अभिनेत्री प्रिया बापट ही तिच्या कामामुळे प्रेक्षकांच्या कायमच पसंतीस उतरली आहे. प्रियाने हिंदी, मराठीमध्ये मोठ्या पडद्यासह ओटीटी माध्यमांवरही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिटी ऑफ ड्रीम्स या वेब वेबशोमधून तिनं ओटीटीवर पाऊल ठेवलं. तिच्या पोर्णिमा गायकवाड या भूमिकेलाही बरीच पसंती मिळाली. आता प्रियाने तिच्या नव्या ओटीटी शोविषयी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे.
लवकरच प्रिया 'रात जवान है' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रात जवान है' या शोच्या शूटिंगला सुरुवात झाली असल्याचे तिने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये सांगितले आहे. यामिनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित आणि प्रतिभावान सुमीत व्यास यांनी या वेब शोचे दिग्दर्शन केलं आहे. या वेबशोमध्ये प्रियासोबत बरूण सोबती, अंजली आनंद यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. यात मैत्री, पालकत्व आणि आधुनिक जीवनातील आव्हाने यावर भाष्य केले जाणार आहे.
प्रिया बापटनं नुकतेच 'रात जवान है' या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "यारा ओ यारा मिलना हमारा जाने क्या रंग लाए गा". आता प्रियाच्या आगामी शोची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
उत्साहपूर्ण ट्विस्ट असलेल्या 'रात जवान है' शोचे दिग्दर्शन करण्याबाबत आपला आनंद व्यक्त करत दिग्दर्शक सुमीत व्यास म्हणाले, 'कुटुंबाची जबाबदारी पडली की, तारुण्य संपले असा जगातील सर्वांचा समज आहे. 'रात जवान है' या गोष्टीचे खंडन करते. ही तीन मित्रांची कथा आहे, जे मुले झाल्यानंतर देखील त्यांच्यामधील मैत्री, व्यक्तिमत्त्व आणि विलक्षणपणा कायम ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतात. आम्ही सेटवर खूप धमाल करत आहोत, तसेच या तिघांसोबत काम करताना खूप धमाल येते.'
प्रिया बापटनं अनेक मालिका, नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. प्रियाने वजनदार, टाइमपास २, आंधळी कोशिंबीर, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमांमध्ये काम केलं आहे. लगे राहो मुन्ना भाई आणि मुन्ना भाई एम.बी.बी.एस या हिंदी चित्रपटांमधून देखील प्रिया प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता प्रियाच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.