बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचे फक्त देशातच नाही, तर संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. सलमान एक उत्तम अभिनेता असला तरी तो माणुसकी जपणारा कलाकार आहे, असं म्हणत फॅन्सकडून सलमानच्या चित्रपटांना कायमच डोक्यावर घेतलं जातं. जसं या भाईजानला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतं, तितकंच प्रेम त्याला त्याचे बॉडीगार्डही देतात. सलमानचा बॉडीगार्ड शेरा याने नुकत्याच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून केलेल्या पोस्टवर अनेकांच्या नजरा वळल्या आहेत. शेराने पोस्ट केलेले हे सध्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सलमानचा बॉडीगार्ड शेराने नव्या गाडीचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्याने घेतलेली ही गाडी तब्बल १.४ कोटींची असल्याचं सांगितलं आहे. शेराने काळ्या रंगाची Range Rover ही आलिशान कार खरेदी केली आहे. ‘सर्व सकारात्मक शक्तींच्या आशीर्वादाने नव्या सदस्याचं कुटुंबात स्वागत करत आहे’, असं कॅप्शन देत त्याने नव्या गाडीबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून शेरा २० वर्षांपासून त्याच्याबरोबर आहे. संपूर्ण सिनेसृष्टी आणि चाहतेदेखील सलमानला ‘भाई’ या नावाने हाक मारतात. मात्र, शेरा सलमानला ‘मालिक’ असं म्हणतो. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, शेराने सांगितलं की, “सलमान खान माझ्यासाठी देवमाणूस आहे. तुम्ही ज्याच्या हाताखाली काम करता, ती व्यक्ती म्हणजे ‘मालिक’ असं प्रत्येक वेळी एकच अर्थ होत नाही. ‘मालिक’ या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे देव. आपण देवाला आदरार्थी ‘मालिक’ असं म्हणतो. ते ज्या ज्या ठिकाणी जातात, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर असते. मात्र, असं असलं तरी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक वेळा मला त्यांनी कठीण परिस्थितीतून सावरलं आहे. त्यांच्या रुपात देव माझ्यासोबत कायम असतो, म्हणूनच मी त्यांना मालिक म्हणतो.”
शेरा सलमानचा खूप जुना बॉडीगार्ड आहे. शेराचं खरं नाव गुरमित सिंह असं आहे. तो शीख कुटुंबातील असून गेले अनेक वर्ष मुंबईत वास्तव्यास आहे. शेरा लहानपणापासून शरीरसौष्ठवच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचा. १९९५ मध्ये शेरा आणि सलमानची एका पार्टीत भेट झाली. या पार्टीत सुरक्षा रक्षकाची जबाबदारी शेराची होती. शेराची सलमानबरोबर ओळख होण्याआधी तो ‘मिस्टर मुंबई ‘ या शरीरसौष्ठव स्पर्धेत पहिल्या क्रमांकाने विजयी झाला होता.