Close

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’मधून आलियाच्या बदली ‘या’ प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीची लागणार वर्णी! (Ranbir Kapoor and Sai Pallavi to start shooting for Ramayana in early 2024)

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ‘भगवान रामा’च्या, तर साऊथ अभिनेता यश ‘दशानन रावणा’ची भूमिका साकारताना दिसणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये बनत असलेल्या बिग बजेट ‘रामायण’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात सुरुवातीला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी ‘भगवान राम आणि माता सीता’ या भूमिका साकारताना दिसणार होती. मात्र, नंतर आलिया या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे समोर आले होते. आलियाने काही वैयक्तिक कारणांमुळे हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात माता सीतेची भूमिका कोण साकारणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र, याचं उत्तर आता समोर आलं आहे. आलिया भट्टच्या जागी या चित्रपटात एका सुंदर आणि प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ‘भगवान रामा’च्या, तर साऊथ अभिनेता यश ‘दशानन रावणा’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता या चित्रपटात साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी ही ‘माता सीता’ साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. आपल्या दमदार अभिनयाने साईने साऊथ सिनेसृष्टीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दरम्यान, आता पिंकविलाच्या वृत्तानुसार साई पल्लवी नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'रामायण'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

एकीकडे या चित्रपटातील ‘रामा’च्या भूमिकेसाठी रणबीर कपूरचे नाव पुढे आले असताना, दुसरीकडे साई पल्लवी आता सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर, ‘केजीएफ’ या चित्रपटातून चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण करणारा ‘रॉकी भाई’ अर्थात अभिनेता यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. साई पल्लवीच्या आधी ‘रामायण’मध्ये आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यापैकी अभिनेत्री सीतेच्या भूमिकेत दिसणार, असे म्हटले जात होते.

रणबीर कपूर आणि साई पल्लवी पुढील वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२४मध्ये या चित्रपटाच्या पूर्वार्धाचे शूटिंग सुरू करू शकतात. तर, साऊथ स्टार यश देखील जुलैमध्ये नितेश तिवारीच्या 'रामायण'चे शूटिंग सुरू करू शकतो. विशेष म्हणजे यश या चित्रपटासाठी १५ दिवस श्रीलंकेत शूटिंग करू शकतो

Share this article