‘बिग बॉस ९’फेम युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. प्रिन्स आणि युविका दोघेही बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असलेले दिसत होते. आता त्यांना मुलगी झाली आहे. शनिवारी संध्याकाळी युविकाने मुलीला जन्म दिला. प्रिन्स आणि युविकाच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली आहे. लग्नाच्या सहा वर्षांनंतर हे जोडपे आई-वडील झाले आहे.
प्रिन्सचे वडील जोगिंदर नरुला यांनी याची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले, “मुलीचा जन्म झाला आहे, आम्ही खूप आनंदात आहोत.”
युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला हे सतत चर्चेत राहणारे लोकप्रिय जोडपे आहे. त्यांची ओळख बिग बॉसच्या ९ व्या पर्वात झाली होती. त्यावेळीच त्यांच्यामध्ये मैत्री झाली. शोनंतर काही वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले. २०१६ ला त्यांनी साखरपुडा केला आणि २०१८ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांनी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले होते, त्याची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.
याआधी युविकाने बाळाच्या येण्याबाबत आनंद व्यक्त करत म्हटले होते, “आम्ही ही नवीन जबाबदारी घेण्यास तयार आहोत, या सुंदर काळाचा आनंद घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
याबरोबरच युविकाने एका मुलाखतीत म्हटले होते, “मला वाटत होते की आधी प्रिन्सचे करिअर चांगल्या पद्धतीने होऊ दे, त्यामुळे आम्ही फॅमिली प्लॅनिंग पुढे ढकलले होते. मात्र, नंतर मला लक्षात आले की वाढत्या वयानुसार तुमचे शरीर अनेक गोष्टींना पाठिंबा देत नाही. मी प्रिन्सबरोबर आयव्हीएफबद्दल बोलले. मला प्रिन्सच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण करायचा नव्हता, त्यामुळे आम्ही आमच्या पालकत्वाचा प्रवास आयव्हीएफद्वारे करण्याचा निर्णय घेतला.”
प्रिन्स बिग बॉस ९ आणि रोडीज एक्स ४ चा विजेता आहे. प्रिन्स नेहमीच युविकाबाबत प्रेम व्यक्त करत असतो. सोशल मीडियावर तो युविकाबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतो.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच युविकाचे डोहाळे जेवण पार पडल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये दोघेही आनंदात आणि बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असलेले पाहायला मिळाले होते. या कार्यक्रमाला दोघांच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.