Close

अभिनेत्री शिवानी सुर्वेचं तब्बल ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन (Shivani Surve Comeback On Star Pravah After Nine Years Thod Tuz Ani Thod Maz Serial)

‘देवयानी’ मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्टार प्रवाह’ची नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मधून शिवानी तब्बल ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत ती मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचं साम्राज्य उभं केलं. आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमवावं असं त्यांना वाटतं. वडिलांचं स्वप्न मानसीला पूर्ण करायचं आहे. आपल्या कॉलेजची टॉपर गायत्री मॅडमच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित आहे. पण, आपल्या समोर कुणालाही जिंकू न देणाऱ्या गायत्रीच्या स्वार्थी स्वभावाची तिला कल्पना नाही.

दोघींमध्ये खरी ठिणगी तेव्हा पडते जेव्हा मानसी पदवी परिक्षेत टॉप करत गायत्रीचा रेकॉर्ड मोडते. मानसीला नाती जोडून ठेवायला आवडतात. कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही. नातं परिपूर्ण होण्यासाठी ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ असावं असं तिला वाटतं. यामध्ये प्रमुख भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार याबद्दल अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे फारच उत्सुक आहे. अभिनेत्री म्हणाली, “‘स्टार प्रवाह’ कुटुंबाबरोबर पुन्हा एकदा जोडली जातेय याचा मला आनंद आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेसाठी मी लगेच होकार दिला. मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं. ‘देवयानी’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे.”

दरम्यान, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही नवीन मालिका १७ जूनपासून रात्री ९ वाजता फक्त ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असणारी ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Share this article