Close

आई (Short Story: Aai)

  • प्रियंवदा करंडे
    राणीने कवितेत डोकं खुपसलं. आई किती थोर आहे, आई किती महान आहे, प्रेमळ आहे, अशा आशयाची कविता वाचताना राणी रमून गेली. खरंच कवीने किती सुंदर रचली आहे ही कविता. कवितेचं नावच मुळी आहे ’आई!’
    ”काय गं रखमा, हात मोडलेत तुझे? पलंगाखाली झाडू कोण मारणार? तुझा काका?“
    रेवती एवढ्या जोरात रखमावर करवादली की तिची तीन वर्षांची मुलगी घाबरून रडायला लागली. रखमाने तिला जवळ घेतलं. आता रखमालाही रडू आलं. पण तिने आवरलं. इतक्यात,”गप गं कार्टे रडतेस कशाला?“ त्या छोटीला खस्सकन् ओढून बाजूला करून रेवती म्हणाली,”रखमा, या पोरीला कशाला आणलंस बरोबर? उद्यापासून आणलंस तर याद राख. काढ कचरा. मेल्यांना फुकटचा पगार पाहिजे…“ असं पुटपुटत रेवतीने टी. व्ही. लावला.
    रखमाने डोळे पुसले. छोटीला खोलीच्या एका कोपर्‍यात ठेवलं. राणी अभ्यास करत टेबलाशी बसली होती. रखमाने छोटीला सांगितलं, “छोटे गप गुमान बस. रडू नको बरं!”
    छोटीच्या हातात रखमाने कमरेला खोचलेल्या पिशवीतून चार कुरमुरे काढून ठेवले. छोटीने रखमाची पापी घेतली. तिच्या हडकलेल्या गालावरचे अश्रू छोटीच्या प्रेमाने पुसले गेले. छोटी खुदकन् हसली. मग रखमाने स्वच्छ केर काढून फरशी पुसून घेतली. राणीने कवितेत डोकं खुपसलं. आई किती थोर आहे, आई किती महान आहे, प्रेमळ आहे, अशा आशयाची कविता वाचताना राणी रमून गेली. खरंच कवीने किती सुंदर रचली आहे ही कविता. कवितेचं नावच मुळी आहे ’आई!’
    आई बाळाला जन्म देते
    त्यासाठी तीच मरणयातना भोगते
    आई बाळाला जिवापाड जपते
    त्यासाठी स्वतःचाच जीव पणाला लावते
    आई बाळाला मानाने जगवते
    त्यासाठी ती स्वतः अपमान सोसते
    आई बाळाला सर्वस्व देते, नको रे भरपाई म्हणते,
    उलट,’बाळा होऊ कशी उतराई’ हा एकच प्रश्‍न विचारत राहते.
    राणीची कविता वाचून झाली नि इतक्यात, ”राणी, बाळा, ये गरम दूध घे.” अशी रेवतीची हाक ऐकून राणी भानावर आली. ”आऽऽई” म्हणत लगेच जाऊन ती रेवतीला बिलगली.
    ”अगं, अगं… राणी आज काय एकदम प्रेम ऊतू जायला लागलं,” म्हणत रेवतीने तिचा पापा घेतला. ”असंच…” म्हणत राणीने दुधाचा ग्लास तोंडाला लावला.
    ”सफरचंद पण कापून ठेवलंय् हं. खा हं. बाळा!” म्हणून रेवती लिव्हिंग रुममध्ये आली. बघते तो काय! रखमा छोटीला राणीचं रंगीत पुस्तक दाखवून गोष्टी सांगत होती.
    ”छोटे, हे चित्र आहे राजाचं. हा राजाचा लय मोठा राजवाडा आहे… ही राणी नि ही आहे तिची राजकन्या…”
    ”ए रखमा…” तिच्या हातून खस्सकन पुस्तक ओढून रेवतीने ते सेंटरपीसवर ठेवलं. छोटीला मांडीवरून तिच्या बखोेटीला धरून फरफटत जमिनीवर लोटलं. म्हणाली, ”अगं, लाज कशी नाही वाटत तुला? ना कामाकडे लक्ष ना धड कामं होत आहेत तुझ्याकडून… अगं फर्निचरचं डस्टिंग काय तुझा बाबा करणार? आणि ही कार्टी कशाला आणलीस्?” छोटीला रागाने खाऊ की गिळू असं रेवतीला होत होतं…
    तशी घाबरून रखमाने छोटीला कुशीत घेतलं. छोटीला आता ताप आला होता. ती थरथरत होती.
    ”बाई… छोटीला ताप भरलाय्… मी … मी… करते समंदी कामं… नका बोल लावू उगा…”
    रखमा दीनवाण्या शब्दात म्हणाली.
    ”का नको ओरडू? फुकटचं गिळायला हवं तुला… स्वतःचा जीव जगवता येत नाही आणि वर असली दळभद्री पोर जन्माला घातलीस… हवीत कशाला तुम्हाला पोरं?”
    रेवती रागाने धुमसत होती. पण ते ऐकून रखमाचा बांध फुटला. ”अहो बाई… असं काय वंगाळ बोलता तुम्ही?… नको नको… असलं माझ्याने नाय ऐकवत… अहो माझी एकलीच पोरगी आहे ही… ही तेवढी हाती लागली. माझा काळजाचा तुकडा आहे ह्यो मुलगी म्हंजे… पाच सात पुस्तकं मी बी शिकलीय्… हिला तर… मला खूप… खूप शिकवायचं छोटीला… हिला नका काय पण बोलू… मला बोला… मला मारा…” रखमा बोलायला लागली ती थांबेचना.
    तिच्या मनाला रेवतीच्या शब्दांनी दुखावलं, घाबरवलं… एवढ्यात ती भानावर आली.
    ”बाई, थोेडे उपकार करा हो! घोटभर दूध देता का पोरीला? बघा तरी… कशी निपचित पडलीय…” असं म्हणत रखमा रेवतीच्या पायावर पडली.
    ”तुझी नाटकं पुरे कर रखमा! दूध काय पाणी पण नाही देणार! खोटं बोलून फसवू नकोस. लाग कामाला…” रेवती फुत्कारली.

  • इतक्यात खाणंपिणं आटोपून राणी बाहेर आली. आपल्या आईचं असं बोलणं ऐकून ती गोंधळली. इतके दिवस आपण शाळेत होतो, खेळात, नातेवाईकात, आपल्या इतर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये दंग होतो… या लॉकडाऊनच्या 7-8 महिन्यात फक्त घरात… आईबाबांबरोबरच होतो, पण आज इतक्या महिन्यानंतर रखमाला शेवटी कामाला बोलवावंच लागलं… आईनेच तर बोलावलं अर्जन्टली! तिची कंबर धरली, पाठ दुखायला लागली… इंजेक्शन्स घ्यावी लागली… शेवटी आई बाबांना म्हणालीच, ” आता रखमाला कामाला बोलावतेच… नाहीतर मी आजारी पडणार… ” रखमा लगेचच आली. छोटीची कुठे व्यवस्था लावू शकली नाही म्हणून तिला आणलं म्हणाली. छोटीला ताप आला आहे, ती मलूल दिसतेय्… मग आई अशी का वागतेय? रखमाच्या भावना तिला कळत नाहीत?
    रखमा पण एक आई आहे आणि माझी आई पण एक आई आहेच ना? मग तिला का कळत नाही रखमाचं दुःख? कवितेतल्या आईप्रमाणे रखमा अपमान सहन करत राहणार… हो ना? राणीच्या कोवळ्या मनाला काही कळेनासे झाले.
    ती धावत जाऊन रेवतीला बिलगून म्हणाली, ”आई, मला भीती वाटते गं!“
    ”अगं अगं तू का थरथरतेस वेडे?” म्हणत रेवतीने तिला घट्ट मिठीत घेतलं
    ”अगं, अगं, राणी… शांत हो. सांग बरं… काय झालं?” रेवतीने प्रेमळपणाने विचारलं.
    ”आई, छोटीला काय झालं तर? आई… रखमामावशी पण एक आई आहे ना? आई… तुला उद्या कोणी असं बोललं तर ? मला खूप घाबरायला होईल… खूप रडू येईल… गं… आई… छोटीला माझ्यातलं दूध देऊ का गं? बोल ना गं आई…तूच रखमा मावशीला आधी कामाला नको येऊस सांगितलं ना? तुझी कंबर किती दुखत होती ना मग? तू झोपून होतीस ना किती दिवस? आज रखमा मावशीला आग्रहाने बोलवलंस ना? आई ती सुद्धा खूप दमली आहे गं… जाऊ दे ना! तू सांभाळून घे ना तिला… नको गं ओरडूस छोटीच्या आईवर… कुठचीही अगदी जगातली कुठचीही आई खूप मोठी असते. थोर असते गं…”
    आणि आता राणी ओक्साबोक्शी रडायलाच लागली. अगदी हुंदके देऊन! आपल्या दहाबारा वर्षाच्या मुलीचे ते बोलणं ऐकून रेवतीलाही आता रडू फुटलं. ती एकदम हलून गेली. ”राणी… राणी… अगं नको रडूस… खरंय् तुझं… तू जशी माझी लाडाची लेक आहेस तशीच अगदी तश्शीच छोटी पण रखमाची लाडाकोडाची लेक आहे… मी… मी आईचा धर्म विसरले… एका आईनेच दुसर्‍या आईचा मान राखला पाहिजे, हे अगदी बरोबर आहे तुझं… ये, ये, आत….छोटीला दूध देऊ आपण…“ म्हणत दोघी स्वैपाकघरात गेल्या.
    एका कपात दूधसाखर घालून नीट ढवळून रेवतीने स्वतः त्या मुलीला… छोटीला दूध पाजवले. मग रखमाला म्हणाली, “रखमा… तूही थोडं खाऊन घे.“
    आता राणी अगदी नॉर्मल झाली होती. प्रेमभराने तिने आईला मिठी मारली. दोघीही छान हसू लागल्या . बसल्या जागेवरून टाळ्या पिटत छोटीही हसायला लागली आणि हसणार्‍या छोटीचं निरागस हसू पाहून रेवतीला मनोमन जाणवलं, छोटीने खरंच मला माफ केलं…

Share this article