Close

लपलेले रहस्य (Short Story: Laplele Rahashya)

  • विनायक शिंदे

    माझे वैभवशाली व्यक्तिमत्त्व माझ्या यशाला कारणीभूत आहे, असे भाबडे प्रेक्षक म्हणतात; पण हे त्यांचे बोल मला तितकेसे पटत नाहीत. नुसत्या देखण्या रुपावर कधीच कोणी कलाकार मोठा होणार नाही, तर त्याच्या सर्वांग सुंदर अभिनयाची लखलखती तलवार त्याच्या हातात सदैव तळपत राहायला हवी असे मला तरी वाटते.

  • ’स्वतः स्वतःची स्तुती करणारा तो एक मुर्ख जाणावा’, असे रामदास स्वामी चारशे वर्षांपूर्वी म्हणून गेले होते. त्यांचे म्हणणे योग्य आहे; पण मी म्हणते, ते बोलणे सत्य असेल तर बोलायला काय हरकत आहे. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुलेखा सुर्वे - म्हणजे मी रंगभूमी तसेच कलाक्षेत्रात आपल्या तडफदार-लवचिक अभिनयामुळे तेजाने चमकते आहे. असे माझे रसिक प्रेक्षक व समीक्षक म्हणतात. (निरनिराळी मासिके, साप्ताहिके, दिवाळी अंक यात माझ्या मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत.) मला मिळतात ते रोल मी लेखक व दिग्दर्शकांशी विचार विनिमय करून करते; त्यामुळेच अत्यंत यशस्वी झाले असतील. रंगदेवता व कुलस्वामीनीचा आशिर्वाद व रसिकांचे प्रेम माझ्या पाठीशी असल्यामुळे त्या गाजल्या - असे मला मनापासून वाटते. देवावर माझी अपार श्रद्धा आहे.
    ढोर मेहनत, अहो भाग्यम् असे यशाबद्दल कोणी काहीही म्हटले तरी देवच कर्ता करविता आहे, यावर माझा विश्वास आहे. याच श्रद्धेमुळे माझी यशस्वी वाटचाल सुरू आहे. भूमिका मिळवण्यासाठी मी कधीही कुठल्या निर्माता/दिग्दर्शकापुढे हांजी हांजी केले नाही. किंवा कोणाच्या जाळ्यात अडकले नाही. माझे वैभवशाली व्यक्तिमत्त्व माझ्या यशाला कारणीभूत आहे, असे भाबडे प्रेक्षक म्हणतात; पण हे त्यांचे बोल मला तितकेसे पटत नाहीत. नुसत्या देखण्या रुपावर कधीच कोणी कलाकार मोठा होणार नाही, तर त्याच्या सर्वांग सुंदर अभिनयाची लखलखती तलवार त्याच्या हातात सदैव तळपत राहायला हवी असे मला तरी वाटते. नाटकातले कलाकार संधी मिळताच रंगभूमीकडे पाठ फिरवून छोट्या पडद्याकडे वळतात. अशी प्रेक्षकांची आम्हा कलाकारांबद्दल कायम ओरड असते. मी म्हणते - “मोठ्ठे व्हायला कोणाला आवडणार नाही? पैसा - प्रसिद्धीही कोणाला नकोशी झाली आहे? मलाही ती हवीच होती. ताकाला जाताना भांडे लपवण्यात काय हशील?”
    अगदी सुरुवातीला एका मराठी चित्रपट निर्मातीची (मालती मधुकर) मला ऑफर आली तेव्हा मी सुखावले. लगेचच त्यांना होकार कळवला. कथा/पटकथा चित्रीकरण / दर्जेदार निर्मिती मूल्ये असलेला तो मराठी चित्रपट (सत्वपरीक्षा) चांगलाच गाजला. माझ्या भूमिकेची रसिकांनी वारेमाप स्तुती केली. तेव्हा कुठे मराठी सिरियल्स निर्मात्यांचे माझ्याकडे लक्ष वेधले. फुक्कटचा मानभावीपणा किंवा खोटा अहंकार मला अजिबात आवडत नाही. मी त्यांना होकार दिला. नशीबाने मला भूमिकाही चांगल्या मिळत गेल्या. माझ्या अंगातल्या अभिनय गुणांचा कस पणाला लावून मी त्या केल्या. टी. व्ही. वरून थेट आपल्या हृदयात लोकांनी मला कधी कायमचे स्थान दिले ते माझे मलाच कळले नाही. मी जिथे जाईन तिथे प्रेक्षक मला ओळखून माझ्या कौतुकाचे शब्द माझ्या कानावर टाकायचे, तेव्हा मला भरून यायचे. सरकारी खात्यात माझे एखादे काम असेल तर तिथले कर्मचारी आनंदाने माझे काम चुटकीसरशी करायचे.
    नुकतेच तीन मराठी चित्रपट निर्माते आपल्या आगामी चित्रपटात मी काम करावे म्हणून माझी विनंतीवजा मनधरणी करून गेले. यशाची कमान माझ्या सभोवताली फेर धरायला लागली होती. त्याने मी सुखावून गेले. पुरेसे पैसे जमल्यावर मी परळच्या कामगार वस्तीतली जागा सोडून सांताक्रूझला पॉश लोकवस्तीत चांगला आलिशान फ्लॅट घेतला. माझे हे वैभव पाहायला बाबा हयात असते तर नक्कीच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले असते. आयुष्यभर नाटक सिनेमात छोट्या मोठ्या भूमिका करून त्यांनी कशीबशी गुजराण केली. त्यांचा एवढा वकूब असूनही त्यांना एकदाही त्यांच्या ताकदीचा रोल मिळाला नाही. याचीच खंत त्यांना शेवटापर्यंत बोचत राहिली. नंतर तर त्यांचे मानसिक संतुलन ढळून ते दारूच्या आहारी गेले. विपन्नावस्थेत त्यांचा अंत झाला.
    त्यांच्यानंतर आईने दुःख गिळून मोठ्या हिंमतीने मला वाढवले. तिला देवाने जसे सुंदर रूप दिले होते तसाच गोड गळा दिला होता. माहेरी असताना तिचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण पूर्ण झाले होते. अंगी गुणवत्ता असूनही दुसर्‍यांची खोटी स्तुती करून स्वतःची पोळी भाजून घेण्याची जी वृत्ती सर्वत्र आढळते ती तिच्याकडे औषधालाही नसल्यामुळे ती मागे राहिली. त्यामुळे मुख्य गायिकेच्या पाठी कोरस गाणार्‍या गायिकांत तिला स्थान मिळाले. जात्याच तिला गाण्याची उपजत जाण असल्यामुळे तिला कामाचा कधीच तोटा पडला नाही. नामवंत संगीतकार कोरससाठी कायम तिच्या नावाचा आग्रह धरायचे. एक-दोन चित्रपटात तिने आईच्या फटकळ भूमिकाही केल्या होत्या. आमच्याकडे उपजिवीकेसाठी दुसरे काही साधन नसल्यामुळे मी जशी मोठी झाले तेव्हा चार मराठी चित्रपटात कुठे शाळेतली मुलगी- तर कधी भाऊबीज मधली छोटी बहिण तर कधी भिकार्‍याची मुलगी अशा नगण्य भूमिका मी केवळ पैसे मिळतात म्हणून केल्या. आज ते दिवस आठवले की अगदी भडभडून येते.
    कधीतरी फुरसतीच्या वेळी आई मला बाबांबद्दल खूप काही सांगायची. त्यांचे बालपण सुखात गेले होते. नगरला त्यांचा चौसोपी वाडा होता. त्यांचे वडील त्या काळात नावाजलेले फौजदारी वकील होते. लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरीत होती. सिनेमाच्या वेडापायी तिच्या वडिलांनी आठवीत असताना शाळा सोडली व घरी कुणालाही न कळवता मुंबईचा रस्ता धरला. त्या काळात आजच्या सारखी सिनेमा व्यवसायाला प्रतिष्ठा नव्हती. बाबांच्या वडिलांनी कुळबुडव्या म्हणून त्यांचे नाव कायमचे टाकले. त्यांनीही अखेरपर्यंत घराचे नाव घेतले नाही.
    माझ्या वडिलांचा दुसरा वीक पॉइंट म्हणजे त्यांना असलेली ज्योतिष विद्येबद्दलची आवड! जसा मोकळा वेळ मिळेल तसा त्या विद्येचा त्यांनी सखोल अभ्यास केला. कित्येकांची त्यांनी सांगितलेलेली भाकिते नंतरच्या काळात खरी ठरली परंतु त्यांच्या गुरूने त्यांना सांगितलेले त्यांचे भविष्य - तू फार मोठा कलाकार होशील. तुला नाव मिळेल. तुला अफाट संपदा मिळेल. हे सर्व अक्षरशः सपशेल खोटे ठरले होते. भविष्य वेडावरून आठवले - मलाही लहानपणापासून गूढ विद्या, काळी जादू, जुने वाडे, जुन्या हवेल्या - किल्ले, हत्यारे, जुनी नाणी याबद्दल कमालीचे आकर्षण होते. भूताखेतांच्या भयंकर गूढकथा मला वाचायला आवडत. त्या वेडातून मी सुप्रसिद्ध भयकथा लेखक - नारायण धारप यांचे अर्धे अधिक साहित्य वाचले होते. नवीन नाटककारांना मी जेव्हा माझ्यासाठी एखादे रहस्यमय नाटक लिहा - असे आग्रहाने सांगत असे, तेव्हा ते माझ्याकडे चमत्कारिक पाहत असत. ते म्हणत, “मॅडम, या काळात रहस्यमय नाटक लिहिले तर ते पाहणार कोण? पन्नास वर्षांपूर्वी लोक ’महल’, ’मधुमती’, ’बीस साल बाद’ असे रहस्यपट आवडीने पाहत असत.”

  • ’कुलवधू’, ’दिवा जळू दे सारी रात’, ’वाहतो ही दुर्वांची जुडी’ अशी नाटके त्या काळात तुफान चालत; पण आता हे सर्व कालबाह्य झालेलं आहे. चित्रपट, नाटके यांचा ट्रेंड इतका बदलला आहे की तसले काही नव्याने इथे आणण्याची कल्पनाही कुठला निर्माता करणार नाही. त्यांचे पण काय चुकले म्हणा; बाजारात जो माल खपतो तोच विक्रेता विकणार! कधी कधी तुमची सुप्त इच्छा-विचार एक अज्ञात - अदृश्य शक्ती ऐकते-वाचते व तसल्याच विचारसरणीच्या व्यक्तिशी अनपेक्षितपणे तुमची गाठ घालून देते. माझ्या बाबतीत नेमके तसेच घडले.
    एका सकाळी मी स्टुडिओमध्ये जाण्याअगोदर माझ्या टी.व्ही. सिरीअलच्या शेड्युलच्या तारखांची डायरी तपासत होते. तेवढ्यात दरवाजावरली बेल वाजली. मी दरवाजा उघडला. तर दरवाजात एक टक्कल पडलेले व मजबूत देहयष्टी असलेले गृहस्थ उभे होते. मी म्हणाले, “या सर, बसा.”
    एक नजर फिरवीत, टक्कलावर जमलेला घाम रुमालाने पुशीत ते म्हणाले, “मॅडम, आपण विचारण्याअगोदर मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. मी चित्रपट निर्माता - राम देवनाळे… आपण मला ओळखणे शक्यच नाही; कारण मी या व्यवसायात पडलो तेव्हा तुम्ही फार तर पाच-सहा वर्षांच्या असाल. त्या काळी माझा ’वाट चुकलेला नवरा’ हा चित्रपट फार गाजला होता. त्याने रौप्य महोत्सवी यश गाठले होते.”
    मी किंचित हसले व म्हणाले, “तुमचे नाव मला माहीत आहे; कारण माझे बाबा, मा. विनोद यांनी तुमच्या अनेक चित्रपटात लहान-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. इतक्या वर्षांनी तुम्ही या वयात नव्या जोमाने चित्रपट काढता आहात हे ऐकून बरे वाटले! परंतु, सद्या तरी मी टी.व्ही. सिरीयलमध्ये काम करते.”
    “ठाऊक आहे मला… मी एक रहस्यपट काढतो आहे. त्याचे नाव पण ठरले आहे. ’हा काय चमत्कार’ त्यातल्या नायिकेच्या भूमिकेसाठी तुमचा चेहरा मला एकदम योग्य वाटतो. आमचे दिग्दर्शक विजय कापडी यांनीच मला तुमचे नाव सुचवले.”
    मी क्षणभर अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहात राहिले; कारण इतकी वर्षे मी जी संधी शोधत होते ती अशी काहीही न करता चालून आलेली पाहून मला आश्चर्य वाटले व फार आनंद झाला. कोणीतरी माणूस माझ्याप्रमाणे विचार करतो आहे हे ऐकून बरे वाटले.
    “साहेब, माझ्यासारख्या नवथर मुलीवर विश्वास दाखवून माझा जो तुम्ही मान राखलात त्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे.”
    “मॅडम, तुम्हाला जर आभार मानायचे असतील तर ते नाटककार आशिष फेपरे यांचे माना; कारण तुमच्या नावाला त्यांच्या पत्नीने नकार दिला तरी शेवटपर्यंत त्यांनी तुमची बाजू लावून धरली.”
    “अरे व्वा, कोण कोणाला कधी मदत करील हे सांगता यायचे नाही. मला सांगा ही रहस्यकथा कशी आहे?”
    “ट्रेड सिक्रेट म्हणून मी तुम्हाला या क्षणी सर्व कथा सांगू शकणार नाही. पण ती पुनर्जन्मावर आधारीत आहे. ती चारशे वर्षांपूर्वीच्या एका जुनाट वाड्यावर घडते.”
    “इंटरेस्टींग… मला पहिल्यापासून गुढ-रहस्य हा विषय फार आवडतो. प्रेक्षकांना क्षणा-क्षणाला धक्का देत असली कथा पुढे सरकते आणि शेवट तर कल्पनेपलीकडला…”
    “मॅडम, या विषयातली तुमची रुची व सखोल ज्ञान आमचा चित्रपट उत्कंठावर्धक बनायला नक्कीच मदत करील.”
    चित्रिकरणासाठी निवडलेला तो वाडा अजूनही चांगल्या अवस्थेत होता. इतिहास प्रसिद्ध गणोजी शिर्के यांच्या वंशजानी पेशवाईच्या अधेमधे तो बांधला असावा असे तिथले जुने जाणते नागरिक सांगत. गावात तशी वस्ती तुरळक होती. तो वाडा बहुधा कोल्हापूर-विशाळगड रस्त्यावर होता. तिथे शिवकाळात त्या दुर्लक्षित गावात वसाहती होत्या. छोटे छोटे बुरूज व तट उद्ध्वस्त अवस्थेत दिसत होते. दगडी बांधकाम केलेल्या दोन समाध्या व जीर्ण अवस्थेला पोचलेल्या एका शिवमंदिराचे अवशेष दिसत होते. इंग्रजी अंमलात बांधलेला एक भरभक्कम वाडा गूढ गतकालीन वैभवाच्या खुणा दाखवीत होता. राम देवनाळेनी शुटींगची जय्यत तयारी केली होती. तिथले सरपंच त्यांचे नातलग असल्यामुळे पुरेसे मनुष्यबळ त्यांनी उपलब्ध करून दिले होते. सर्व व्यवस्था चोख होती. त्या चित्रपटाचे मान्यवर दिग्दर्शक देवदत्त यांनी मला त्यांच्या असिस्टंटसह वाड्याची पाहणी करण्यास सांगितले.
    मी भीत भीत त्या वाड्यात प्रवेश केला. वाड्यासमोर एक पुरातन पिंपळवृक्ष दिसत होता. मी सहज वरती नजर टाकली तेव्हा माझ्या अंगावर भीतीचा काटा उभारला. सर्व फांद्यावर घुबडे दाटीवाटीने बसली होती व ती आपली नजर माझ्यावर रोखत घुत्कार टाकीत होती. त्यामुळे तिथले वातावरण गूढ वाटत होते. त्या पिंपळाला कधी काळी चांगला भरभक्कम पार बांधला असावा, पण आता त्याची भयंकर पडझड झालेली दिसत होती. तिथे वयाची शंभरी गाठलेला एक जख्खड म्हातारा एका सुटलेल्या दगडावर बसला होता. त्याची उंची जवळजवळ सहा फुट असावी. त्याचा मुळचा गोरापान रंग आता उडाला होता. मानेची कातडी लोंबत होती. त्याच्या खोल गेलेल्या डोळ्यात वासनेचा विकार अजूनही दडलेला दिसत होता. त्याची एकंदरीत शरीरयष्टी पूर्वीच्या राजघराण्यातील पुरुषांसारखी होती. मी असिस्टंटकडे त्याची चौकशी केली. तेव्हा तो म्हातारा गणोजी शिर्के यांचा शेवटचा वंशज आहे असे कळले. तो माझ्याकडे डोळे फाडफाडून पाहत होता. मग मीही त्याला निरखून पाहिले आणि माझ्या डोक्यात कुठली तरी अनामिक शक्ती गोल गोल फिरते आहे असे वाटले. घड्याळाचे सर्व काटे वेगाने फिरताहेत असे वाटले.
    माझ्यात क्षणात घडून गेलेला बदल मला विस्मित करून गेला. तिथले वातावरण, तो पुरातन वाडा, नदी आणि तो म्हातारा यांनी मी कधीतरी जवळून पाहिले आहे, असे वाटले. या वाड्याच्या पाठच्या अंगाला एक मोठी खोल विहीर होती. ती इतकी खोल होती की आत डोकावल्यावर नुसताच काळोख दिसत होता. मी उत्सुकतेने पाठीमागे गेले तर ती विहीर अजूनही शाबूत होती. आतल्या दिवाणखान्यात दोन झुंबर अजूनही लटकत होते. क्षणात माझा देह पिसासारखा हलका वाटत होता. माझ्या देहात मी नव्हते. दुसरेच कोणीतरी माझ्या देहावर ताबा मिळवून बसले होते. इतक्यात पाठीमागे कोणाची तरी सावली हलली, मी एकदम दचकले. मागे तो म्हातारा फाटलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहात होता. त्याला पाहून माझे पित्त खवळले. माझ्या डोक्याची शीर ताडताड उडायला लागली.

  • मी मोठ्याने ओरडले, “मल्हारराव, दोन खून पचवूनही तू अजून जिवंत आहेस? आपली विखारी वासना शमवायला तुला मी हवी होते. तुझा कुटील डाव माझ्या नवर्‍याच्या जयसिंगरावाच्या वेळीच लक्षात आला. तेव्हा त्याने तुला जोरदार प्रतिकार केला… म्हणून तू त्याचा विश्वासघात करून या विहिरीत ढकलून खून केलास.”
    “चंद्रकला, तुझा पुनर्जन्म झालाय. मी तुला सोडणार नाही. त्या वेळी विहिरीत उडी मारून जीव दिलास आणि माझ्या तावडीतून बचावलीस.”
    “थेरड्या, मी तुला अशी सुखी सोडणार नाही. तुला हालहाल करून मारणार… तू पापी आहेस म्हणून इतकी वर्षे जगलास… पण आता तुझे दिवस भरले.”
    मी त्याच तिरमिरीत वाड्यात गेले. तिथे एका खड्ड्यात लपवून ठेवलेली नंगी तलवार घेऊन बाहेर आले. त्याचा चेहरा घामाने निथळत होता. तो थरथर कापत होता. इतकी वर्षे लपून राहिलेले रहस्य उघडे पडले होते. तो खुनी होता. अपराधी होता.
    “मल्हारराव, वासनेने डबडबलेले हे तुझे विखारी डोळे फोडून टाकते. तुझे हात-पाय तोडून टाकते.”
    सारे युनिट माझ्याकडे आ वासून पाहत होते. हा नेमका काय चमत्कार आहे हे माझे मलाच कळत नव्हते. तेवढ्यात तो अंगात दोन पाऊल टाकण्याचे त्राण नसलेला मल्हारराव परसदारी असलेल्या त्या खोल विहिरीकडे गेला व त्याने आपला देह त्या विहिरीत झोकून दिला. एक आर्त किंकाळी सर्वांना ऐकू आली. मल्हाररावचा कपाळमोक्ष होऊन क्षणात त्याचा मुडदा विहिरीच्या तळाशी गेला. मी ती तलवार फेकून मोठमोठ्याने हसायला लागले.
    “मेला, मल्हारराव मेला… एक पाप या जगातून कायमचे नाहिसे झाले.” असे म्हणून मी धाडकन् जमिनीवर कोसळले. माझी शुद्ध हरपली. युनिटमधल्या लोकांनी माझ्या तोंडावर पाण्याचे हबकारे मारले, तेव्हा मी बर्‍याच वेळाने शुद्धीवर आले. समोर उभे राहून राम देवनाळे साहेब माझ्याकडे आश्चर्याने पाहात होते. त्यांना मी प्रश्न केला, ”साहेब मी कुठे आहे? हे सर्वजण माझ्याकडे असे वेगळ्या नजरेने का पाहत आहेत?”
    त्यावर ते हसून म्हणाले, “सुलेखा मॅडम घाबरू नका. आपण जिवंत आहात. आपला पुनर्जन्म झाला आहे.”

Share this article