दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समांथा रुथ प्रभूनं आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ या तिच्या गाण्यानं अक्षरशः लोकांना वेड लावलं आहे. अशातच आधी घटस्फोट आणि त्यानंतर ‘मायोसिटीस’ या आजाराचं निदान.. यामुळे अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या आयुष्यात बरेच चढउतार आले आहेत. या आजारामुळे समांथाच्या आरोग्यावर बराच परिणाम झाला आहे. यामुळेच समांथानं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्याच्या कारणास्तत्व समांथानं हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.
या निर्णयानुसार जवळपास वर्षभर ती कोणत्याच प्रोजेक्टवर काम करणार नसून फक्त तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. यासाठी तिने आगामी चित्रपटांसाठी घेतलेली ॲडव्हान्स रक्कमसुद्धा निर्मात्यांना परत केल्याचं समजतंय. सध्या ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत ‘खुशी’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचं हे शेवटचं शेड्युल असून येत्या दोन ते तीन दिवसांत तेसुद्धा पूर्ण होईल. त्याचप्रमाणे तिने ‘सिटाडेल’ या सीरिजचंही शूटिंग पूर्ण केलं आहे.
मायोसिटिस म्हणजे काय?
मायोसिटिस या आजारामध्ये स्नायूंना वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ किंवा वेदना. याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकारशक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात, अशी माहिती फोर्टिस रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसिन विभागाच्या संचालिका डॉ. सुधा मेनन यांनी दिली.
समांथा ‘मायोसिटिस’ याच आजारानं ग्रस्त आहे. याबाबतची माहिती तिनं स्वतः सोशल मीडियावरील पोस्टद्वारे करून दिली होती. सध्या याच आजाराबरोबर तिची झुंज सुरू आहे.