संत मुक्ताबाई म्हणजे संत ज्ञानेश्वरांची बहीण. यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबाबतची पहिली झलक समोर आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही या बायोपिकची उत्सुकता लागून राहिली आहे. नक्की यामध्ये काय पाहायला मिळणार आहे हे जाणून घेऊयात.
जगाला दिव्यत्व समर्पित करून संत ज्ञानेश्वरांच्या मातापित्यांना देहदंड स्वीकारावा लागला. मातापित्याच्या देह त्यागानंतर हे अनन्यसाधारण कुटुंब सांभाळण्याची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईवर पडली. अन आईच्या निसर्गदत्त भावनेने आपल्या भावंडांची जणू ती माऊली झाली. मुक्ताबाईंचे साधेपण, अर्थपूर्ण विचार आपल्याला आजही विचार करायला भाग पडतात आणि स्त्रीमुक्तीची वेगळीच जाणीव निर्माण करत प्रेरणाही देतात. लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट दोन ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय.
अशा संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका पोस्टर मधून लहानपणीच्या मुक्ताई आणि ज्ञानेश्वरांची झलक पाहायला मिळत आहे. या पोस्टर मध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि मुक्ताच्या भूमिकेत चिमुकली ईश्मिता जोशी दिसत आहे.
मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांचं नातं विलक्षण होतं. मुक्ताई ज्ञानेश्वरांची कधी माता बनायची तर कधी बहीण तर कधी शिक्षक बनायची. ज्ञानेश्वरांना गुरु मानून मुक्ताईने त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात केले तर प्रसंगी त्यांनी ज्ञानेश्वरांना उपदेशही केला. संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनीही आदिशक्ती मुक्ताई असे वर्णन केले आहे.
मुक्ताईने आपल्या छोट्या आयुष्यात संत कवियत्रींच्या काव्यानुभवांचा पाया रचला. स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून देऊन त्यात स्त्री कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. त्यांनी निभावलेल्या माता भगिनी गुरु अशा विविध भूमिकांचे पदर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटातून उलगडणार आहेत.
चित्रपटात समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, आदिनाथ कोठारे, अश्विनी महागडे असे एकापेक्षा एक दमदार कलाकार आहेत.