गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर तुफान हिट ठरलं. या गाण्यावर अनेक सेलिब्रिटींनीही रिल बनवली होती. या पहिल्यावहिल्या यशानंतर संजूने मागे वळून पाहिलंच नाही.
सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. आनंदाची बाब म्हणजे ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं आता ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकलं आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला मिळाला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना संजू राठोड म्हणाला, “गायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करताना हे इतकं यश मिळेल याचा मी कधी विचारही केला नव्हता. अल्पावधीतच एवढं यश मिळालं यासाठी मी स्वत:ला फार भाग्यवान समजतो. आतापर्यंत माझ्या गाण्यांनी मिलियन (दशलक्ष) व्ह्यूजचा टप्पा पार केला, हाच आनंद माझ्यासाठी फार मोठा होता. त्यात आता न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर माझं गाणं झळकलं. यामुळे माझ्या आनंदात आणखी भर पडली आहे.
“माझा आनंद मला शब्दांत व्यक्त करता येत नाही आहे. हे सगळं शक्य झालं ते माझ्या चाहत्यांमुळेच. त्यांनी माझ्या गाण्यांना दिलेल्या प्रतिसादामुळे. त्यांच्या प्रेमामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली आहे. चाहत्यांचं ऋण मी कधीही विसरणार नाही. अशीच नवनवीन गाणी मी त्यांच्यासाठी कायम करत राहीन”, अशा शब्दांत त्याने आनंद व्यक्त केला.
‘गुलाबी साडी’ या गाण्याला ‘यूट्यूब’वर ७० दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ‘स्पॉटीफाय’वरही या गाण्याने १५ दशलक्षांचा टप्पा पार केला आहे. तसंच ‘युट्यूब’वरील जागतिक स्तरावरच्या उच्चांक गाठणाऱ्या व्हिडीओंमध्ये आणि ‘स्पॉटीफाय’च्या जागतिक व्हायरल गाण्यांमध्ये ‘गुलाबी साडी’ गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. संजू राठोडच्या ‘नऊवारी साडी’ या गाण्यानेही संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. त्यानंतर त्याचं ‘गुलाबी साडी’ हे गाणंसुद्धा सुपरहिट ठरतंय. “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ” या गाण्याच्या ओळी आणि संपूर्ण गाणं इतकं व्हायरल झालंय की त्यावर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही डान्स केला आहे.
‘गुलाबी साडी’ने केवळ एका महिन्यात युट्युबवर ११,०८६,४१७ व्ह्यूज मिळवले होते. तर या गाण्यावर इंस्टाग्रामवर साडेपाच लाखांहून अधिक रिल्स तयार करण्यात आले आहेत. संजू राठोड हा जळगावमधील धानवड तांडा इथला आहे. दहावीपर्यंतच्या शिक्षणानंतर त्याने डिप्लोमा करण्यासाठी प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्याला गायनाची खूप आवड होती.