Close

गनिमी कावा (Short Story: Ganimi Kawa)

  • मधुसूदन फाटक
    ‘ए वेडे, ते इतकं सोपं नसतं ग. त्यात खूप फसवणूक असते. म्हणून ते खूळ घेऊन जगणार्‍या मुलींची बहुतेक वाताहातच होते.’ आई तिला सतत समजावत असते.
    येल्लमा, अक्कलकोट पलीकडल्या कर्नाटकी मुलखातील एका गावची मुलगी. सावळा वर्ण, काळेभोर तेजस्वी डोळे, उफाड्याची अंगलट आणि हल्लीच सतराव्या वर्षात पदार्पण केलेली आकर्षक मुलगी. कुटुंब सधन शेतकरी. शिवाय दुग्धव्यवसाय जोडधंदा म्हणून बहरलेला. एकंदरीत सुखवस्तु पण मनाने पोर सतत अस्थिर. त्यात चित्रपट पाहण्याचे प्रचंड वेड. समोरच्या पडद्यावर दिसणार्‍या प्रत्येक हिरॉइनच्या जागी ती स्वतःला पाहायची. आपणही एक दिवस हिच्या जागी असणार असे स्वप्न पाहणारी, स्वप्नाळू अल्लड आईच्या मागे सतत भुणभूण लावायची, ‘मला चित्रपटात जायचंय गं आई.’
    आई मात्र तिला सतत झटकून टाकायची. ‘ए वेडे, ते इतकं सोपं नसतं ग. त्यात खूप फसवणूक असते. म्हणून ते खूळ घेऊन जगणार्‍या मुलींची बहुतेक वाताहातच होते.’ आई तिला सतत समजावत असते.
    तरी आपण चित्रपटात हिरॉइन झालो आहोत, अशा स्वप्नावर ती कशीबशी दिवस ढकलत असते. शिक्षणात तर तिचे मुळीच लक्ष नव्हते.
    हुशार असूनसुद्धा. अखेर एका मैत्रिणीकडून ती जुजबी माहिती काढते.
    येल्लमा, अगं त्यासाठी मुंबईला जायला लागतं. मी एका कास्टिंग एजंटचा पत्ता देते, तेथे जाऊन त्याला भेट आणि थोडी रोख रक्कम हातावर टेकव. तुझं स्वप्न पुरं होईल. बघ प्रयत्न करायला काय हरकत आहे?
    ती मैत्रिण येल्लमाची कॉलेजमधली वर्गमैत्रिण. पण हिच्याशी नेहमी स्पर्धा करायची. येल्लमा तिला तिच्या करिअरमधे काट्यासारखी खुपत असे. त्यामुळे तिचा काटा काढण्याचा हा जालीम उपाय ती अवलंबते. यात येल्लमाची वाताहत होणार हे तिला स्वानुभवाने माहीत होते, तरीही अशी दुष्ट इच्छा बाळगणारी ती मैत्रिण?
    येल्लमा एक दिवस रात्री बॅग भरून गुपचूप रेल्वे स्टेशन गाठते. काही नोटाही बॅगेत कोंबते आणि मुंबईकडे जाणार्‍या पहिल्या गाडीत बसते. दुसर्‍या दिवशी पहाटे पहाटे महाराष्ट्रात ट्रेन धडकते आणि जागरूक असलेली येल्लमा मुंबईपर्यंत न जाता, एका मोठ्या स्थानकावर उतरते. बोर्ड वाचते. ठळकपणे लिहिलेली पाटी - ‘पनवेल’ तिची सामान्य माहिती तिला जाणीव करून देते, पनवेल? अरे, हे तर मुंबईच्या सिमेवरील स्टेशन.
    चला, म्हणजे आपण योग्य ठिकाणी पोहोचलो. तिची हुशारी आधीच तिला बजावते. घरच्यांनी चौकशी केली तर ते मैत्रिणीला विचारणारच आणि ती दुष्ट मुलगी नक्की सांगणार ‘ती मुंबईला गेली.’ तेव्हा तेथून काहिसे अंतरावर उतरायचे. शोधा म्हणावे मला मुंबईत. गवताच्या गंजित सुई शोधण्यासारखे होईल आणि मग द्याल शोध सोडून. येल्लमा हातातील कार्ड पुन्हा पुन्हा न्याहाळत सून्नपणे बसून असते.
    व्यस्त अशा त्या पनवेल स्थानकावर गाडीतून उतरलेल्या प्रवाशांची सामानाची आवराआवर करून आपापल्या गावाकडे जाण्याची धांदल चाललेली असते. या एकाकी मुलीकडे पाहण्यास कोणालाही वेळ नसतो. तरीही या सभ्य कुटुंबवत्सल प्रवाशांशिवाय काही टपोरी तरुणही आपलं सावज हुडकत फिरत असतातच. अशांपैकी एक टपोरी तरुण येल्लमाचे सौंदर्य न्याहाळत तिच्या समोरच्या बाकावर टक लावून असतो. हा माणूस आपल्याला मदत करेल, कारण तो रिकामा दिसतो आहे, असा कयास काढून येल्लमा त्याच्या शेजारी बसते.
    आपण मुंबईचे का? येल्लमा कानडी हेल काढत
    त्याला विचारते.
    हो. सोलापूरहून येऊन आता लोकलची वाट पाहतो आहे. आपण?
    मी अक्कलकोटहून आले. मला चेंबुरला जायचे आहे.
    कसे जायचे?
    तो गृहस्थ खुष होतो. अच्छा, म्हणजे ही देवदासी दिसते. मिळाले आपल्याला हवे ते, अलगद हातात पडतंय की.
    होअहो मला तिकडेच जायचंय. मित्राच्या गाडीची वाट पाहत आहे. हवं तर तुम्हाला पोहोचवून देईन. विश्वास असला तर बघा. यायचे की नाही ते.
    येल्लमा अधीर झालेली असते. चेंबूरमधील त्या कास्टिंग एजंटला भेटायला. ती लगेच होकार देते.
    तुमचे आभार कसे मानावे? तुमचे भाडेही देईन हं.
    इतक्यात त्या इसमाचा मित्र एक जुनाट गाडी घेऊन अवतरतो. आल्याबरोबर मित्राला त्या बाईकडे पाहायला लावून डोळे मिचकावतो.
    ‘गॉट इट’ म्हणून त्याला टाळी देतो.
    चला बाई. तुम्ही गाडीत पुढे बसा. आम्ही दोघे मागे बसतो म्हणजे पर स्त्रीला ऑकवर्ड वाटायला नको.
    तिघांसह गाडी दक्षिणेकडे सुसाट सुटते. येलम्मा काहीशी चक्रावते. चेंबूर तर उत्तरेकडे असायला हवे. भुगोलाचा काहीसा अभ्यास केलेली ती जागी होते. पण आता खूप उशीर झालेला असतो. एव्हाना गाडी मावळतीच्या दिशेने वळते. मावळते सूर्यबिंब लाल छटा फेकताना दिसतात. अरे, म्हणजे आपली वाटचाल समुद्राच्या दिशेने? येलम्मा जरा चरकते पण तसे दर्शवित नाही.
    अखेर गाडी किहीम गावानजिकच्या एका सी रिसॉर्टपाशी थांबते.

  • चला बाई, उतरा येथे. आम्ही नव्हे आपण जेवून घेऊ आणि मग जाऊ चेंबूरला.
    आता मात्र येलम्मा चांगलीच टरकते. त्या रिसॉर्टचा अंदाज घेताना तिला अनेक गडद मेकअप केलेल्या महिला पुरुषांशी लगट करीत फिरताना दिसतात. अधूनमधून बाटल्यांची बुचे फोडण्याचा आणि दारुचा वासही आसमंत भरून राहिलेला तिच्या नाकात शिरतो.
    हं चला बाई, ह्या खोलीत विसावा घ्या. ही आमचीच बुकिंग केलेली खोली.
    अहो, पण सकाळपासून काही खाल्लेले नाही. मला खूप भूक लागली आहे. सकाळपासून मला नुसते गाडीतून फिरवत आहात. या गतीने चेंबूर केव्हा गाठणार, येलम्माने विनवणीच्या सुरात विचारले.
    हो हो. करतो ना ती व्यवस्था. कारण आज काही आपण पुढे जात नाही आहोत. खूप काळोख पडलाय. आता कोणीही भेटणार नाही. आज येथेच विश्रांती, आराम करा. उद्या पुढील प्रवास. एक टपोरी मधाचे बोट लावतो.
    अहो, पण येथे बसायला एकही खुर्ची नाही.
    येलम्माची शंका.
    खुर्ची? अहो तो बेड आहे ना. चांगला लांबरुंद. दोन इसम व्यवस्थित झोपतील असा. त्यावरच बसा. हरकत नाही. नाहीतरी आज तेथेच ’ काही मिनिटात येतोच हं जेवणाची व्यवस्था करून.
    तो जातो आणि काही वेळातच एका जाडजूड इसमाला घेऊन येतो. काळा कभिन्न वाढत्या वयाचा तो माणूस वखवखलेल्या नजरेने येलम्माकडे टक लावून पाहतो आणि जिभल्या चाटतो. येलम्माला प्रचंड किळस येते. इतक्यात तो टपोरी इसम टपकतो आणि येलम्माला सुनावतो.

  • हे सद्गृहस्थ तुम्हाला रात्री सोबत करतील. हे म्हणतील तसं वागायचं. त्यांना खुश करायचं आणि ते देतील त्या नोटा पदरात टाकायच्या. ठीक. आता जेवायला चला कॅन्टीनमध्ये.
    येलम्माच्या अंगावर शहारे येतात. आपण कशात अडकलो आहोत ते तिला कळून चुकतं. आणि तिचा सुपीक मेंदू कामाला लागतो.
    एक विनंती करू? मला ना जेवणाच्या पूर्वी कुल्फी खायची सवय आहे. आमची गावी मोठी डेअरी आहे. तेथील प्रसिद्ध कुल्फी खायला संध्याकाळी खूप भीड असते.
    तेव्हा प्लीज.
    ठीक आहे. चला, कॅन्टीनमध्ये मिळते का बघुया. तिघेही कॅन्टीनकडे कूच करतात. समोर आलेली कुल्फी येल्लमा बकाबक खायला लागते आणि काही वेळातच प्रचंड ठसका लागल्याचे नाटक करते.
    ओ, काही हो हे, स्टेल आहे वाटते. जरा बाथरूममध्ये वमन करून येते.
    एकटीच बाथरूममध्ये घुसते. तेथील खिडकी उघडते तेव्हा तिला खाकी गणवेशातला इसम फेर्‍या मारताना दिसतो. येलम्मा त्याला खुणावते आणि मला बाहेर घ्या अशा खुणा करते. तो हवालदार समजून जातो काहीतरी गडबड आहे. कारण रिसॉर्टमध्ये काय चालते याची त्याला कल्पना असते. दरवाजा धाडदिशी उघडून तो आत घुसतो आणि येलम्माला बाहेर जा म्हणून खुणावतो. येलम्मा झटदिशी बाहेर पडून पळायला लागते. लांब गेल्यावर एका कुटुंबवत्सल घरात शिरते आणि त्यांना सर्व हकीकत सांगते. अशी गनिमी काव्याने देह विक्रयातून येलम्मा स्वतःची सुटका करून घेते.

Share this article