Close

अघटीत (Short Story: Aghatit)

  • विनायक शिंदे
    धुरासारखी एक सावली वडीलांच्या शरीरात प्रवेश करीत होती. काही वेळातच वडीलांच्या शरीरात चेतना आली आणि ते चक्क हलायला लागले. चंदनकडे पाहून त्यांनी मृदू ओळखीचे हास्य केले.
    सकाळपासूनच चंदन अस्वस्थ होता. रात्री झोप पण त्याला तशी उशीराच लागली. नंतर त्याला पडलेले भयंकर स्वप्न! स्वप्नात तो एका लांब-रूंद लक्झरी बसमधून प्रवास करीत होता.
    यापूर्वी त्याने असली गूढ काळोखी चमत्कारीक बस आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. दोन्ही बाजूला प्रवाशांसाठी मऊ गुबगुबीत सीट्स होत्या. कंडक्टरला मध्येे फिरायला कुठल्याच बसमध्ये नसते तेवढी ऐसपैस जागा होती. सर्व प्रवासी जरा चमत्कारीकच वाटत होते.
    अर्धवट-अपुर्‍या प्रकाशात त्यांचे भेसुर चेहरे पाहून सर्वसामान्य माणसाच्या काळजात नक्कीच भीतीने गोळा उठला असता. ते सर्वजण पृथ्वीवरले वाटत नव्हते. कुठल्यातरी अनाकलनीय ग्रहावरचे ते प्रवासी वाटत होते.
    सर्वजण मोठा विनोद केल्यासारखे खुळ्यासारखे हसत होते. हसताना त्यांच्या तोंडातले सुळे दिसत होते. या असल्या भयाण चमत्कारीक, भयाण माणसांसमवेत आपण का प्रवास करतो आहे? आणि ही बस नेमकी कुठे जाणार आहे? हेच त्याला कळत नव्हते.
    त्याच्या बाजूचा प्रवासी आपल्या शरीराचा भार त्याच्या अंगावर टाकून खुशाल घोरत होता. त्याच्या डोक्यावर पांढर्‍या केसांचे दाट जंगल होते. पांढरी शुभ्र दाढीही चांगली हातभर लांब होती. दाढीचे लांब केस अधूनमधून त्याच्या नाकात शिरत होते. त्याने त्या सहप्रवाशापासून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला आणखीनच चिकटला. इतका की त्याला श्‍वास घ्यायला अडचण यायला लागली.
    कुठून तरी दैत्य अचानक प्रगट व्हावा तसा हत्तीच्या अंगाचा आणि जिराफाच्या उंचीचा कंडक्टर पुढ्यात दत्त म्हणून प्रकटला. त्याचे पसरट नाक, काळाकुट्ट वर्ण आणि इंगळासारखे लाल डोळे, कुरळ्या दाट केसांचे त्याचे डोके गाडीच्या टपाला लागत होते.
    तो चंदनला कुत्सित चेहरा करून काही तरी विचारत होता; पण ती कोणती भाषा आहे तेच त्याला कळत नव्हते. अचानक काय झाले कुणास ठाऊक, पण तोंडाने चमत्कारीक आवाज करीत ते प्रवासी एकमेकांच्या जीवावर उठल्यासारखे एकमेकांना मारायला लागले.
    पाहता पाहता तिथे रणधुमाळी माजली, आता मात्र चंदनला तिथे बसणे असह्य झाले, कसेही करून निकराने अंगावरचे धूड बाजूला ढकलायचे व पळत जाऊन बसचा दरवाजा गाठायचा व कसलाही विचार न करता चालत्या बसमधून सरळ रस्त्यावर उडी घेण्याचा त्याने निश्‍चय केला.
    अचानक बसचा वेग भयंकर वाढला. तो इतका वाढला की बस हवेत चालते आहे, असे वाटायला लागले. त्या भन्नाट वेगाचा परिणाम म्हणून की काय ड्रायव्हरचा ताबा सुटला व बस रस्ता सोडून कोलांट्या उड्या मारीत खोल दरीत कोसळली. तिथे असलेल्या खोल जलाशयात ती वेगाने तळाशी गेली. चंदनच्या नाका तोंडात पाणी गेले.
    ‘वाचवा…वाचवा’ तो जीवाच्या आकांताने ओरडला. क्षणभर आपण कुठे आहोत तेच त्याला कळेना. त्याने डोळे उघडले. तो स्वत:च्या घरात होता. नाईटलॅम्पच्या प्रकाशात त्याने समोरच्या घड्याळ्यात पाहिले. पहाटेचे पाच वाजले होते.
    बाहेरच्या निरव शांततेत कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. एकदा बोलता बोलता त्याच्या ऑफिसातला कानविंदे म्हणाल्याचे त्याला आठवले. तो म्हणाला होता,‘पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात.’ त्याच्या मामाच्या मुलाला मुंबईत त्याचे वडील कोकणातल्या त्यांच्या घराच्या विहीरीतल्या
    पाण्यावर तरंगत आहेत असे पहाटे स्वप्न पडले होते आणि दुसर्‍या दिवशी त्याचे वडील विहीरीत पडून निवर्तल्याची वाईट बातमी त्याच्या कानावर येऊन धडकली.
    त्या कानविंदेला चमत्कारीक विषयांची दुर्मिळ पुस्तके मिळवून त्याची पारायणे करायची सवय होती. त्यानेच चंदनला दोन दिवसांपूर्वी एक पुस्तक वाचायला दिले होते. त्याचे नाव होते ‘मृत्यूनंतरचे जग’, कुठल्यातरी इंग्लीश विषयावर सखोल संशोधन केलेल्या लेखकाच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी लेखकाने केलेला तो मराठी अनुवाद होता.
    तेच पुस्तक चंदन रात्री उशिरापर्यंत वाचत होता. काय लिहिले आहे लेखकाने? या औत्सुक्यापोटी त्याने ते वाचायला घेतले होते. पण नंतर तो त्यात चांगलाच गुंतून पडला. त्यात लेखकाने म्हटले होते,‘मनुष्याचे निधन झाल्यावर आत्मा कुठल्या तरी अज्ञात शक्तीने खेचल्यासारखा मृत शरीरापासून विलग होतो. आपण मेलोे आहे हे तो कितीतरी वेळ मान्य करायला तयार नसतो. सगे-सोयरे शोक करताना दिसतात पण त्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचत नाही. क्षणभर त्याला आपल्या मृत शरीरात प्रवेश करावासा वाटला तर त्याला त्याला तसे करता येत नाही.
    चंदन वाचनात एवढा गुंग झाला की त्याच्या डोळ्यांच्या पापण्या जड होऊन त्याने अर्धवट झोपेत लाईट बंद केला कधी व तो पलंगावर कलंडला कधी, ते त्याचे त्यालाच कळले नाही.
    सकाळी उठल्यावर ऑफिसला दांडी मारण्याची इच्छा त्याच्या मनात पुन्हा पुन्हा फेर धरायला लागली; पण लगेच त्याच्या मनात वेगळाच विचार आला. आपण घरी बसलो तर रात्री पडलेले भयंकर स्वप्न आपल्या मनात घर करून राहील व त्याचा आपल्यालाच त्रास होईल. त्यापेक्षा ऑफिसला जाऊन कानविंदेकडून शंका निरसन करता येईल.
    साडेदहा वाजता त्याने ऑफिसच्या कँटीनमध्ये कानविंदेला गाठले व हळू हळू कुणाला समजणार नाही अशा भाषेत त्याला ते स्वप्न अगदी सविस्तर सांगितले व तो त्याच्या उत्तराची अपेक्षा करीत त्याच्या चेहर्‍याकडे पाहायला लागला. क्षणात त्याचा चेहरा गंभीर झालेला दिसला. नंतर दीर्घ श्‍वास घेत तो म्हणाला, “चंदन, हे सर्व गंभीर आहे. मला वाटतं आज उद्या तुला एखादा लांबचा प्रवास घडणार आहे?”
    “मग त्यात मला अपघात होईल?”

  • “ते मी सांगू शकत नाही; पण तुझ्या जवळच्या व्यक्तीला धोका संभवतो.”
    तेवढ्यात चंदनचा मोबाईल वाजला. फोन त्याच्या गावाहून आला होता. आतमध्ये व्यवस्थित ऐकू येत नव्हते म्हणून तो ऑफिसच्या बाहेर थेट रस्त्यावर गेला. फोनवर थोरला हरिकाका बोलत होता, “चंदन मी हरिकाका बोलतोय! तुझ्या वडिलांना रात्री जोरदार अटॅक आला. त्यांना शिरपूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे. परिस्थिती गंभीर आहे. अजिबात हयगय करू नकोस. असशील तसा निघून ये.”
    हे सरकारी हॉस्पिटल कुठे आहे? तिथवर कसे पोचायचे? त्याला सर्व विचारण्याआधीच पलीकडून फोन कट झाला. त्याने पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न केला तर तो लागेला.
    गेली आठ-दहा वर्षे त्याचा गावाशी संपर्क तुटला होता. त्याच्या पश्चात स्थानिय आमदार बबनराव जाखडे यांच्या प्रयत्नांमुळे गरीब जनतेसाठी सरकारी रूग्णालय सुरू झाले होते.
    तो मिळेल ती एस.टी पकडून तसाच उपाशीपोटी लवकरात लवकर वडीलांची शेवटची गाठभेट होण्यासाठी रवाना झाला. तसं म्हटलं तर एस.टी प्रवास हा सुखकर म्हणायला हवा. रडतखडत का होईना लवकरात लवकर एस.टी मुक्कामाला नेण्याचा कंडक्टर व ड्रायव्हरचा प्रयत्न असतो.
    वाटेत एका छोट्याशा टपरीवर त्याने चहा घेतला. तेव्हा कुठे त्याच्या मरगळलेल्या शरीराला किंचित उभारी आली. गाडीच्या वेगाबरोबर त्याला त्याच्या वडीलांचा कठोर चेहरा आठवत होता. प्राथमिक शिक्षक ते हेडमास्तर हा त्यांचा प्रवास तसा एकेरी का होईना यथासांग पार पडला होता. त्यांना लांडीलबाडी व ऐतखाऊपणा याची भयंकर चीड होती. त्यांच्या जरा जास्तच स्पष्टवक्तेपणामुळे त्यांनी आयुष्यात अनेक माणसे गमावली होती.
    त्याचा एक लहान काका होता. तो तालुक्यातल्या कॉलेजात शिकायला होता. दिसायला देखणा व अत्यंत मृदू स्वभावाचा असा तो होता. एकदा एकाकी कॉलेज सोडून तो कायमचा गावी आला. दोन्ही भावांनी खडसावून विचारले तरी स्वारी सांगायला तयार नाही. सर्वांशी अबोला धरला. त्याच्या जवळच्या मित्रांकडून कळले की कुठल्यातरी मुलीने त्याचा विश्‍वासघात केला होता.
    तो धक्का त्याला सहन झाला नाही. नंतर नंतर तर हातभट्टीची दारू झोकून रात्री अपरात्री घरी यायला लागला. गावातल्या पोरींना पाहून अचकट-विचकट चाळे करायला लागला. चंदनच्या वडीलांना हे त्याचे वेडे चाळे सहन झाले नाही. त्यांनी त्याला चांगली बेदम मारहाण करून कायमचे घरातून हाकलून लावले.
    एके दिवशी धरणाच्या खोल पाण्यात त्याचा फुगून वरती आलेला मुडदा दिसला होता. त्याने आत्महत्या केली होती.
    तो कसाबसा शोधत-शोधत त्या सरकारी रूग्णालयात पोहचला. तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. खाटेजवळ त्याची आई बसली होती. त्याला पाहिल्यावर ती धाय मोकलून रडायला लागली. ऑक्सिजन सिलेंडर लावून वडीलांच्या तोंडावर मास्क लावलेला होता. त्यांना श्‍वास घ्यायला त्रास होत होता. घुर्र घुर्र असा विचित्र आवाज मास्कमधून येत होता.
    डॉक्टरांनी चेक केलं व सगळं संपलं आहे, असा मानेने इशारा केला. वडिलांनी चंदनला काहीतरी सांगण्यासाठी हात वरती केला तर तो तसाच खाली येऊन आपटला.
    वडीलांच्या शरीराची हालचाल थंडावली. पुस्तकात वाचल्याप्रमाणे आत्मा अंतरिक्षात जाताना दिसतो काय म्हणून चंदन बॉडीच्यावरती पाहायला लागला तेव्हा त्याला एकदम धक्का बसला.
    धुरासारखी एक सावली वडीलांच्या शरीरात प्रवेश करीत होती. काही वेळातच वडीलांच्या शरीरात चेतना आली आणि ते चक्क हलायला लागले. चंदनकडे पाहून त्यांनी मृदू ओळखीचे हास्य केले. तेव्हा त्याला एकदम आठवले. खुशीत आला की धाकटा काका अगदी असाच हसायचा. तिथे उभे असलेले डॉक्टर राठोड डोळे फाडून पुन्हा पुन्हा वडीलांच्या चेहर्‍याकडे
    पाहत होते.

Share this article