विकी कौशल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'सॅम बहादूर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक आहे. चित्रपटाच्या शानदार ट्रेलरने आधीच लोकांची मने जिंकली आहेत, आता लोक विक्कीला सॅम माणेकशॉच्या भूमिकेत पाहण्याची प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी काल रात्री चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये विकी कौशलने असे काही केले आहे की त्याचे चाहते पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडले आहेत.
काल रात्री सॅम बहादूरचे स्पेशल स्क्रिनिंग झाले होते. चित्रपट पाहण्यासाठी आणि चित्रपटाच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूडचे सर्व मोठे सेलिब्रिटी आले होते. स्क्रिनिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण अशातच विक्की कौशलच्या कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
विकी कौशलचे आई-वडीलही स्क्रिनिंगला उपस्थित होते. विकी कौशलचे वडील शाम कौशल आणि आई वीणा कौशल कार्यक्रमात पोहोचताच अभिनेता पुढे आला आणि त्याने त्यांचे स्वागत केले. त्याने आधी पप्पांना मिठी मारली, नंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. यानंतर त्याने खाली वाकून आईच्या पायाला स्पर्श केला आणि भाऊ सनी कौशलला मिठी मारली आणि त्याच्यावरही प्रेमाचा वर्षाव केला. पापाराझीने हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद केला जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विकीच्या पालकांच्या साधेपणाने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली असतानाच, विकी कौशलच्या या कृत्याने चाहते वेडे झाले आहेत. चाहते या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि विकीच्या या संस्कारीपणाचे कौतुक करत आहेत.
याशिवाय पत्नी कतरिना कैफचा हात धरून 'सॅम बहादूर'च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये विकीने प्रवेश केला. आपल्या आवडत्या जोडप्याला एकत्र पाहून चाहते खूश आहेत. स्क्रिनिंगनंतर कॅट तिच्या सासूचा हात धरून तिला आणि दिर सनी कौशलला मिठी मारताना दिसली. विकी कौशलची फॅमिली बॉन्डिंग पाहून चाहते आता भावूक होत आहेत आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित 'सॅम बहादूर' चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. विकी कौशलने या चित्रपटात सॅम माणेकशॉची दमदार भूमिका साकारली आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख, नीरज काबी आणि मोहम्मद जीशान अय्युब यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट उद्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.