‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. १२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत काही दिवसांपूर्वी अभिनेते भरत जाधव यांची एन्ट्री झाली. या मालिकेत त्यांनी सूर्यकांत कदम यांची भूमिका साकारली आहे. अशातच ‘पारू’ मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो समोर आला आहे; ज्यामुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘पारू’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. “पारू आणि आदित्यमध्ये धरला जाणार अंतरपाट, पण नशिबाने आयुष्यात घालून ठेवलाय नवा घाट!”, असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये पारू आणि आदित्यचं लग्न होताना दाखवलं जात असलं तरी एक मोठा ट्विस्ट आहे.
प्रोमोच्या सुरुवातीला, सनई-चौघडे वाजताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पारू नाकात नथ, गळ्यात सुंदर हार, डोक्यावर मुंडावळ्या अशा नवरीच्या पेहरावात सजताना दिसत आहे. मग मंडपात पारूची एन्ट्री आणि त्यानंतर आदित्यबरोबर लग्नगाठ, सप्तपदी हे सर्व विधी पाहायला मिळत आहेत. एवढंच नव्हे तर आदित्य पारूला मंगळसूत्र देखील घालताना दिसतो. पण वरमाळा घातल्यानंतर खरं सत्य उघडकीस येतं. पारू व आदित्यचं हे खरं लग्न नसून खोटं लग्न असतं; जे जाहिरातीसाठी केलं जातं. पण पारूला हे मान्य नसतं. “कायपण झालं तरी मी मंगळसूत्र काढणार नाही”, असं प्रोमोच्या शेवटी पारू म्हणताना दिसत आहे.
पण प्रोमोमधून दाखवलेली गोष्ट सत्यात उतरणार का? पारू आणि आदित्यचं खरंच लग्न होणार का? लग्नसराईच्या विशेष भागात नेमकं काय घडणार? हे येत्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र, ‘पारू’ मालिकेचा हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.