Close

रितेश देशमुख आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ट्रायोलॉजी चित्रपट बनवण्याची केलेली घोषणा आता पूर्ण होणार; रितेश देशमुख छत्रपती शिवराय साकारणार! (Riteish Deshmukh Play Chhatrapati Shivaji Maharaj)

काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमा म्हटलं की चाहत्यांचा ऊर कसा अभिमानाने भरून यायचा. चित्रपटात शिवाजी महाराज कोण असणार येथपासून ते शिवरायांचा कोणता पराक्रम यात दाखवणार इथपर्यंत उत्सुकता ताणली जायची. परंतु या गत वर्षीपासून शिवरायांवरील तर कधी त्यांच्या मावळ्यांमधील व्यक्तीरेखेवर चित्रपट काढण्याची जणू श्रृंखलाच सुरू झाली आहे. तरी विषय आणि कलाकारांमधील वैविध्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमी झालेली नाही, हे मात्र खरंय.

मागे २ वर्षांपूर्वी अभिनेता रितेश देशमुख सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची साकारणार हे निश्चित झालं होतं. मात्र सिनेमाची घोषणा होऊन बराच काळ उलटल्यानंतरही सिनेमाविषयी कुठे काहीच चर्चा नाही. पण आता रितेशची बायको जिनीलिया देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा तयार होणार आणि त्यात रितेश प्रमुख भुमिका साकारणार यावर शिक्कामोर्तब केले आहे.

रितेश देशमुखने २०२० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ट्रायोलॉजी बनवण्याची घोषणा केली होती. आता नुकतेच जिनीलिया डिसूझानेही हा चित्रपट तयार होत असल्याचं म्हटलं असून त्यासाठी घाई नाही, असं सांगितलं आहे.

जेनेलिया म्हणाली, 'हा चित्रपट रितेश देशमुखच्या मनाच्या खूप जवळ आहे. या प्रकल्पासाठी तो आपले जीवन समर्पित करेल. हा प्रकल्प घाईगडबडीत मार्गी लागण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही."

२०२० मध्ये रितेश देशमुख आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ट्रायोलॉजी चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. हा चित्रपट अभिनेत्याच्या प्रॉडक्शन हाऊस 'मुंबई फिल्म कंपनी'च्या बॅनरखाली बनवला जाणार आहे. १९ फेब्रुवारी २०२० रोजी रितेशने ट्विट करून ही माहिती दिली. इतकंच नव्हे रितेशने रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

आता जिनीलियाने या बातमीस दुजोरा दिला असल्याने हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल ही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान जिनीलिया देशमुखचा ट्रायल पिरीयड हा नवीन सिनेमा २१ जुलैला रिलीज झालाय.

Share this article