नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. चित्रपटाची भव्यता, गाणी, दिग्दर्शन, दिग्गज कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू असल्याने या चित्रपटाला चारचाँद लागले आहेत. या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट, शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन यांच्यासह तगडी स्टारकास्ट आहे. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्यासाठी क्षितीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.
या चित्रपटात क्षितीने रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली आहे. पूनम रंधावा असं तिच्या पात्राचं नाव आहे. तिने ही लक्षवेधी व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारली आहे. तिच्या या उत्तम अभिनयामुळेच अनेक कलाकारांनी, चाहत्यांनी क्षितीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका बिग बजेट चित्रपटात, इतक्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर, कलाकारांसोबत काम करून क्षितीने तिच्या चाहत्यांना एक सुखद अनुभव दिला आहे.
या चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाल्याबद्दल क्षिती जोग म्हणते, "यापूर्वीही मी हिंदीमध्ये काम केले आहे आणि ते काम मी एन्जॉयही केले आहे. मात्र या चित्रपटात काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी विलक्षण आहे. या चित्रपटात माझ्या व्यक्तिरेखेची इतकी दखल घेतली जात आहे, हे माझ्यासाठी खूप सुखावणारे आहे. मला या चित्रपटात दोन वेगळ्या पिढीतील सुपरस्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. आपण केलेल्या कामाचे दिग्गजांकडून, चाहत्यांकडून कौतुक होणे, हे एका कलाकारासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही मौल्यवान असते. एका कलाकाराला आणखी काय हवे असते. या सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली. खूप शिकता आले. एकंदरच हा अनुभव माझ्यासाठी कमाल होता."
तर दिग्दर्शक करण जोहर म्हणाला, "क्षितीचा अभिनय मी पाहिला असून ती एक गुणी अभिनेत्री आहे. मला खात्री होती ती या व्यक्तिरेखेला ती योग्य न्याय देणार. चित्रपट प्रदर्शित झाला असून क्षितीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्षिती अतिशय प्रोफेशनल अभिनेत्री आहे. कामाच्या बाबतीत ती अतिशय प्रामाणिक आहे. एखादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ती जी मेहनत घेते, ते मी सेटवर पाहिले आहे आणि म्हणूनच ती कोणतीही भूमिका इतकी चपखल बजावू शकते."
पूनम रंधावासाठी दिग्दर्शक – अभिनेता हेमंत ढोमेने देखील खास पोस्ट शेअर केली आहे. क्षिती ही हेमंतची बायको आहे. पत्नीबरोबरचा एक फोटो शेअर करत हेमंत म्हणाला,
“पाटलीणबाई,
आज तुझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस! करण सरांच्या ऑफिसमधून फोन आल्याचं तू मला सांगितलंस आणि घाई घाईत लुक टेस्ट आणि त्यांच्याबरोबरची तुझी मिटींग आणि तारखा आणि बाकी सगळं ठरलं बघता बघता सिनेमाचं शूट झालं… हा सगळा प्रवास मी जवळून पाहिला… प्रिमियर शो ला तुझ्या सोबत आलो… “He is my husband!” अशी तू सगळ्यांना ओळख करून देत होतीस… काय भारी फिलींग होतं ते! त्या शो नंतर कोण कोण येऊन तुझं कौतुक करत होते… काय कमाल वाटत होतं!
आज आपण आपल्या मित्रांसोबत सिनेमा पाहिला…तुझं काम आज पुन्हा एकदा बारकाईने बघत होतो! तुझी आजवरची मेहनत, स्वतःच्या जिवावर सारंकाही करण्याची जिद्द हळू हळू फळाला येतेय…सिनेमा संपल्यावर गर्दीतून लोक तुला भेटायला आले आणि त्या साऱ्यांनी तुझ्या साठी टाळ्या वाजवल्या…त्या टाळ्या कधी संपुच नयेत असं वाटत राहिलं… तुझं कौतुक कधीच थांबु नये असं वाटत राहिलं… हे सारं मी साठवून ठेवलंय कायमचं आणि आज तुला आवडत नसताना ही पोस्ट लिहीतोय…
इतक्या भव्य दिव्य सिनेमात, एवढ्या मोठ्या नटांमधे, त्या सगळ्या झगमाटात तू लख्खं चमकत होतीस… तुझ्या कामाने! कमाल!
क्षिती मला तू कायमंच आनंद दिलायस पण रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाबद्दल थँक्यू! आपणंच हे सारं केलंय, हे सग्गळं आपलंच यश आहे असं खुळ्यागत वाटणारा तुझा या जगातला सगळ्यात मोठा चाहता…हेमंत. खूप खूप मोठी हो, love you!” हेमंतच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहे. ज्यांनी चित्रपट पाहिलाय ते क्षितीचं भरभरून कौतुक करत आहेत. अभिनंदन क्षिती !