Close

संतुलन (Short Story: Santulan)

  • दीप्ती मित्तल
    जॉब हे तुझ्या जीवनातलं महत्त्वपूर्ण अंग आहे खरं. पण ते संपूर्ण जीवन नव्हे. त्याचप्रमाणे तुझे वैवाहिक संबंध, नातेवाईक, तुझं घर हे तुझ्या जीवनाचं आवश्यक अंग आहे. एकाकडे दुर्लक्ष करून दुसर्‍या गोष्टीला अधिक महत्त्व देशील तर जीवनाचे संतुलन बिघडून जाईल.


आज कितीतरी दिवसांनी भव्या आपल्या गच्चीवर आली होती. तिनं एक दीर्घ श्वास घेतला. चौफेर नजर टाकली. अन् चकितच झाली. समोरच्या बाजूला पूर्वी तर हिरवीगार वनराई होती. सळसळणारे वृक्ष, हिरवळ… अरेच्चा! त्याच्या जागेवर ही बिल्डिंग कधी उभी राहिली? त्याच्या दुसर्‍या बाजूला पण बांधकाम चाललेलं दिसतंय्. समोर हिरवंगार दृश्य दिसतं, या आकर्षणापोटी तर आपण हा महागडा टेरेस फ्लॅट घेतला होता. त्यासाठी जास्त पैसे देखील मोजावे लागले होते. अजूनपर्यंत ह्या घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरतोय् आपण. अन् इथे तर निसर्गाची हिरवाई लुप्त होऊन चारी बाजूला बांधकामे उभी राहताहेत.
नंतर भव्याची नजर टेरेसवर ठेवलेल्या कुंड्यांवर स्थिरावली. रांगेत ठेवलेल्या कुंड्यांमधील सर्व झाडे सुकून गेली होती. तिला अतिशय अपराधी वाटलं. ह्या नव्या टेरेस फ्लॅटमध्ये राहायला आल्यावर तिनं मोठ्या हौसेनं नर्सरीतून रोपे आणून ती इथे लावली होती. त्यांना कधी ती, तर कधी नीरज पाणी घालत होते. पण हे पाणी घालणं कधी बंद झालं ते कळलंच नाही. आपण शेवटचं टेरेसवर कधी येऊन बसलो होतो, ते भव्याला अजिबात आठवेना. आपली ताई आणि भाऊजी येणार म्हणून तिनं दोन दिवसांची सुट्टी घेतली नसती, तर ती आजही इथे टेरेसवर आली नसती.
अशी सुट्टी घेणं भव्याच्या स्वभावात बसणारं नव्हतं. ती पक्की वर्कोहोलिक होती. एका बड्या मल्टी नॅशनल कंपनीत सिनीयर मॅनेजर होती ना!
घर, संसार, आपली तब्येत, नातीगोती… ह्या गोष्टी तिला आपल्या कामापुढे गौण वाटत होत्या. परंतु ह्या खेपेला मात्र तिनं नमतं घेतलं होतं. तसं काहीसं घडलं होतं…
गेल्याच आठवड्यात आईशी बोलता बोलता तिला कळलं होतं की ताई आणि भाऊजी एका लग्नाच्या निमित्ताने तीन चार दिवस बेंगळुरूला येत आहेत. हे ऐकून भव्या खूपच आनंदित झाली होती. खूप दिवसांपासून तिला अगदी एकटं एकटं वाटत होतं. तिच्या लग्नाला चार वर्षे झाली होती. पण चार वर्षात पहिल्यांदाच तिला असं रिक्तपण जाणवत होतं. नीरज तीन महिन्यांसाठी ऑफिसच्या टूरवर जर्मनीला गेला होता. अशातच ताईच्या येण्याच्या बातमीनं तिला खूप बरं वाटलं होतं. आपल्या येण्याविषयी, इथल्या कार्यक्रमाबद्दल ताई फोन करील, म्हणून ती वाट पाहत राहिली. पण फोन आलाच नाही. म्हणून ती मनातून चरकली. आपल्याला ताई टाळत तर नाही ना, अशी शंका तिला आली. नाही नाही… माझी ताई असं करणार नाही… कां नाही करणार? मनातून प्रतिध्वनी उमटला. गेल्या खेपेस ताई व भाऊजी आपल्याकडे आले तेव्हा, आम्ही दोघांनी त्यांच्यासाठी किती वेळ दिला? नीरज नेहमीप्रमाणे त्याच्या ऑफिसच्या शेड्यूलमध्ये अडकून पडला होता. कधी धडपणे बसून त्यांच्यापाशी तो बोलू शकला नाही. अन् भव्या देखील एका महत्त्वाच्या कामात अडकली होती. दोन दिवस ते दोघे जण घरात एकटेच बसून राहिले. हे सगळं आठवून, अखेरीस भव्याने स्वतःहून ताईला फोन केला.
अन् तिची शंका खरी ठरली.
ताई-भाऊजी बेंगळुरूला येणार होते, पण त्यांच्याकडे येण्याबद्दल त्यांनी काहीच ठरविले नव्हते.
‘ताई, अग तू मला अजिबातच विसरलीस की काय?’ भव्या तक्रारीच्या सुरात विचारती झाली. त्यावर ताई फणकार्‍याने बोलली, ‘भव्या कोण कोणाला विसरलंय् ग? तू स्वतःलाच विचार ना जरा. तू तुझ्या कामात, आपल्या विश्वात इतकी दंग झाली आहेस ना, की कोणी जगलं काय नि मेलं काय, तुला काहीच फरक पडत नाही. माझ्या बर्थ डे ला आणि लग्नाच्या अ‍ॅनिवर्सरीला तू शेवटचं कधी मला विश् केलं होतंस, ते तरी आठवून बघ. म्हणजे कळेल तुला. मी पण माणूस आहे ग. तुझ्या भाऊजींना अगदी त्यांचे चुलत, मामेभाऊ-बहिण देखील शुभेच्छा देतात. अन् माझी एकुलती एक सख्खी बहिण साधा फोनसुद्धा करत नाही, हे मनाला लागतं.’
ताईनं सांगितलेलं सत्य ऐकून भव्या हादरलीच. गेल्या दहा वर्षात, आपला जॉब म्हणजे आपलं सर्वस्व आहे, असं समजून ती त्याच्यात इतकी बुडाली होती की बाकी सर्व कर्तव्याचा तिला सपशेल विसर पडला होता.
अखेरीस खूप मनधरणी केल्यानंतर, ताईची कशीबशी समजूत पटली. पण भाऊजींच्या बाबतीत तिनं साफ नकार दिला. ती म्हणाली, ‘हे बघ भव्या, मी भलेही येईन. पण तुझ्या भाऊजींनी तुझ्याकडे येण्यास साफ नकार दिला आहे. ते म्हणतात, ज्या लोकांना आपल्यासाठी दोन मिनिटांची देखील सवड नाही, त्यांच्याकडे जाऊन त्यांची पंचाईत कशाला करायची?’
एवढं सगळं ऐकल्यावर भव्या स्वतःहून भाऊजींशी बोलली. त्यांचा रुसवा काढला. अन् त्यांच्या येण्याच्या तारखांना ऑफिसमध्ये रजा टाकली. म्हणूनच तिला टेरेसवर येण्याची फुरसत मिळाली होती.
डोअरबेल वाजली. भव्याने धावत जाऊन दार उघडले. ताई-भाऊजी आले होते. आजचा संपूर्ण दिवस त्यांनी तिच्यासाठी राखून ठेवला होता. भव्या ताईच्या गळ्यात पडली. तिचे रुसवे फुगवे, गैरसमज दूर केले. ताई व भाऊजींच्या मनातील मळभ दूर झाले. भव्याने त्यांच्यासाठी छान छान ब्रेकफास्ट केला होता. तो करता करता त्यांच्या गप्पा रंगल्या. ताई आणि भाऊजींच्या परस्परांशी वागण्या बोलण्यानं भव्या चांगलीच प्रभावित झाली. भाऊजींनी काय खायचं, काय नाही खायचं, हे तीच अधिकारवाणीनं ठरवत होती. बोलण्याच्या नादात भाऊजींनी जेव्हा एक एक्स्ट्रा गुलाबजामची फरमाईश केली, तेव्हा ताईनं डोळे वटारून त्यांना समज दिली की, आणखी एक अजिबात मिळणार नाही. लग्नाला बारा वर्षे होऊन गेली तरी त्या दोघांच्या परस्परांशी व्यवहारात किती मायेची ऊब होती, आपुलकी दिसत होती. त्यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री बघून भव्याच्या मनात जरासं खुपलं. आपण नीरज सोबत, एकमेकांची संगत एन्जॉय करीत, शेवटचं कधी खाल्लं होतं, ते तिला काही केल्या आठवत नव्हतं. कारण नीरज जेव्हा ब्रेकफास्ट करतो, तेव्हा त्याचं लक्ष एकतर टी.व्ही.कडे, वर्तमानपत्रात नाही तर लॅपटॉपवर लागलं असतं. तोंडात काय पडतंय् याची देखील त्याला शुद्ध नसते. ती स्वतः देखील ब्रेकफास्ट म्हणजे एक असाईनमेन्ट कम्प्लीट केल्यासारखीच संपवते. त्यांच्या डायनिंग टेबलवर स्वाद किंवा खाण्याचे समाधान कधी नांदलेच नाही.
भव्याला वाटायचं की, पती-पत्नी दोघेही जर वर्किंग क्लासचे असतील, तर असंच घडतं. पण आज ताई व भाऊजी यांनी हा समज खोटा ठरवला होता. ताई तिच्या शहरातील नामांकित इंटिरियर डिझायनर आहे तर भाऊजी सुप्रसिद्ध आर्किटेक्ट. दोघेही आपल्या कामात आकंठ बुडाले असले तरी त्यांनी आपल्या नात्यातली ऊब कायम ठेवली आहे. हे ती डोळ्यानं पाहत होती.
खाऊन झाल्यानंतर ताईनं भव्यासोबत आवरायला सुरुवात केली. किचनमध्ये जाऊन तिनं एक नजर टाकली. सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. चटणी ठेवायला तिनं फ्रिज उघडला. अन् तिनं कपाळाला हात लावला. भव्या, हा फ्रिज तू शेवटचा कधी साफ केला होतास? ताई जवळपास ओरडलीच.
भव्या चांगलीच हडबडली. कारण तिला फ्रिज साफ केल्याचं आठवतच नव्हतं. ‘काय ग, तू तर आजच्या जमान्यातील सुशिक्षित, समजूतदार मुलगी आहेस ना! फ्रिजमध्ये अशी घाण राहिली तर त्यात हानिकारक बॅक्टेरिया निर्माण होऊन आपलं आरोग्य बिघडवतील. हे तुला ठाऊक नाही का?‘ ताईनं चढा स्वर लावला.
’काय करू ग ताई. माझा जॉबच असा आहे नं, की वेळच मिळत नाही.‘ भव्या काकुळतीनं बोलली. त्यावर ताईने तिच्याकडे रागाने फक्त पाहिले. बोलली मात्र काहीच नाही.
भाऊजी एक डुलकी घेण्यासाठी बेडरूममध्ये निघून गेले होते. भव्या आणि ताई चहाचे कप घेऊन हॉलमध्ये येऊन बसल्या. ‘काय ग, तुझे सासू-सासरे कसे आहेत?’ ताईने प्रश्न केला.
‘त्यांची तब्येत कमीजास्त होतच असते. वय झालंय् ना. त्याला कोण काय करणार? इथे येणंजाणं ठेवा, म्हणून किती वेळा सांगितलं त्यांना. पण इकडे त्यांना अजिबात करमत नाही. ते म्हणतात, तुम्हा दोघांना कामातून उसंत मिळत नाही. मग इथे येऊन आम्ही काय करायचं? गेल्या दोन वर्षात ते दोघे इथे आलेले नाहीत.’
‘आणि तुम्ही?’


‘सुट्टी घ्यायची म्हटलं तरी जमत नाही ग. खरं सांगायचं तर आम्ही गेल्या दोन वर्षात त्यांना भेटलेलोच नाही.‘ ताईचा चेहरा गंभीर झाला. पण भव्याच्या चेहर्‍यावर बेपर्वाई दिसत होती.
अन् तुझी ती छोटी नणंद निक्की, ती सध्या काय करतेय्? ताईनं विचारलं. तर भव्या विचारात गढली. कारण निक्की नेमकं काय करतेय् हे तिला ठाऊकच नव्हतं.
‘फ्रॅन्कली स्पिकींग, ती एक्झॅक्टली काय करतेय् ना ते मला ठाऊक नाही. एखादा प्रोफेशनल कोर्स करीत असावी.’
ताईच्या चेहर्‍यावरील गंभीर भाव अधिकच गडद होत गेले. तिच्या डोळ्यात आता भव्याला राग दिसू लागला. म्हणून विषयांतर करत ती बोलली, ‘हे काय ग ताई. माझ्याबद्दल काही विचारशील की नाही? मी कशी आहे? सध्या काय चाललंय्… कोणत्या पोस्टवर आहे? काहीतरी विचार. अगंं, गेल्याच महिन्यात मला प्रमोशन मिळालं. अन् बेस्ट मॅनेजर म्हणून अ‍ॅवॉर्ड देखील. ऑफिसमध्ये माझ्या मॅनेजमेन्टचे स्कीलचे दाखले दिले जातात.’ भव्याचे डोळे चमकू लागले होते.
‘हं. तुझे मॅनेजमेन्ट स्कील्स तर मी उघड्या डोळ्याने पाहतेच आहे,’ सगळीकडे दृष्टी फिरवत ताईने आवाज चढविला. ‘सगळीकडे पसरलेली अव्यवस्था, जिकडे तिकडे टाकलेले कपड्यांचे बोळे, वर्तमानपत्रांची रद्दी, धूळ…’ ताईच्या बोलण्याचा ओघ समजून भव्या वरमली.
‘आय नो, ताई. मला घराकडे लक्ष देता येत नाही. बट यू नो, माय जॉब…’
‘हे ना सगळे बहाणे आहेत भव्या. आजच्या युगात वर्किंग वूमन बिझी असते. जुन्या पिढीतल्या गृहिणींसारखा तिला घरासाठी वेळ देता येत नाही, हे मान्य. परंतु आजकाल ज्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत, कामवाल्या बाया आहेत, त्यांच्या मदतीने आपलं घर आपण नीटनेटकं ठेऊ शकतो ग. ह्यालाच मॅनेजमेन्ट स्कील म्हणतात ना! आपल्या नोकरी बरोबरच आपलं घर, नातेवाईक, सामाजिक जाणीव ह्यांना सांभाळणार्‍या महिलेलाच यशस्वी स्त्री म्हटले जाते. मी पण वर्किंग वूमनच आहे. पण मी आपलं घर, परिवार यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही. हे बघ भव्या, तुझा जॉब हे तुझ्या जीवनातलं महत्त्वपूर्ण अंग आहे खरं. पण ते संपूर्ण जीवन नव्हे. त्याचप्रमाणे तुझे वैवाहिक संबंध, नातेवाईक, तुझं घर हे तुझ्या जीवनाचं आवश्यक अंग आहे. एकाकडे दुर्लक्ष करून दुसर्‍या गोष्टीला अधिक महत्त्व देशील तर जीवनाचे संतुलन बिघडून जाईल ग. जीवनातील सगळ्या अंगांचं तू उत्तम संतुलन राखायला शिकशील तेव्हाच तुझ्यातील मॅनेजमेन्ट स्कीलचं मी कौतुक करेन.
अन्यथा नाही.’
भव्या काळजीत पडली. ते पाहून ताईने तिच्या डोक्यावर मायेनं हात फिरवला. म्हणाली, ‘हे बघ बेटा, आथा फक्त तुम्ही दोघेच आहात. तुमच्या मर्जीनुसार जगताय्. पण तुम्हा दोघांमध्ये जो तिसरा येईल ना,त्याला तुझा वेळ व लक्ष देण्याची जास्त गरज भासेल. मग तेव्हा तू कसं मॅनेज करशील? तेव्हा तो येण्याच्या आधीच तू जीवनात संतुलन राखायला सुरुवात कर. नाहीतर…’
‘बस कर ताई. ह्या नाहीतरच्या पुढचं काही बोलून माझी झोप आत्ताच उडवू नकोस. आय प्रॉमिस, तू जे जे काही सांगितलंस, त्यानुसार मी इथून पुढे वागेन…’ असं बोलून भव्याने आपलं डोकं ताईच्या मांडीवर ठेवलं. तिच्या केसातून ताईचा हात फिरू लागला. तिच्या प्रेमळ स्पर्शानं काही वर्षापूर्वी यंत्रवत् झालेल्या भव्याचं, हळूहळू माणसात रूपांतर होऊ लागलं.

Share this article