मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं काल (१२ मे रोजी) निधन झालं आहे. रंगोत्सवात व्यासपीठावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबद्दल त्यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी माहिती दिली.
राजेश देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून ही दुःखद बातमी प्रेक्षकांना दिली. सतीश जोशी यांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले. ओम शांती ओम.”
सतीश जोशींच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून राजेश देशपांडेंनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सतीश जोशींनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. झी मराठीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतील त्यांची भूमिकादेखील गाजली होती. ‘यशोदा गोष्ट श्यामच्या आईची’ या मालिकेत ते शेवटचे झळकले होतं. दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांच्या बहुतेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. सतीश जोशींच्या निधनाची बातमी कळतानाचं सिनेसृष्टीतील कलाकारांना खूप मोठा धक्का बसला आहे.
अनेक कलाकारांनी रंगभूमीवर अखेरचा श्वास घेतला आहे. सतीश जोशी यांना देखील रंभूमीवरच देवाज्ञा झाली. ‘सृजन द क्रिएशन’ या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात सतीश जोशी देखील सहभागी झाले होते. सृजनोस्तव या रंगोत्सवाचा कार्यक्रम सुरू असतानाच त्यांचं निधन झालं.