पवित्र रिश्ता या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रार्थनाने झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. सध्या ती मुंबई सोडून अलिबागला राहत आहे. नुकतंच तिने सुलेखा तळवलकर यांच्या दिल के करीब या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत यामागंच कारण सांगितलं.
ती म्हणाली की, “करोना काळात आम्ही आमची अलिबागमधील जागा डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला. ती जागा अभिच्या आजोबांची आहे. त्यानंतर रो-रो बोट सुरू करण्यात आली. यामुळे प्रवासाचा खूप वेळ वाचायचा. या सगळ्याचा आम्ही विचार केला. याशिवाय त्याठिकाणी आम्ही घोडे, गायी, कुत्रे असं सगळं पाळलं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी अभिला सतत अलिबागला जावं लागायचं.”
“अभिला प्राण्यांसाठी आठवड्यातील चार दिवस तरी तिकडे अलिबागला जावं लागायचं. त्यामुळे मग आम्ही ठरवलं आपण सगळेच शिफ्ट होऊया. मालिका सुरू होती तेव्हा मी जुहूला राहायचे. पण, त्यानंतर असं वाटायचं अरे मुंबईत तशी मज्जा नाही. सतत गर्दी, वाहतूक कोंडी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं यामुळे स्वत:ला कुठेतरी वेळ देता येत नव्हता. त्यामुळे अलिबाग जाऊन समाधान मिळेल असं आम्हाला वाटलं.”
“अलिबागला गेल्यावर मी त्यांच्यामधली एक होते. मी तिथे गेल्यावर माझी पेटिंगची आवड जपते, सगळीकडे मेकअपशिवाय फिरते, झाडांची वगैरे काळजी घेते. या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. यामुळेच आम्ही कायमस्वरुपी तिथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. मुंबईहून अलिबागला राहण्यासाठी माझे सासू-सासरे सुद्धा तयार झाले. त्या वातावरणात त्यांचं आयुष्य आणखी वाढलंय असं मला वाटतं. ते दोघे सुद्धा तिथे सुखी आहेत. प्रवासाच्या दृष्टीने सुरुवातीला थोडा त्रास होईल हे आम्हाला माहिती होतं. पण, आता सवय झालीये…आता काहीच वाटत नाही. आम्हाला मे महिन्यात अलिबागला शिफ्ट होऊन एक वर्ष पूर्ण होईल.”