Close

श्रीराम नवमी : ‘मुखी राम विश्राम तेथेच आहे’ (Shri Ram Navami)

रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. आज राम नवमी आहे. भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२ वाजता झाला. श्री राम नवमीचा सण दरवर्षी मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, राम नवमी हा हिंदू धर्मातील शुभ सणांपैकी एक आहे. हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो.

श्रीरामांनी जन्म घेतला अयोध्यापती दशरथराजा आणि कौसल्याराणीच्या पोटी. सर्व दहा इंद्रियांवर ताबा ठेवून शरीररूपी रथ व्यवस्थित चालवण्याची क्षमता असणारा तो दशरथ राजा आणि कोणताही ‘सल’, कसलेही ‘शल्य’ नसणारी ती कौसल्याराणी आणि जिथे कोणतेही युद्ध नाही, जिथे राजा आणि प्रजेत, माणूस आणि निसर्गात, अगदी माणसा-माणसातही भांडणाचा किंवा वितुष्टाचा लवलेशही नाही अशी आदर्श नगरी म्हणजे ‘अ-युद्धा’ अर्थात अयोध्या नगरी.

श्रीरामदास स्वामी म्हणतात, ‘मुखी राम विश्राम तेथेच आहे’ किती सुंदर कल्पना आहे ही!

‘श्रीराम‘ या शब्दातील ‘श्री’ म्हणजे शक्ती, सौंदर्य, सद्गुण, वैभव इत्यादींचा समुच्चय. यामुळेच श्रीकृष्णाप्रमाणे ‘श्रीराम’ या नावामध्ये ‘श्री’च्या नंतर पूर्णविराम नाही; कारण श्रीराम हा स्वतःच भगवंत आहे. असा हा श्यामवर्ण, कमलनेत्र, आनंददायी अन् वात्सल्यमूर्ती श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत ! रामभक्तांनो, आपल्या परम श्रद्धेय श्रीरामाची उपासना आपण विविध प्रकारे करत असतो; परंतु श्रीरामाच्या उपासनेसंदर्भातील शास्त्र समजून घेतल्यास उपासनेशी संबंधित कृती योग्यरीत्या करणे सुलभ होईल.

श्रीरामाची पूजा

श्रीरामाची पूजा करतांना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावावे. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वाहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहावे. अंगठा आणि अनामिका जोडून तयार होणाऱ्या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे पूजकामध्ये भक्तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.

श्रीरामाला वाहायची विशिष्ट फुले

विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत जास्त असते. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहावीत.

या फुलांच्या गंधामुळे श्रीरामाचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार श्रीरामाला फुले वाहातांना ती चार किंवा चारच्या पटीत वाहावीत.

श्रीरामाच्या उपासनेत वापरायची उदबत्ती

विशिष्ट देवतेचे तत्त्व विशिष्ट गंधाकडे लवकर आकृष्ट होते. केवडा, चंपा, चमेली, जाई, चंदन, वाळा आणि अंबर या गंधांकडे रामतत्त्व लवकर आकृष्ट होते. यामुळे या गंधांच्या उदबत्त्या श्रीरामाच्या उपासनेत वापरल्यास रामतत्त्वाचा लाभ जास्त प्रमाणात होतो.

श्रीरामासह सर्व देवतांना भक्तीच्या पहिल्या टप्प्यात दोन उदबत्त्यांनी ओवाळणे अधिक योग्य आहे. तर भक्तीच्या पुढच्या टप्प्यात देवतेला एका उदबत्तीने ओवाळावे. देवतेला ओवाळतांना उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचे बोट आणि अंगठा यांनी धरून ती घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळावी.

श्रीरामाला घालावयाच्या प्रदक्षिणा

श्रीरामाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर चार प्रदक्षिणा घालाव्यात. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चारही आश्रमांचे आदर्शरीत्या पालन करणारा राजा म्हणजे श्रीराम; म्हणून श्रीरामाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर श्रीरामाला चार प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवतेला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा अधिक संख्येत घालायच्या असल्यास त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या म्हणजे चारच्या पटीत घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने कोणत्याही देवतेकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प कालावधीत संपूर्ण देहात संक्रमित होते.

(सौजन्य – सनातन संस्था)

Share this article