सध्या बी-टाऊनच्या आवडत्या कपल्सपैकी एक असलेल्या रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या अनेक रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात लग्न करणार आहेत. रकुल आणि जॅकीच्या लग्नाच्या बातम्यांदरम्यान आता एक नवीन बातमी समोर आली आहे. त्यानुसार रकुल आणि जॅकी भारतात नाही तर परदेशात लग्न करण्याचा विचार करत होते. पण नंतर या जोडप्याने शेवटच्या क्षणी आपली योजना बदलली.
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्याविषयी समोर आलेल्या नव्या बातमीनुसार, याआधी ते भारतात नव्हे तर परदेशात लग्न करणार होते. पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डेस्टिनेशन वेडिंग लोकेशन इंडियाच्या वक्तव्यानंतर या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे ठिकाणही बदलले. रकुल-जॅकीच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रकुल आणि जॅकी आधी मध्यपूर्वेत लग्न करण्याचा विचार करत होते. ६ महिन्यांच्या नियोजनानंतर सर्व काही तयार झाले. त्यानंतर डिसेंबरमध्ये, पंतप्रधान मोदींनी लग्नाचे ठिकाण म्हणून भारत निवडण्याबद्दल वक्तव्य केले, मग रकुल आणि जॅकीनेही आपला निर्णय बदलून देशात लग्न करण्याचे ठरवले.
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये सोशल मीडियावर त्यांचे नाते अधिकृत केले होते. यानंतर हे कपल अनेकदा पार्टी आणि इव्हेंटमध्ये एकत्र दिसले. रकुल जॅकीच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर आता हे जोडपे 21 फेब्रुवारीला गोव्यात लग्न करणार आहेत. मात्र, लग्नाच्या बातमीवर रकुल किंवा जॅकीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया