Close

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत आता खुशबू तावडेची जागा‘ही’ अभिनेत्री घेणार (Sara Kahi Tichyasathi khushboo tawde to exit from the serial her place will be taken by this actress)

झी मराठी वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला. आता मालिकेत एक मोठा बदल घडणार आहे. कारण मालिकेत ‘उमा’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री खुशबू तावडेने या मालिकेचा निरोप घेतला आहे. याला कारण खुशबू गरोदर असून पुन्हा एकदा आई होणार आहे. खुशबूने आपला गरोदरपणाचा ७ महिन्याचा प्रवास मालिकेत काम करत पूर्ण केला आहे.

नुकताच सेटवर तिचा मालिकेतील शेवटचा दिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी तिने बऱ्याच आठवणी सांगितल्या. खुशबूच्या जागी आता मालिकेत नवीन अभिनेत्री दिसणार आहे.

मालिका सोडताना खुशबू म्हणाली, “उमा माझ्या हृदयाच्या खूप जवळची भूमिका आहे. जुलै 2023 मध्ये या मालिकेचं चित्रीकरण सुरु केलं होतं आणि पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी मला प्रचंड प्रेम दिलं. मालिकेतली खास आठवण सांगायची झाली तर ते म्हणजे आपले सण. जितके सण आहेत तितके या मालिकेत आणि सेटवर आम्ही साजरे केले. गंमत अशी की काही मालिका कधी- कधी आधी शूट करतात. पण आमचं नेमकं ज्यादिवशी जो सण आहे त्या सणाच्या दिवशीच आम्ही शूट करायचो. सेटवर वेगळीच ऊर्जा असायची. मालिकेमुळे मला उमाई म्हणून ओळख मिळाली आणि आता या उमाईची खऱ्या आयुष्यात आईची भूमिका आणि कर्तव्य सांभाळायची वेळ आली आहे.”

मालिकेतील उमाची भूमिका यापुढे अभिनेत्री पल्लवी वैद्य साकारणार आहे. “मला प्रचंड आनंद होतोय की पल्लवीसारखी एक उत्तम कलाकार ही भूमिका साकारणार आहे. या मालिकेचा पुढचा प्रवास सुंदर होऊ दे. कारण मला ‘सारं काही तिच्यासाठी’ने भरभरून दिलं आहे. जरी मालिकेला मी आता निरोप देत असली तरीही मालिकेवर माझा तितकाच जीव असणार आहे. मला पल्लवीचे मनापासून आभार मानायचे आहेत,” असं खुशबू पुढे म्हणाली. ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका दररोज संध्याकाळी 6.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

Share this article