Close

सलमान खानच्या हिंदी ‘बिग बॉस’मध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री झळकणार? (Rupali Bhosle Was Approached For Hindi Bigg Boss 18)

सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. पहिल्या दिवसापासून या पर्वात वाद, राडे पाहायला मिळत आहेत. सध्या पाचव्या पर्वाचा तिसरा आठवडा चालू आहे. अशातच दुसऱ्या बाजूला हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची देखील चर्चा रंगली आहे. या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या या वादग्रस्त व बहुचर्चित ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री झळकणार असल्याचं समोर आलं आहे.

‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व संपल्यापासून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची ( Bigg Boss 18 ) चर्चा सुरू आहे. या पर्वाबाबत अनेक वृत्त सातत्याने येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सलमान खानबरोबर अब्दू रोजिक होस्ट करणार असल्याचं वृत्त आलं होतं. तसंच यापर्वातील काही निश्चित झालेल्या स्पर्धकांची नावं देखील समोर आली आहेत. प्रसिद्ध युट्यूबर मिथिलेश पटनाकर, आकृति नेगी, जसवंत बोपन्ना, दिग्विजय राठी, सीवेट तोमर, शाइनी आहुजा, पायल मलिक, कृतिका मलिक, अर्जुन बिजलानी, करण पटेल, समीरा रेड्डी, सुरभि ज्योति, पूजा शर्मा, शोएब इब्राहिम, दलजीत कौर आणि इशा कोपिकर यांना ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वासाठी विचारणा झाल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये ‘आई कुठे आई करते’ मालिकेतील अभिनेत्रीचं नाव देखील सामील असल्याचं समोर आलं आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वासाठी विचारणा झाल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप रुपाली भोसलेने स्वतः याबाबत कोणतीही माहिती दिली नाहीये.

दरम्यान, याआधी अभिनेत्री रुपाली भोसले ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. या पर्वात रुपालीने आपल्या खेळीने अनेकांची मनं जिंकली. ती या पर्वातील टॉप-१० स्पर्धक असून ७० दिवसांनंतर ती बिग बॉसच्या घराबाहेर झाली होती.

Share this article