मालिका असो वा कोणताही उपक्रम स्टार प्रवाह वाहिनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. दिवाळीच्या निमित्ताने असाच एक अनोखा उपक्रम राबवण्यासाठी स्टार प्रवाहचे कलाकार एकत्र आले. मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लावण्यासाठी स्टार प्रवाह परिवाराने शालेय उपयोगी वस्तू केअर इंडिया संस्थेत शिकणाऱ्या मुलींना भेट दिल्या.
स्टार प्रवाहच्या मालिकांच्या सेटवर तंत्रज्ञांपासून ते अगदी कलाकारापर्यंत प्रत्येकाने स्वेच्छेने पुढाकार घेतला आणि सुरुवात झाली एका अनोख्या संकल्पाची. प्रत्येकाने जमेल तशी मदत केली आणि ज्या दिवसाची उत्सुकता होती तो दिवस उगवला. प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता म्हणजेच तेजश्री प्रधान, लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील कला म्हणजेच ईशा केसकर, शुभविवाह मालिकेतील भूमी-आकाश म्हणजेच यशोमान आपटे आणि मधुरा देशपांडे आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील कलाकारांनी केअर इंडिया संस्थेला स्टार प्रवाहकडून दिवाळी भेट दिली.
डिस्ने स्टारशी जोडली गेलेली केअर इंडिया ही संस्था गेली अडीच वर्ष उडान या प्रोजेक्ट अंतर्गत मुलींच्या आधुनिक शिक्षणासाठी काम करत आहे. आर्थिक अडचणींमुळे ज्या मुलींना आधुनिक तंत्रज्ञान शिकता येत नाही अशा मुलींसाठी केअर इंडिया ही संस्था आधुनिक शिक्षण देते. शालेय शिक्षणाच्या जोडीला डिजिटल लर्निंग, फायनान्शिअल लिटरेसी, इंग्लिश कम्युनिकेशन या नवनव्या गोष्टी शिकवल्या जातात. जेणेकरून मुलींना त्यांच्या पायावर उभं राहता येईल. स्टार प्रवाह परिवाराने या मुलींना वह्या, पुस्तके, स्टेशनरी अशा शालेय उपयोगी वस्तू भेट देत यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने संस्मरणीय केली.