अभिनेत्री रुबिना दिलैक गेले काही दिवस तिच्या गरोदरपणामुळे सतत चर्चेत होती. तिला बाळ कधी होणार याकडे तिच्या चाहत्यांचे डोळे लागलेले. आणि शेवटी तो दिवस आलाच... अभिनेत्री आई झाली आहे. विशेष म्हणजे या गोष्टीला १ महिना उलटला असून आज आपल्या दोन्ही लेकी १ महिन्याच्या झाल्या निमित्ता ने ही गोड बातमी चाहत्यांना दिली.
मध्यंतरी अभिनेत्रीच्या फिटनेस ट्रेनरने सोशल मीडियावर तिला दोन जुळ्या मुली झाल्याबद्दल अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली होती. मात्र काही वेळाने त्याने ती डिलीट केली. या सर्व प्रकारामुळे सर्वांसमोर प्रश्नचिन्ह उभारले गेले..
अभिनेत्री रुबीना दिलैकने आता तिच्या इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांची उत्सुकता संपवली आहे. आपल्याला दोन जुळ्या मुली झाल्याचे सांगत तिने एक गोड पोस्ट शेअर केली.
पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या दोन्ही मुलींना एक महिना झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अभिनेत्रीने पुढील पोस्टमध्ये तिच्या दोन्ही लेकींची नावे देखील सांगितली.
रुबिनाने लिहिले की, आम्हाला सांगताना खूप आनंद आणि उत्साह वाटतोय की, आमच्या मुली, जीवा आणि एधा आज एक महिन्याच्या झाल्या, गुरुपूरबच्या शुभ दिवशी आम्हाला खास आशीर्वाद दिला!आमच्या दोन्ही परींसाठी तुमचे आशीर्वाद द्या.
रुबिनाने शेअर केलेल्या फोटोत ती आकाशी रंगाचा ड्रेस आणि अभिनवने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला पाहयला मिळतो. दोघांनी बाळांना कुशीत घेऊन फोटोसाठी पोज दिली आहे. पुढील दोन फोटोंत लहान मुलींचे गोंडस हात दाखवण्यात आले आहेत. त्याच्या पुढच्या फोटोत मुलींची नाव एधा आणि जीवा असल्याचे सांगितले आहे. तर शेवटच्या फोटोत अभिनव आणि रुबीना पुजा करत असल्याचे पाहायला मिळते. अभिनव आणि रुबीना यांनी अद्याप आपल्या मुलीचे चेहरे दाखवले नाहीत. पण कमेंटमध्ये सर्वजण त्यांचे अभिनंदन करत आहेत.