सध्या हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत लग्नसराईचा मोसम सुरू आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी गोव्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. वधू-वरांची घरे सजली आहेत आणि लग्नाचा उत्सव देखील सुरू झाला आहे. आता लग्नाआधी, रकुल आणि जॅकी आज मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले जिथे वधू-वरांनी नमस्कार केला आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
रकुल आणि जॅकी पूर्णपणे पारंपरिक लूकमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी, रकुलने गुलाबी रंगाचा शरारा सूट घातला होता त्यावर तिने दुपट्टा घेतला होता. रकुलच्या चेहऱ्यावर वधूचे तेज दिसत होते आणि ती खूप आनंदी दिसत होती.
रकुलचा भावी वर जॅकी भगनानी देखील हिरव्या रंगाच्या कुर्त्यामध्ये सिद्धिविनायक पोहोचला होता आणि तो देखील छान दिसत होता.
मंदिराला भेट दिल्यानंतर रकुल आणि जॅकीने पॅप्ससाठी जोरदार पोजही दिल्या, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रकुलप्रीत आणि जॅकी भगनानी २१ फेब्रुवारीला गोव्यात जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार आहेत. १८ फेब्रुवारीपासून या जोडप्याच्या विवाहपूर्व विधींना सुरूवात होणार आहे. दक्षिण गोव्यातील आयटीसी ग्रँड हे या जोडप्याच्या लग्नाचे ठिकाण आहे.
या जोडप्याने यापूर्वी परदेशात डेस्टिनेशन वेडिंगची योजना आखली होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातच लग्न करण्याची शिफारस केली. त्यानंतर या जोडप्याने आपले वेडिंग डेस्टिनेशनही बदलले आणि आता ते गोव्यात लग्न करणार आहेत.