आपली आहार संस्कृती इतकी संपन्न आहे की, या वर्षात देशातील व्यक्ती आहाराच्या माध्यमातून त्यांच्या मूळ संस्कृतीचा पुन्हा शोध घेतील. असा अंदाज 'फूड्स ट्रेन्डस् रिपोर्ट २०२२' या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नादिर गोदरेज यांनी भारतातील पाककला क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत या अहवालाचे अनावरण केले. या पाचव्या कलेक्टर्स एडिशनमध्ये २०० हून अधिक विचारवंत एकत्र आले. त्यामध्ये नामांकित शेफ्स्, फूड ब्लॉगर्स, आरोग्य-हॉटेल-मिडिया व्यावसायिक आणि पोषणतज्ज्ञ व अन्य उत्पादक अशा व्यक्तींचा समावेश होता. यातील ५० टक्क्यांहून अधिक आहारतज्ज्ञांनी वरीलप्रमाणे अंदाज व्यक्त केला आहे.
आपल्या पाककलेचा वारसा अतिशय समृद्ध असून यावर्षी देशात व परदेशात त्याच्या रुपावलीत महत्त्वाची स्थित्यंतरे दिसून येतील, असेही या तज्ज्ञ मंडळींना वाटते. आरोग्याचा भलेपणा आणि पाककलेचा अभिमान या अहवालातून पानोपानी प्रकट होत आहे. या अहवालातून असेही निष्पन्न करण्यात आले आहे की, या वर्षात खाद्यपदार्थांच्या होम डिलिव्हरीत ठळक वाढ दिसून येईल. रेस्टॉरंटच्या मेन्यूमधील आरोग्यदायी पदार्थांची निवड करण्याकडे ग्राहकांचा कल राहील. तर आरोग्यदायी पॅक केलेल्या मांसाहारी पदार्थांना प्राधान्य मिळेल.
या फूडस् ट्रेन्डस् रिपोर्ट बद्दल बोलताना गोदरेजच्या कार्यकारी संचालक व प्रमुख ब्रॅन्ड अधिकारी तान्या दुभाष म्हणाल्या, " या कलेक्टर्स एडिशनमध्ये आपल्या मूळ पाककलांचा पुन्हा शोध, व भारतीय पदार्थांचा अभिमान बाळगणे दिसून येते."