मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला मागच्या वर्षी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. यातून तो आता पूर्णपणे बरा झाला असून तो पुन्हा कामावर रुजू झाला आहे. श्रेयस तळपदे सध्या आपल्या आगामी बॉलिवूड चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.
दरम्यान आता श्रेयस तळपदेच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. श्रेयस तळपदे लवकरच महेश मांजरेकरांच्या 'ही अनोखी गाठ' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून श्रेयस तळपदे आणि महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे.
महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित महेश मांजरेकर दिग्दर्शित 'ही अनोखी गाठ' या चित्रपटाची नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांचीच आहे. तर या चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांनी लिहिले आहेत.
श्रेयस तळपदेनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या आगामी चित्रपटाविषयी पोस्ट शेअर केली आहे. श्रेयस लवकरच नव्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. त्याने आपल्या आगामी 'ही अनोखी गाठ' या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नव्या वर्षाची सुरूवात एका नव्या कोर्या मराठी सिनेमाने… झी स्टुडिओज् प्रस्तुत करीत आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित एक नवी प्रेम कहाणी 'ही अनोखी गाठ'.'
'ही अनोखी गाठ' या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे. हा चित्रपट येत्या १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाविषयी सांगितले की, 'झी स्टुडिओजसोबत या आधीही अनेकदा काम केले असून पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आलो आहे. श्रेयस आणि गौरी यांची केमिस्ट्री पाहणे औस्तुक्याचे ठरेल. हळूहळू चित्रपटातील गोष्टी समोर येतीलच.'