Close

भंगलेले देऊळ (Short Story: Bhanglele Deul)

भंगलेले देऊळ

  • माधव रानडे
    दुसर्‍या दिवशी मिथिला जेव्हा जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये पोहोचली, त्यावेळी दहाला पाच मिनिटे कमी होती. डॉ. फडके वेळेच्या बाबतीत खूप कडक होते. बाहेर मांडलेल्या खुर्च्यांवर आजोबा व इतर पेशंटचे नातेवाईक बसले होते. आजोबांनी मिथिलाकडे पाहून स्मितहास्य केले. त्यावर तिने देखील मनापासून अभिवादन केले.
    “मुली, तुझी हरकत वा कोणी दुसरे यायचे नसेल तर मी बाजूला बसू
    शकतो काय?”
    “पोरी, मी तुझ्याशी बोलतोय? तुला माझे म्हणणे नीट ऐकू आले नाही काय? मी या बेंचवर बसण्याबाबत विचारत आहे?”
    “सॉरी आजोबा. मी माझ्याच विचारात होते. त्यामुळे मी तुमचे बोलणे नीट ऐकू शकले नाही. मला माफ करा. तुम्ही आनंदाने या बेंचवर बसू शकता.”
    आजोबांनी एक स्मितहास्य केले आणि बेंचवर बसले. रविवारचा दिवस असल्यामुळे पार्क पूर्ण भरला होता. आजुबाजूची सर्व बाके व जागा लोकांनी भरून गेल्या होत्या. आजोबांची नेहमीची जागादेखील कोणीतरी आधीच बळकावली होती. कोपर्‍यातील एक बाक रिकामा आहे हे पाहताच ते तेथे आले. बाकावर एक पोरसवदा मुलगी आपल्याच विचारात गढलेली होती. आजुबाजूचे वातावरण खूपच आनंदाचे व उत्साहाचे होते.
    निरनिराळ्या वयोगटातील व पोषाखातील मुलेमुली, तरुण तरुणी व वृद्ध मंडळी या वातावरणात समरस होऊन गेली होती. आजोबांनी रुमालाने आपला चेहरा पुसत बाजूच्या त्या तरुणीकडे पाहिले. ती अजूनही आपल्याच विचारात गुंग होती. आजुबाजूच्या परिस्थितीविषयी तिला काही देणे घेणे नाही, असा तिच्या चेहर्‍यावरचा भाव स्पष्टपणे दिसत होता. आता मात्र आजोबा थोडे गंभीर झाले होते. बाजूची तरुणी कोणत्या तरी गहन समस्येविषयी आपल्या विचारांशी संघर्ष करीत आहे, याची त्यांना जाणीव झाली होती की काय कोणास ठाऊक, पण त्या तरुणीच्या शालीन व सौम्य चेहर्‍याकडे पाहून आजोबांना त्या मुलीविषयी सहानुभूतीची व कणवतेची भावना जागृत झाली होती. तिच्या त्या चिंताग्रस्त चेहर्‍याबाबत त्यांच्या मनात एक काळजी व एक अनामिक आपुलकी निर्माण झाली होती. त्यांनी तिच्याकडे पाहत अतिशय सौम्य व प्रेमळ आवाजात विचारणा केली. “काय ग. मघापासून मी पाहत आहे, तू गप्प गप्प बसली आहेस व कसल्यातरी गहन विचारात
    स्वतःला बुडवून घेतले आहेस. मी तुझा कोणी नातेवाईक नाही हे मी जाणतो पण वडीलकीच्या नात्याने तुला विचारावेसे वाटत आहे की, एवढी कशाची काळजी लागून राहिली आहे तुला? की जी तुझे मन आतल्या आत काळजीने जाळीत आहे. मी तुला काही मदत करू शकतो काय? तू आपल्या काळजीत माझा सहभाग घेणे पसंत करशील काय? तुला अशी खिन्न बसलेली मला पाहवत नाही.”
    “आजोबा या जन्मात प्रत्येकालाच आपले भोग स्वतःच भोगावे लागतात. दुसर्‍यांनी कितीही मदत केली तरी अडचणींना व संकटांना तोटा नसतो. माझ्या दुर्दैवी प्रारब्धाला तुम्ही किती वेळा ठिगळ लावणार आहात? आजोबा तुम्ही जी आपुलकी मला दाखवली त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. पण कृपया तुम्ही मला एकटीलाच सोडून द्या. मलाच माझ्या डोंगराएवढ्या अडचणीवर उपाय शोधून काढावा लागणार आहे.”
    “मुली, मी तुला अशा चिंताग्रस्त अवस्थेत नक्कीच एकटीला सोडून जाणार नाही. मी तुझा कोणी नातेवाईक नाही. आपली अजून पूर्ण ओळखदेखील झाली नाही. आपणा दोघांना एकमेकांची नावे, व्यवसायदेखील माहीत नाहीत. उण्यापुर्‍या दहा मिनिटांच्या या धावत्या सहवासात मी तुझ्याबद्दल एवढा विचार करायला नको हे तुझे म्हणणे व विचार मला पटले नाही. जरी आपण या क्षणाला
    एकमेकांचे कोणीही नाही तरी मानवतेच्या दृष्टीने आपले नाते घट्ट आहे. तू मला आजोबा म्हणालीस. त्याच अधिकाराने मी तुला तुझ्या
    मनःस्थितीबाबत विचारणा केली. आता तू जास्त वेळ न घेता या तुझ्या आजोबांना तुझ्या समस्यांमध्ये दाखल करून घे. आपण दोघे मिळून नक्कीच तुझ्या अडचणींवर मात करू किंवा योग्य तो मार्ग तरी शोधू याची मला पूर्ण खात्री आहे.”
    “आजोबा मी मिथिला वसंतराव देशमुख. मी स्टेनो टायपिस्ट आहे व मी एका वकिलाकडे नोकरी करते. आमचे कुटुंब माझ्या पगारावर चालते. माझे वडील एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. पण तब्येतीच्या कारणामुळे नोकरी सोडावी लागली. माझी आई मला जन्म देऊन अवघ्या तीन दिवसात देवाघरी गेली. त्या क्षणापासून बाबांनी माझे आईवडील होऊन लहानाचे मोठे केले. पडेल ते काम करून मला शिक्षण दिले. माझ्या सुखासाठी त्यांनी दुसरे लग्न केले नाही. मी बारावी झाले आणि माझे शिक्षण थांबवले. कारण मला नोकरी करणे गरजेचे होते. माझे इंग्रजी चांगले होते. मी शॉर्टहॅण्ड व टायपिंग शिकले व एका प्रसिद्ध वकिलाच्या घरी नोकरीला लागले. माझ्या पगारात माझे घर सुरळीत चालत होते. सर्व काही ठीक चालले होते. पण आमच्या अडचणी मात्र संपायला तयार नव्हत्या. बाबांना काम करून त्रास होत होता. पण मी काळजीत पडेन म्हणून त्यांनी आपला त्रास माझ्यासमोर कधीच जाहीर केला नाही. पण एके रात्री ते आपली छाती जोरजोरात चोळत झोपेतून जागे झाले. त्यांना असह्य वेदना होत होत्या व ते लहान मुलांसारखे रडत होते. मी खूप घाबरून गेले. काय करावे हेच मला सुचत नव्हते. मी हलक्या हाताने छातीला मालीश केले. त्यांच्या वेदना कमी झाल्या.
    दुसर्‍या दिवशी मी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांची व्यवस्थित तपासणी केली. त्यांचा चेहरा खूप गंभीर दिसत होता. त्यांनी मला छातीचा एक्सरे काढावयास सांगितला व काही औषधे लिहून दिली. त्यांना छातीचा कॅन्सर झाल्याचा रिपोर्ट आला तेव्हा मात्र मी हादरून गेले. डॉक्टरांनी मुद्दामच त्यांना आजाराबद्दल काही सांगितले नाही व मलाही सांगण्यास मनाई केली. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे दर पंधरा दिवसाला बाबांना ‘लाइट’ घ्यावा लागत होता. एका वेळचे दोन हजार असा त्यांचा खर्च होता. मी न डगमगता याचा सामना करीत होते. परंतु दारिद्य्र आणि अडचणी या पाठीला पाठ लावून येणार्‍या बहिणींप्रमाणे असतात. माझ्या बाबतीत अगदी तेच होत होतं. पण मी माझी घालमेल कोणालाच सांगू शकत नव्हती. उद्या रविवार आहे आणि मला बाबांना ‘लाइट’ देण्याकरिता डॉ. फडके यांच्या जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये सकाळी दहा वाजता जायचे आहे. पण माझी पैशांची सोय झाली नाही. हे महिना अखेरचे दिवस आहेत, त्यामुळे प्रत्येक जण आर्थिक तंगीत असणार. कोणापुढे हात पसरण्याचीही लाज वाटते. आपली गरज, आपली लाचारी जन्मापासूनच आपल्यासोबत आहे. त्याची सावली दुसर्‍यावर का पाडायची. एक माणुसकी म्हणून तुम्ही मला हे बोलायला भाग पाडलं, पण जग केवळ माणुसकीवरच चालत नाही. तर त्याला आर्थिक पाठबळ लागत असते. मी तुम्हाला आणखी मनस्ताप देऊ इच्छित नाही. मला माझ्याच पद्धतीने माझी अडचण दूर करावी लागणार आहे.”
    “थांब, मिथिला थांब. अशी टोकाची भूमिका मनात ठेवून निघू नको. माणुसकी ही फक्त समोरच्या व्यक्तीच्या दुःखावर फुंकर घालण्याकरिताच नसते तर ती माणुसकी समोरच्या दुःखी व्यक्तीला मदतीचा हात देण्यासाठी देखील दाखवली जाते. मिथिला, तू उद्या सकाळी नेहमीच्या वेळी आपल्या वडिलांसह जीवनरेखा दवाखान्यात हजर राहणार आहेस. तेथे तुझ्या बाबांना नेहमीप्रमाणे ‘लाइट’ देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. आता प्रश्‍न उरला तो मी कोण? आणि मी तुझ्याबद्दल एवढी आपुलकी व माणुसकी का दाखवत आहे. या सार्‍याची उत्तरे तुला उद्या दवाखान्यात मिळतील. त्यामुळे आजोबाच्या नात्याने मी तुला हुकूम करतो की, तू माझ्या सर्व आज्ञांचे पालन काटेकोरपणे कर.”
    दुसर्‍या दिवशी मिथिला जेव्हा जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये पोहोचली त्यावेळी दहाला पाच मिनिटे कमी होती. डॉ. फडके वेळेच्या बाबतीत खूप कडक होते. बाहेर मांडलेल्या खुर्च्यांवर आजोबा व इतर पेशंटचे नातेवाईक बसले होते. आजोबांनी मिथिलाकडे पाहून स्मितहास्य केले. त्यावर तिने देखील मनापासून अभिवादन केले. मिथिलाने आपल्या बाबांच्या नावाचे कार्ड तेथील कर्मचार्‍याला दिले. त्यावर त्याने ते कार्ड घेऊन तिला दोन हजार भरल्याची पावती दिली. ते पैसे आजोबांनीच भरले असणार. ह्याबद्दल तिच्या मनात शंंका नव्हती. तिच्या बाबांचा दुसरा नंबर होता. बाबांना तिने एका खुर्चीत बसवले व ती आजोबांच्या दिशेने चालत त्यांच्याजवळ आली. ती काही विचारणार इतक्यात आजोबाच तिला प्रेमळ शब्दात म्हणाले. “मिथिला, तुझे बाबा आत तपासणीला गेले की आपणास तब्बल अर्धा तास वेळ आहे. त्या अर्ध्या तासात मी तुझ्या प्रत्येक प्रश्‍नाची उत्तरे देईन. आता तू बाबांकडे लक्ष दे.”

  • मिथिलाच्या बाबांचा नंबर आल्यावर ते डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. आता आजोबा व मिथिला हे दोघेच बाहेर बसले होते. आजोबांनी मिथिलाच्या प्रश्‍नार्थक चेहर्‍याकडे पाहिले आणि सांगू लागले. “मिथिला, मी वामन हरी खरे. केंद्र सरकारच्या आयकर खात्यात मी एक वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेला पंच्याहत्तर वर्षाचा गृहस्थ आहे. कुटुंबाच्या व नातेवाइकांच्या नात्याने मी एकटाच आहे. लग्नानंतर पाच वर्ष मूलबाळ होत नाही म्हणून मी पत्नीला तपासणीसाठी दवाखान्यात आणले. डॉक्टराच्या तपासणीत तिच्या पोटात एक मोठा मांसाचा गोळा असल्याचे दिसून आले. त्यामुळे गर्भाशयाला धोका निर्माण झाला आहे. परिणामी ऑपरेशन करणे आवश्यक ठरले. परंतु ऑपरेशन होण्यापूर्वीच अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर मला खूप नीरस व एकाकी वाटू लागले. लोकांनी दुसर्‍या लग्नाबाबतही विचारणाही केली. परंतु मी त्याला विरोध केला. मी सर्वार्थाने एकाकी पडलो होतो. माझा बराचसा वेळ कामात आणि चार लोकात जायचा. मी घरी दोन विश्‍वासू नोकर ठेवले, जे माझी सर्व कामं विनातक्रार करीत. सेवानिवृत्तीनंतर मी संपूर्ण देश फिरलो व शेवटी या शहरात स्थिरावलो. रोज संध्याकाळी मी या पार्कमध्ये येऊ लागलो. काही काळानंतर मला येथील वातावरणाचा सराव झाला. तेथेच तुझ्या बाबांबद्दल समजल्यानंतर माझं मन हेलावलं. डॉ. फडके माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांना तुझ्या बाबांविषयी विचारले. मिथिला, तुझे बाबा कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला आहेत. केवळ नियमित लाइट घेण्यामुळे जीवन जगत आहेत. पण पुढे या लाइटचादेखील काही उपयोग होणार नाही. ऑपरेशन करणं हा एक उपाय असला तरी ते किती यशस्वी होईल, याची खात्री डॉक्टरांनाही नाही. शिवाय हे ऑपरेशन अतिशय खर्चीक आहे. तेव्हा पुढे काय करायचं याचा निर्णय तुलाच घ्यावा लागणार आहे. डॉक्टर तुला स्वतःच हे सांगणार होते. परंतु ती जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. आज मी सहानुभूतीपोटी तुला दोन हजाराची मदत केली ते तुझ्यावर उपकार म्हणून नव्हे तर केवळ शब्दांनी तुझ्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी तुझी ही गरज पूर्ण करण्यासाठी केलेली एक छोटीशी मदत म्हणूनच, हे लक्षात ठेव.”
    आजोबा बराच वेळ बोलत होते आणि मिथिला शब्दन्शब्द आपल्या कानात साठवत होती. बाबांचे प्राण हे पाण्यातील देऊळ आहे याची जाणीव तिला थोडीफार होतीच पण आजोबांच्या स्पष्ट बोलण्यानंतर ती अधिकच दृढ झाली. आता निर्णय तिला घ्यायचा होता. आपली लाचारी आणि गरिबी उघड्यावर आणून कोणाकडूनही भीक घ्यायची नाही, हे तिचे ठाम मत होते. आता तिच्यासमेार एकच पर्याय होता तो म्हणजे या कटू सत्याचा स्वीकार. डॉक्टरांच्या केबिनमधील घंटी वाजत होती. दुसर्‍या पेशंटला आत सोडावे याची सूचना डॉक्टरांनी वॉर्ड बॉयला दिली होती. जड पावलांनी ती डॉक्टरांच्या केबिनकडे निघाली होती.
    त्या घटनेच्या चौथ्या दिवशी मिथिलाच्या बाबांची तब्येत अचानक खूपच खालावली. दवाखान्यात नेण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.
    स्वतःच्या दुःखावर व भावनांवर नियंत्रण ठेवून तिने लगेच आजोबांशी संपर्क साधला व घरी येण्याची विनंती केली. वैकुंठभूमीत वडिलांच्या चितेला अग्नी देताना मिथिला मनात म्हणत होती. “तुमच्या उपचारांसाठी लागणारा पैसा मी कधीच जमा करू शकले नसते. माणुसकी म्हणून मला आजोबांनी मदत केली असली तरी, असं उधारीचं जीवन माझ्या स्वाभिमानी बाबांनी कधीही जगू नये ही माझी मनःपूर्वक इच्छा होती. म्हणूनच ऑपरेशन न करण्याचा कटू निर्णय मी घेतला. तुमच्या लेकीला या गुन्ह्याकरिता माफ करा.”

Share this article