलिवूड इंडस्ट्री आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.