अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘ॲनिमल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाची एक वेगळीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये पहायला मिळतेय. या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. ‘ॲनिमल’ प्रत्येक दिवशी कमाईचा नवीन विक्रम रचतोय. अशातच या चित्रपटाबद्दलची एक खास बात समोर आली आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूरचे जे आलिशान घर दाखवले आहे, ते घर म्हणजे सैफ अली खानचा पटौदी पॅलेस आहे. या दरम्यान या पॅलेसचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या चित्रपटाचं शूटिंग या पॅलेसमध्येच शूट करण्यात आलं आहे.
गुडगाव येथील १० एकर जमिनीवर हा पॅलेस बनवलेला आहे. या राजवाड्यात एकूण १५० खोल्या असून याची किंमत ८०० कोटी रुपये आहे. ॲनिमल चित्रपटाच्या आधी येथे मंगल पांडे, वीर-जारा, गांधी : माई फादर आणि मेरे ब्रदर की दुल्हन या चित्रपटांचे देखील शूट करण्यात आलेले आहे.
यावर्षी करीना कपूरने तिचा जन्मदिवस पटौदी पॅलेसमध्ये कुटुंबियांसोबत साजरा केला. करिश्मा कपूरने तिच्या बर्थ डेचे फोटो शेअर केले होते. याआधी २०२० मध्ये अभिनेत्री सोहा अली खानने या पॅलेसचा ड्रोन फोटो शेअर केला होता.
प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ॲनिमल या चित्रपटाने जगभरात कमाईचा १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला. आतापर्यंत ‘ॲनिमल’ने जगभरात तब्बल ४२० कोटींहून अधिक कमाई केली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचं भरभरून कौतुक होतंय. तर काहींनी त्यावर टीकासुद्धा केली आहे.