- शैली माथुर
“तू पण कमाल करतोस हं. अरे, मेकओव्हर तर मी सहा महिन्यांपूर्वीच केला होता.” “पण मला तो आजच दिसून आलाय. कळलं?” अत्यंत प्रेमळ नजरेचा माझ्याकडे कटाक्ष टाकून नितीनने कूस बदलली. मी मात्र मेकओव्हरच्या जंजाळात अडकून सहा महिने आधीच्या काळात जाऊन पोहचले…
एखादा दिवस खूप चांगला उजाडतो… अगदी अविस्मरणीय ठरतो. असं काही आज माझ्या बाबतीत घडलं होतं. अख्खा दिवस अगदी आनंदात गेला होता. म्हणूनच शेजारी झोपलेल्या नितीनकडे पाहिलं,
तर त्याच्याविषयी खूप प्रेम दाटून आलं. थोड्या वेळापूर्वीच त्याच्या सहवासात घालविलेले ते रोमँटिक क्षण डोळ्यापुढे तरळले… “का रे बाबा, आज अचानक तुझं प्रेम एवढं का ओसंडू लागलंय? काही विशेष कारण?”
“आहे नं… विशेष कारण म्हणजे… तुझा मेकओव्हर.”
“माझा मेकओव्हर?” माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही.
“तू पण कमाल करतोस हं. अरे, मेकओव्हर तर मी सहा महिन्यांपूर्वीच केला होता.”
“पण मला तो आजच दिसून आलाय. कळलं?” अत्यंत प्रेमळ नजरेचा कटाक्ष माझ्याकडे टाकून नितीनने कूस बदलली. अन् तो झोपी गेला.
मी मात्र मेकओव्हरच्या जंजाळात अडकून सहा महिने आधीच्या काळात जाऊन पोहचले…
नितीनला प्रमोशन मिळालं, तेव्हा त्याचं अभिनंदन करणार्यांची घरात रीघ लागली होती. यात सर्व थरातील लोक होते. निम्न, उच्च आणि मध्यमवर्गीय लोकांव्यतिरिक्त आणखी एक नवी वर्गवारी करता येईल… मनापासून अभिनंदन करणारे, मनातून जळणारे पण ते चेहर्यावर न दाखविता हात मिळवणारे, खरे शुभचिंतक आणि काही ईर्षा बाळगणारे. मात्र सगळ्यांच्या चेहर्यावर हसरा मुखवटा लावलेला होता. यातून नव्या वर्गवारीतले लोक कोण, हे शोधणं मोठ्या मुश्किलीचं काम होतं. म्हणून ते कष्ट घेण्यापेक्षा आम्ही मोकळ्या मनाने, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होतो. अशा प्रसंगी नात्यांची समीकरणं बनतात आणि बिघडतातही. असाच अनुभव मला आला.
मालतीशी माझी ओळख झाली. पुढे आमची घट्ट मैत्री झाली. नितीनच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपैकी एका कंपनीच्या एम.डी.ची मालती ही पत्नी आहे. तिच्या वागण्या-बोलण्याने मी पहिल्या दिवसापासून प्रभावित झाले. तिचं व्यक्तिमत्त्व अत्यंत आकर्षक होतं. पाल्हाळ न लावता मुद्याचं बोलण्याची तिची सवय होती. पहिल्याच भेटीत कोणावरही छाप पाडण्याचं कसब तिच्याकडे होतं. माझ्यावर तिची छाप इतकी पडली की, मी जणू तिच्या व्यक्तिमत्त्वाने भारावूनच गेले. माझी ही अवस्था तिनं पहिल्याच भेटीत ओळखली होती. अन् मला आपल्या मोहजालात अडकविण्याची ती प्रतीक्षा करू लागली. तिला फार वाट पाहावी लागली नाही. दोन-तीन भेटीतच मी शरणागती पत्करली. मी मालतीच्या अधीन झाले…
“तुम्ही फारच सुंदर आणि बुद्धिमान आहात मॅडम. कोणालाही आपलंसं करण्याचं तुमचं हे कसब माझ्याकडे असतं तर…”
“यात काही अवघड नाही तनया-” दोन-तीन भेटीतच ती मिसेस
शर्मावरून ‘तनया’ या माझ्या नावानिशी संबोधू लागली होती.
“त्याचं काय आहे तनया, तू फारच साधीभोळी आहेस. तू सगळ्यांमध्ये सहजपणे मिसळतेस. सगळ्यांचं बोलणं ऐकतेस. यात बदल कर. आता तू एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीच्या एम.डी.ची बायको आहेस. आब राखून वागायला शिक. तुझा मेकओव्हर करून घे.” मालतीचं बोलणं माझ्या आकलनापलीकडे असल्यानं मी स्तंभित होऊन तिच्याकडे एकटक पाहू लागले.
“उद्या मी तुला ‘कायाकल्प’मध्ये घेऊन जाते.” मालती म्हणाली. अन् मी “ते काय आहे?” असा मूर्खासारखा प्रश्न विचारला.
“अगं, ते आपल्याकडचं एकदम बेस्ट असं ब्युटी पार्लर आहे. तिथे मेकओव्हर करून बाहेर पडशील, तर तू स्वतःलाच ओळखू शकणार नाहीस; इतका बदल तुझ्यात घडून येईल.”
अलौकिक अशा जादूने भारावलेल्या अवस्थेत मी दुसर्या दिवशी मालतीसोबत ‘कायाकल्प’मध्ये दाखल झाले. ही गोष्ट नितीनला सांगण्याची गरजही मला भासली नाही. त्याला एकदम सरप्राइज द्यावं, हा विचारही मनात होताच. तब्बल तीन तास माझा मेकओव्हर चालला होता. केसांची कापाकापी, चेहर्याची रंगरंगोटी झाल्यानंतर मी आरशात पाहिलं… अन् चकितच झाले. खरोखरच मी स्वतःला ओळखू शकले नाही. खांद्यावर रुळणारे सेट केलेले केस, कोरलेल्या भुवया, सतेज चेहरा, लेगिन्गस्-बिनबाह्याची कुर्ती, पेन्सिल हिल्स्च्या सॅण्डल्स्, मनगटावर रत्नजडित ब्रेसलेट, कानात लोंबणारे डॅन्गलर्स, मोठ्या फ्रेमच्या चष्म्याच्या जागी रंगीत कॉन्टॅक्ट लेन्सेस…
असा कायाकल्प झाल्यानंतर मी अगदी वीस वर्षांनी लहान झालेय असं मला वाटलं. कारमध्ये बसताच मालतीनं मला गळामिठी घातली. उभ्या जगात हिच्यापेक्षा आपला कुणीही चांगला हितचिंतक नाही, अशी माझी भावना झाली.
“हे तर काहीच नाही गं, तुझा असली मेकओव्हर तर अजूनही बाकी आहे.” अशी साखरपेरणी करत मालती बराच वेळ मला समजावत राहिली. अन् भोळीभाबडी मी, डोळे विस्फारून, थिजल्यासारखी तिची शिकवण ऐकत राहिले. आपण आत्तापर्यंत जगातील सर्वाधिक मूर्ख स्त्री असल्याचं, मला मालतीचे विचार ऐकून लक्षात आलं. आपण जगाच्या किती मागे आहोत, हेही ध्यानात आलं.
मेकओव्हरने माझ्यात घडलेला बदल लवकरच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना दृग्गोचर होऊ लागला. नितीनचे जवळपास सर्वच अधिकारी अन् त्यांच्या पत्नीशी मी एक अंतर ठेवूनच वागत होते. कैक वर्षांपासून नितीनचे जे मित्र-सहकारी होते, त्यांच्या मुलांच्या वाढदिवशी, लग्नाच्या वाढदिवशी आम्ही न चुकता जायचो. आता त्या लोकांचे अभिवादन, फोन कॉल्स यांच्याकडे मी दुर्लक्ष करू लागले. त्यांनी आमच्या गैरहजेरीची नितीनला आठवण करून दिली की, मी अगदी भोळा चेहरा ठेवून त्यांना सांगायची, “ओह… हं… तुमचं निमंत्रण आलं होतं खरं, पण काय करणार? आजकाल इतकी इन्व्हिटेशन्स येतात की कुणाकुणाची आठवण ठेवावी, हा प्रश्न पडतो… सॉरी यार, मी विसरूनच गेले. आणि त्या दिवशी, तसंही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या एन्गेजमेंटला गेलो होतो. ते फारच महत्त्वाचं होतं. त्यामुळे आठवण राहिली असती तरी यायला जमलंच नसतं.” बिच्चारे, नितीनचे मित्र हिरमुसले होऊन जात. अपराधी भावनेनं नितीन सारवासारव करीत विषय बदलायचा. अन् माझा चेहरा अहंकारानं फुलून जायचा. अशा प्रसंगी मालती हजर असली, तर तिरप्या नजरेनं एकमेकांकडे पाहून आम्ही हसायचो…
आता माझ्या आसपास लांगूलचालन करणार्यांची गर्दी वाढू लागली होती. माझं मन जिंकण्यासाठी हे लोक लहानमोठ्या वस्तू भेटी दाखल देत. मी त्याकडे पाहतही नसे. नोकरांना त्या भेटी उचलून ठेवायला सांगत, सॅण्डल्सचा टॉक्-टॉक् आवाज करत मी निघून जायचे. मालदार आसामी कोण आहे, कुणाला नितीनच्या जवळ जाऊ द्यायचं अन् कुणाला फटकारून माघारी पाठवायचं, हे कौशल्य आता माझ्या अंगी आलं होतं.
माझा हा मेकओव्हर नितीनला पसंत नाही, हेही माझ्या लवकरच लक्षात आलं होतं. पण तसं उघडपणे बोलून दाखविण्याची संधी मी त्याला मिळू दिलीच नाही. थोडक्यात सांगायचं तर, मालतीने मला या सर्व खेळातील निपुण खेळाडू बनविलं होतं. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, या कूटनीतीच्या खेळात मला खूप मौज वाटत होती.
मात्र माझ्या या उंचावलेल्या दर्जामुळे सहयोगी, मित्र आणि नातेवाईकही दुरावले होते. पण मला कुणाचीही पर्वा नव्हती. आम्ही दोन्ही मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं. ते तिथेच स्थायिक होतील, हेही आम्ही ठरविलं होतं. मग मित्र, नातेवाइकांना कोण विचारतो? पैसा आणि सत्ता हाती असली की नातीगोती जवळीक साधू लागतात… कदाचित मी याच भ्रमात आयुष्यभर दंग राहिले असते. मालतीने दाखविलेल्या मार्गावर मी डोळे मिटून चालले होते. पण एका घटनेने माझे डोळे उघडले.
नितीनच्या ऑफिस स्टाफने पिकनिक अरेंज केली होती. या निमित्ताने स्टाफ मेम्बर्स नि त्यांच्या फॅमिलीवर छाप टाकण्याची चांगली संधी चालून आली आहे, असं मला वाटलं. म्हणून मी मालती आणि तिच्या नवर्यालाही या पिकनिकला नेण्याचं ठरवलं. मला चांगली कंपनी मिळेल आणि त्यांच्यावरही आपली छाप पडेल, असं माझ्या मनात होतं. त्यासाठी मालतीला फोन केला, तर तिने तीन-चार वेळा फोन केल्यानंतर एकदा उचलला. पिकनिकची माहिती मी तिला दिली. अन् फोन केलाच आहे तर, ब्युटिशियनकडे जाऊया म्हणून गळ घातली.
“त्याचं काय आहे की, पिकनिकला मी थोडा मोकळा ड्रेस घालायचं ठरवलंय. तेव्हा मेनिक्युअर, पेडिक्युअर केलं तर ड्रेसचा गेटअप येईल”, असा खुलासा मी केला. पिकनिकचं निमंत्रण देताच ती आनंदानं तयार होईल आणि ब्युटिशियनकडे जाण्यासही लगेच येईल, असा माझा अंदाज होता. पण तो खोटा ठरवीत, अत्यंत थंडपणे मालती म्हणाली, “नाही गं, तसा माझा खास मूड नाहीये…
पण तुझा आग्रहच असेल तर बघूया. बरं चल, मी नंतर फोन करते. मला दुसरा कॉल येतोय”, असं म्हणून तिने फोन ठेवला.
हातात फोन तसाच ठेवून मी स्तब्ध झाले. तिच्याकडून असा थंड प्रतिसाद मिळेल, असं वाटलं नव्हतं… पण मग असंही वाटून गेलं की, ती खरंच बिझी असेल. मात्र पुन्हा तिला फोन करावासा वाटला नाही.
पार्लरकडे जाताना मी ड्रायव्हरला तिच्या घराकडे गाडी वळविण्यास सांगितलं. ती नक्कीच माझ्यासोबत येईल, असं मनातून वाटत होतं. तिच्या घराच्या गेटमध्ये शिरताना मी फोन केला, पण तिनं उत्तर दिलं नाही. दोन-तीन वेळा मी रिंग दिली, तरी तिनं फोन घेतलाच नाही. घराचं दार उघडं होतं नि आतमध्ये मोबाईलची रिंग वाजत असल्याचं मला ऐकू येत होतं. मला वाटलं, दिवाणखान्यात कुणीच नसेल, म्हणून मी आत डोकावून पाहिलं तर, माझ्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. मालती बैठकीत नवर्याबरोबर टी.व्ही. पाहत होती.
“कुणाचा फोन येतोय एकसारखा?” तिच्या नवर्याने विचारलं.
“तनयाचा. मिडल क्लासमधून एलिट क्लासमध्ये आलेल्या या लोकांना कितीही एटिकेट्स शिकवले, तरी शिकत नाहीत. कुणाला टाळायचं असेल, तर त्याचा फोन कॉल घ्यायचा नाही, शिकवलं होतं तिला. बोललीस तरी आपण कामात आहे, असं भासवायचं. म्हणजे समोरचा माणूस आपोआपच मागे जाईल. याप्रमाणे तिला एव्हाना कळायला हवं होतं की, मी तिला टाळते आहे. ज्या उद्देशाने मी तिच्याशी मैत्री केली होती, तो पूर्ण झाला आहे. कंपनीचा बराचसा स्टाफ नितीनचा वैरी झाला आहे. ते वरकरणी मॅडमची चाटुगिरी करताहेत, पण आतून मात्र कंपनीला खड्ड्यात टाकत आहेत”, मालतीनं त्याला उत्तर दिलं.
माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जणू मी खड्ड्यात पडले होते.
“व्हेरी गुड डार्लिंग! आता नितीन माझ्या स्पर्धेत कसा टिकतो, तेच मी पाहतो. त्याच्या निष्ठावान स्टाफला आतल्या आत वाळवी लागली आहे, हे त्याला माहीतच नसणार.”
प्रचंड मानसिक धक्का बसून, दरवाजाच्या चौकटीतच मी थिजून गेले. माझ्या मोबाईलमधून मालतीच्या मोबाईलवर सतत कॉल जात होता. घंटी वाजत होती, ती बंद करण्याचं भानही मला राहिलं नाही.
“जळवेसारखी चिकटलीय मेली”, असं म्हणून मालतीने फोन बंद केला आणि स्विच ऑफच करून टाकला. जड पावलांनी मी घरी परतले. प्रमोशनच्या निमित्ताने दिलेल्या त्या पार्टीत नितीनने दिलेलं भाषण माझ्या कानावर पडू लागलं-
“मित्रहो, हे माझ्या एकट्याचं प्रमोशन नाही… तुम्हा सर्वांचंही आहे. आपल्या कंपनीच्या उज्ज्वल भवितव्याकडे टाकलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. मी एकटा काहीच करू शकलो नसतो. पुढेही काही करू शकणार नाही. तुम्ही सारेच कंपनीचे प्रमुख आधारस्तंभ आहात. अन् तिला शिखरावर नेणं हे तुमच्या हाती आहे. त्यासाठी तुम्ही माझं माध्यम निवडलंत, याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे…”
नितीन आजही आपले सहकारी, मित्र आणि नातेवाईक यांना पूर्वीच्याच उत्साहाने भेटतो. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो. मी मात्र केवळ औपचारिकता म्हणून अशा प्रसंगी हजेरी लावते. माणसांच्या गर्दीत वेगळंच राहते. खरं म्हणजे, त्या गर्दीत मिळून मिसळून राहण्यात जे सुख आहे, ते अलिप्त राहण्यात नाही. मेकओव्हर केल्यानंतर आपण भलेही सगळ्यांच्या दृष्टीने उच्च स्तरावर पोहचलो, परंतु नितीनच्या हिशेबी आपण जराही वर जाऊ शकलो नाही, उलटपक्षी खालीच पडलो, ही टोचणी मला लागून राहिली आहे.
“आपण स्वतःला पूर्णपणे बदललं पाहिजे. लोकांसमोर पोकळ दिमाख न दाखवता आपण प्रत्यक्ष जीवनात उच्च स्थान मिळवलं पाहिजे”, असा दृढ निश्चय मनाशी केल्यानंतरच मला सुखाने झोप लागली…
आजचा सूर्योदय माझ्यासाठी नवप्रभात घेऊन आला होता. पिकनिकला मी सर्व स्टाफ आणि त्यांच्या घरच्या लोकांशी अतिशय आत्मीयतेने वागले. आपल्या जवळच्या लोकांना खूप काळाने भेटत असल्याचं आकर्षण त्यात होतं. सगळ्यांसोबत मी खेळात रमले. लांगूलचालन करणार्यांनी मला जिंकविण्याचा प्रयत्न केला, पण मी विनम्रतापूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं. पराजयातही मला विजयी झाल्याचा साक्षात्कार होत होता. जेवताना पुरुषांना वाढण्याची वेळ आली, तेव्हा मीही दुपट्टा बांधून त्यांना वाढलं. सगळे जण मला “राहू द्या हो, तुम्ही बसा”, असं म्हणत होते. पण मी पूर्ण पंगत वाढली. सर्व बायकांसोबत जमिनीवर बसून पत्रावळी आणि द्रोणात वरणभाताचा आस्वाद घेतला.
प्रेमभर्या नजरेनं मंद स्मित करत नितीन माझ्याकडे बघत होता. मला माझा स्तर खूपच उंच उंच झाल्याचा भास होत होता…
गाढ झोपलेल्या नितीनने कूस बदलली आणि हात पसरले. ‘हं, मेकओव्हरची जादू स्वप्नातही जाणवतेय वाटतं’, असा विचार माझ्या मनात आला. अन् हसत हसत मी त्याच्या कवेत शिरले.
Link Copied