मोहिनी अजूनही ऑफिसमध्येच होती .काल मैत्रिणीशी झालेला संवाद राहूनराहून कानात गुंजत होता. " मोहिनी, उद्या यायलाच पाहिजे बरं का गं तुला.. दर वेळेस कामाच्या सबबी सांगून चुकवतेस..! मज्जा करू किटी पार्टीला आपण..!" मोहिनीने यावेळेस अगदी ठरवलं होतं.. जायचं म्हणजे जायचं! तसं तिने सेटिंग पण लावले होते..! मनाची पूर्ण तयारी करून शेवटच्या अर्ध्या तासात तिची आवराआवर चालूच होती आणि बॉसने एन्ट्री मारली.. मोहिनी च्या काळजाचा ठोकाच चुकला...." मोहिनी, सम अर्जंट मिटिंग.. यु हॅव टु कम विथ मी..!" दार ढकलून बॉस दिसेनासा झाला. मोहिनी हताशपणे खुर्चीत कोसळली.. थोडया वेळाने व्हॉटस्अपवर किटी पार्टीचे फोटो यायला लागल्यावर मात्र तिच्या डोळ्यांतून धारा वाहायला लागल्या... खूप चडफड झाली तिची...अरे ए जीना भी कोई जीना हैं?
शर्मिलाची ऑपरेशन थिएटर मधली केस काही संपायचं नाव घेईना.. मुलाला पाळणाघरातून घेऊन, तयार करून शाळेच्या कार्यक्रमासाठी सोडायचं होतं… नवरा पिकअप् करतो म्हणाला तर आपणच नाही म्हणून सांगितलं.. स्वतःच सगळं करायची हौस होती ना? आता कसं जमवायचं ? शर्मिलाच्या डोळ्यांतून टपटप पाणी यायला लागलं..! सगळ्याच गोष्टी एकटीला कशा करता येतील? सुपरमॅनसारखं पाठीला जादुचं कापड लावून उडावं अन् सुपरवुमन बनून झटझट कामे पार पाडावीत म्हटलं तर सगळ्या आघाड्यांवर प्रचंड तणाव येतो, धावपळ, चिडचिड होते… आणि हाती फक्त मनस्ताप येतो!!
ही दोन्हीही प्रातिनिधीक उदाहरणे आज आपल्या अवतीभवती सतत घडत आहेत. पूर्वी स्त्रियांसाठी ऐच्छिक असणारं बाहेरच्या जगातलं काम आता अनिवार्य होऊन बसलं आहे. चार भिंतीच्या आत चूल आणि मूल यांभोवती फिरणारं स्त्रियांचं आयुष्य शिक्षणामुळे, प्रगतीच्या रेट्यामुळे कधीच उंबरठा ओलांडून बाहेर पडलंय. ती जीवनाची एक गरज बनली आहे.. पण त्यामुळे स्त्रियांवरील बाकीच्या जबाबदाऱ्या कमी झाल्यात का? तिच्याकडून असलेल्या बाकीच्यांच्या अपेक्षा कमी झाल्यात का? ह्याचं उत्तर मात्र नकारार्थीच येते हे खेदाने नमूद करावे लागेल ..!
पूर्वी पुरुषांनी अर्थार्जन करावं आणि स्त्रियांनी मुलेबाळे, पै-पाहुणे, घरचं व्यवस्थापन इत्यादि गोष्टी सांभाळाव्यात असे पारदर्शक विभागीकरण होते. पण हयांतसुद्धा कुठेतरी स्त्रियांचे वेगवेगळ्या पातळीवर शोषण होतच होते. कुवत आणि बुद्धिमत्ता असूनही ती चार पावले मागेच राहात होती.. विसाव्या शतकात मात्र तिने चांगलीच छलांग मारली..! पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात झळकू लागली.. सुरुवातीच्या कौतुकाच्या नशेत ती जीव तोडून झटून काम करू लागली.. स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडू लागली.. आपण सगळं काही करू शकतो ह्या आत्मविश्वासात उंच उंच झोके घेऊ लागली..! पण घरातला कौटुंबिक वेळ कमी कमी होऊ लामला, मुलाबाळांसाठी इच्छा असूनही वेळ अपूरा पडू लागला, कुटुंबातल्या बाकी सदस्यांकडून वाढलेली सहकार्याची अपेक्षा फोल जावू लागली आणि तिच्या मनाची घालमेल वाढली..! सगळ्या पातळ्यांवर एकहाती लढण्याची तिची क्षमता कमी पडू लागली.. आपणच कष्टाने उभ्या केलेल्या आपल्या साम्राज्याला तोलून धरता धरता आपलाच तोल जातो की काय अशी भीती तिला सतत ग्रासू लागली..! मागे फिरण्याची वाट नसलेल्या या चक्रव्यूहात ती स्वतःच अडकून जायला लागली..! ह्या सर्वाचा परिणाम तिच्यावर तर होतंच होता पण तिला प्राणप्रिय असलेल्या कुटुंबांचं काय? तो सुखी होता? तो एकसंध होता? ज्यांच्यासाठी करायचं ते समाधानी होते? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नावलौकिक , पैसा मिळवून ती आनंदी होती का? आयुष्याचा आनंद उपभोगत होती का?
सलोनी एक अत्यंत हुशार आणि प्रथितयश व्यावसायिक होती.. तिच्या प्रगतीचा आलेख सदैव वरच्या दिशेने जाणारा होता.. लग्न करून मोठ्या घरी आली. कौतुकाच्या नव्या नव्हाळीत नहात आयुष्य कसे मजेत चालले होते.. लग्नाला चार वर्षे होत आली आणि अजून गुड न्यूज नाही म्हणून आजेसासू, सासू रोज अपेक्षेने पाहत असत.. बोलत नसल्या तरी ती नजर, त्यांतला जाब हल्ली सलोनीला सहनच होत नव्हता.. करियर करण्याच्या झपाट्यात मूल हा विचार ती जवळपासही फिरकू देत नव्हती.. पण शरीराचं घड्याळ टीक टीक करीतच होतं ना..! आलेला क्षण मागे वळून येणारच नव्हता.. जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहोचेपर्यंत शरीरातली संप्रेरकं साथ देणार होती का? आज सलोनीसारखी कात्रीत सापडलेली एक अख्खी पिढी आपल्या डोळ्यांसमोर आहे.. काम, प्रगती आणि व्यक्तिगत आयुष्य ह्याचा योग्य तो मेळ सलोनीला घालता येईल का? एका छोट्याश्या बिंदूपासून तयार झालेला इवलासा जीवच तिच्यातल्या स्त्रीत्वाला वेगळा आयाम देऊ शकतं..! अशी चैतन्यदायी नवनिर्मिती केवळ ती आणि तीच करू शकते… ते करण्यासाठी ती थोडी विसावू शकेल का? दोन पावलं मागे जावे लागले तर ते स्विकारू शकेल का?
जीवन अतिशय सुंदर आहे! ते अधिकाधिक सुंदर करण्यासाठी, त्यातील क्षण अन् क्षण जगण्यासाठी फक्त काम, व्यवसाय आणि व्यक्तिगत कौटुंबिक जीवन यांचा सुंदर ताळमेळ घालता आला पाहिजे… काही करता येईल का त्यासाठी?
१. शिक्षणाचा उपयोग करून प्रत्येक स्त्रीने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या बळावर आयुष्य जगता येईल हा आत्मविश्वास कमावला पाहिजे.
२. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर थोडा वेळ काढून तो आनंद उपभोगला पाहिजे.. शेवटी कुटुंबव्यवस्था शाबूत राहण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडूनच अपेक्षित आहे..!
३. काम आणि कुटुंब ह्यांतली कसरत( वर्क लाईफ बॅलन्स) यशस्वी करण्यासाठी कुटुंबातील बाकी सदस्यांनाही काही जबाबदाऱ्या घेण्यास उद्युक्त केले पाहिजे. बदल नक्कीच घडत आहेत.. ह्या तरुण पिढीतील मुलं मुली आपापल्या पारंपारिक जबाबदाऱ्यां चं जोखड दूर फेकून जास्त मोकळेपणाने आणि व्यापक विचार करीत आहेत. स्वयंपाकघराच्या कट्ट्यावर रमणारी मुलं जास्त दिसत आहेत..!
४. " नाही" म्हणायला शिकता येईल? काम कामाच्या ठिकाणी संपवता आले तर घरचा वेळ आणि काम ह्याची सरमिसळ नक्कीच टाळता येईल. कुटुंबाचा मौल्यवान वेळ खाणारे काम असेल तर योग्य त्या वेळेस ते नाकारताही आले पाहिजे.
४. कामे वाटून द्यायला शिकले तर कामे करून घेणे सोपे जाते. प्रत्येक गोष्ट स्वतःच करायचा हेकटपणा सोडला, थोडी तडजोड केली तर आयुष्य लयीत चालेल असे नाही का वाटत? मुलंमुली असा भेद न करता काम करण्याचे , घरात मदत करण्याचे संस्कार दिले तर त्यांनाच फायद्याचे नाही का ठरणार? सुपरवुमन बनल्याने कोणी कोणाचा सत्कार नक्कीच करत नाही!!
५. स्वतःवर प्रेम आणि स्वतःची काळजी - अनेक दगडांवर एकाचवेळी पाय ठेवण्याच्या प्रयत्नात मूळ हेतूलाच सुरुंग लागतो.. एकाही गोष्टीला योग्य न्याय देऊ शकत नाही ही चिडचिडच बऱ्याच आजारांचे मूळ बनून येते! तेव्हा स्वतःवर प्रथमतः निस्सिम प्रेम करा..! स्वतःचा आतला आवाज ऐकायला शिका..!
६. तुलना टाळा. आजकालच्या अंगावर येणाऱ्या सोशल मीडियाच्या जगात अधोरेखित होणारी स्पर्धा टाळूच शकत नाही. पण प्रत्येकाचं आयुष्य आणि प्रश्न वेगळे आहेत . वरवर दिसणाऱ्या आभासी वर्खाखाली प्रत्येकजण झगडतो आहे. बस्स! ही तुलना टाळता आली पाहिले.! आपल्या आयुष्याचा समतोल साधण्यासाठी देशाटन करा , पर्यटन करा आणि बघा निसर्ग तुमच्यात कसा बदल घडवितो ते..!
या जगात भौतिक सुखं मिळविण्यासाठी जबाबदाऱ्या आणि कष्ट कोणालाच चुकले नाहीत. फक्त या सर्वांचा ताळमेळ घातलात तर सुख पायाशी लोळण घेईल.! जगात आदर्श असं काहीच नसतं.. आदर्शवत वातावरण तयार करायला आपण शिकलं पाहिजे. आठ मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने काम आणि व्यक्तिगत आयुष्य यांतला सुवर्णमध्य साधण्याचा संकल्प करू या ! आपला आणि कुटुंबाचा आनंद द्विगुणित करू या! सख्यांनो कराल हा प्रयत्न??
काही तरी ठरवून मोहिनी आज ऑफिसला आली होती. हातात रजेचा अर्ज घेऊन ती बॉसच्या केबिनमध्ये शिरली…" सर, मला आठवडाभराची सुट्टी हवी आहे. घरासाठी , मुलांसाठी, सासूबाईंच्या पंचाहतरीसाठी आवर्जून वेळ काढायचाआहे…. मला माझ्या आयुष्याची घडी व्यवस्थित बसवली पाहिजे सर..!" बॉसच्या उंचावलेल्या भुवयांकडे दुर्लक्ष करीत मोहिनी शांतपणे आत्मविश्वासाने बाहेर पडली. सापडेल का तिला तिचा सुवर्णमध्य..??
डॉ. नंदिनी देशमुख- लोंढे
भूलतज्ज्ञ, पुणे