बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीने ‘कल्की 2898 एडी’ चित्रपट आवडला नाही, असं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्याने चित्रपटात प्रभास जोकरसारखा वाटत होता, असंही म्हटलं. त्याच्या या वक्तव्यानंतर प्रभासचे चाहते अर्शदच्या पोस्टवर कमेंट्स करत आहेत. काहींनी अर्शदला ट्रोल केलं आहे.
अर्शद वारसीने नुकतीच समदीश भाटियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या कामाचं कौतुक केलं, तर प्रभासच्या भूमिकेवर टीका केली. चित्रपट अजिबात आवडला नसल्याचंही मत त्याने व्यक्त केलं.
प्रभास ‘कल्की 2898 एडी’मध्ये जोकर वाटत होता, अर्शद वारसीचं स्पष्ट मत; ‘मुंज्या’बाबत म्हणाला, “मी या चित्रपटाबद्दल खूप…”
“मी कल्की पाहिला, मला चित्रपट अजिबात आवडला नाही. अमित जींनी अप्रतिम काम केलं आहे,” असं अर्शद अमिताभ बच्चन यांच्याबद्दल म्हणाला. “प्रभासला पाहून मला खरंच खूप वाईट वाटलं. तो काय होता? तो एखाद्या जोकरसारखा वाटत होता. का? मला मॅड मॅक्स बघायचा आहे. मला मेल गिब्सनला तिथं बघायचं आहे. तुम्ही त्याला काय बनवलं, का करता असं? मला खरंच कळत नाही,” असं तो प्रभासच्या भूमिकेबद्दल म्हणाला.
प्रभासच्या चाहत्यांनी केल्या अर्शदच्या पोस्टवर कमेंट्स
अर्शदच्या या वक्तव्यानंतर एका रेडिट युजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अर्शदच्या पोस्टवरील कमेंट्सचा आहे. प्रभास त्या भूमिकेत जोकरसारखा वाटत होता असं म्हणणाऱ्या अर्शदवर तेलुगू स्टारच्या चाहत्यांची नाराजी दिसून आली. त्यांनी अर्शदला ट्रोल केलं आहे. अर्शदच्या एका फोटोवर प्रभासच्या चाहत्यांनी अर्शदला ‘बॉलीवूडचा जोकर’, ‘फ्लॉपस्टार’, ‘डेड करिअर’, ‘एका सुपरस्टारला जोकर म्हणणं योग्य नाही’, असं म्हटलं आहे.
प्रभासच्या चाहत्यांनी केलेल्या या कमेंट्सवर काही युजर्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘ज्या देशात अभिनेते, क्रिकेटपटू आणि राजकारणी यांची पूजा केली जाते, त्या देशात अशा कमेंट्सचे आश्चर्य वाटायला नको,’ ‘हे सगळे कमेंट्स करणारे लोक बेरोजगार आहेत,’ ‘अर्शदने असं वक्तव्य शाहरुख खान किंवा सलमान खानबद्दल केलं असतं तर त्याचे चाहतेही असेच वागले असते,’ ‘प्रभासचे चाहते इतके विषारी का आहेत, त्यांच्यात अजिबात सहनशक्ती नाही,’ ‘किती वाईट चाहते आहेत! जेव्हा कोणी त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचं कौतुक करतात तेव्हा ते अभिमानाने सोशल मीडियावर त्याबाबत पोस्ट करतात, पण जेव्हा कोणी त्यांच्या चित्रपटांबद्दल किंवा त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलतात तेव्हा त्या गोष्टी ते सहन करू शकत नाहीत,’ अशा कमेंट्स काही युजर्सनी या पोस्टवर केल्या आहेत.
दरम्यान, अर्शदच्या वक्तव्यावर प्रभासचे चाहते नाराज आहेत. पण अद्याप चित्रपटाच्या टीमने किंवा प्रभासने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.